सावध, ऐका पुढल्या हाका..!!
विषय अर्थातच नुकत्याच लागलेल्या इयत्ता १० वी किंवा एसएससीच्या निकालाचा आहे. या विषयावर गेल्या पाच-सहा दिवसांत इतकं उलट-सुलट लिहीलं, बोललं गेलंय, की आता त्याचा कंटाळा येऊ लागलाय. खरी मेख इथंच आहे, आपल्याला कंटाळा किंवा आनंद अगदी तत्परतेने वाटतो पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर ‘असं का व्हावं’ असा शांतपणे विचार करावासा वाटत नाही. किॅबहूना ज्या जीवघेण्या वेगाने आपण चाललोय, त्यात सर्व असेल किंवा नसेलही, शांतपणा मात्र नक्की नाही आणि विचार करण्यासाठीची एकमेंव अट शांतपणा असणं हीच असल्याने आणि नेमका तोच नसल्याने आपली विचार प्रक्रीयाच गोठली आहे. बरं इतक्या भयानक वेगात आपण जातोय कुठं हे ही कोणालाच सांगता येत नाही ही त्यापेक्षा गंभिर गोष्ट आहे. वाऱ्यावर उडणाऱ्या कागदाच्या दिशाहीन कपट्यासारखी आजची आपल्या समाजाची स्थिती आहे, ना दिशा, ना ध्येय..! वेग तरी कुठ स्वत:चा आहे, वारा नेईल तसं भरतटत जायचं आणि मी उच उडतोय की तो अशी निरर्थक स्पर्धा लावायची, ती ही आपण दोघही वाऱ्याच्या मर्जीनर भरकटतोय याचं भान विसरून..!
यंदाचा दहावीचा निकाल स्मरणशक्तीचा होता, गुणवत्तेचा नाही. स्मरणशक्तीही फक्त पाठ केलं तेवढीच. त्यातही परिक्षेत विचारलेल्या प्रश्नांपुरतीच. सर्व मुलं नसतील तशी, पण निकालाची टक्केवारी, बहुसंख्य मुलं तशीच असावी या वास्तवतेकडेच बोट दाखवते. बहुतेक शाळांचा निकाल ९५ टक्क्यांच्या पुढेच लागलाय. हल्ली म्हणे पास होण्यासाठी मुलांना फक्त पंधरा मार्क्सच मिळवावे लागतात, कारण विस मार्क्स शाळाच देते आणि ते सरसकट देते कारण शाळांना आपला रिझल्ट जास्तीत जास्त लागलेला दाखवावा लागतो नाहीतर पुन्हा नविन पोरं येणार कशी यांच्याकडे? हे विस मार्कही जे महाभाग मिळवू शकत नाहीत त्यांची बुद्धीमत्ता मात्र तपासून पाहीली पाहीजे एकदा, खरे हिरे बहुतेक त्याच ‘कचऱ्या’त असावेत. हिरे कमीच असतात नाहीतरी खाणीत, दगडांचीच संख्या जास्त..!
हा लेख लिहीण्यामागे उत्तम गुणांनी उत्तिर्ण झालेले विद्यीर्थी आणि त्यांचे पालक यांचा हिरमोड करून त्यांच्या आनंदात बिब्बा घालण्याचा इतकाही हेतू नाही. मला तो अधिकारही नाही. मात्र त्यांना वास्तवतेचं भान यावं हा हेतू हा लेख लिहीण्यामागे मात्र निश्चितच आहे.
काल-परवा लागलेला एसएससीचा निकाल भविष्यातील एका भयानक घटनेची पूर्वसुचना देतोय असं मला राहून राहून वाटतंय..दिशाहीन शिक्षण पद्धती म्हणजे आपला अभ्यासक्रम….! एकतर आठवीपर्यंत परीक्षाच नाही,, हेतू हा कि, शैक्षणीक गळती थांबवणे, त्यानंतरच्या दोन परीक्षेत एवढे गुण म्हणजे, वेडाचार हा एकच शब्द येतो…कसली गुणवत्ता न् कसलं काय…नापासांची संख्या घटावी या एकमेंव बावळट हेतूनं हे सर्व होतंय, किंवा केलं जातंय असं मला वाटतं. ह्याने आपण काय साध्य करणार आहोत, हे मात्र कुणालाच सांगता येत नाही कारण त्याचा विचारच कुणी केलेला नाही.
ही जी काही मोठ्या संख्येने ‘मार्क्सवंतां’ची छापील फौज आज जी बाहेर पडतेय, ती बहुत करून इंजिनिअर, डाॅक्टर, बीएमएम, बीएमएस, बीबीआय, एमबीए वैगेरे अभ्यासक्रमांवर तुटून पडणार. ते तसेच तुटून पडावेत अशी तथाकथीत आक्रमक सम्राट महंमद घोरी किंवा बाबराप्रमाणे आपल्या शिक्षणसम्राटांची इच्छा असावी कारण त्यांचे शिक्षणाचे माॅल चालायला हवेत. आपल्या अमुकच का व्हायचंय आणि तमुकच काॅलेजातनं का, असा अशा मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा कानोसा घेतला, तर जे उत्तर मिळतं ते कपाळावर हात मारून घ्यावं असं वाटायला लावणारं असतं. त्या काॅलेजमधे चांगल्या कंपन्या नोकरी देण्यासाठी येतात म्हणून म्हणे..! ‘काॅलेजची पात्रता त्यात कॅंपस मध्ये कुठल्या कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी येतात, त्यात काय दर्जाचं शिक्षण नाही’ हे तर चिंताजनक उत्तर आहे. अर्थात चांगले मार्क्स याचाच अर्थ चांगले ‘गुण’ म्हणजे चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी असा झाल्यावर असं होणारच.
पैसा आणि पर्यायाने नोकरीला एवढं महत्व आलं की असं होणारच. पण आपण एक लक्षात घेत नाही, की येवढ्या मोठ्या संख्येनं उत्तिर्ण होणाऱ्या आणि काही ठराविक अभ्यासक्रमांच्याच मागे लागणारांना, येवढ्या मोठ्या संख्येनं नोकऱ्या कोण देणार? इथं अर्थशास्त्राचा, डिमांडपेक्षा सप्लाय जास्त झाला की वस्तूची किंमत कमी होते, हा नियम लागू होतो. ज्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात या हेतूने घेतलेलं शिक्षण, पुरेसा पैसा मिळवण्यात काहीच उपयोगी पडत नाही हे लक्षात येताच, या सुशिक्षीत फौजेला मग निराशा घेरते. माझ्या माहितीत असे शिऱ्क्षण घेतलेले अनेक इंजिनिअर्स आहेत, की जे बेकार तरी आहेत किंवा महिना १५-२० हजारांची नोकरी करत आहेत. यातून त्यांना केवळ ‘फ्रस्ट्रेशनच’ पदरात येते.
मला खरा धोका दिसतोय तो इथंच. पूर्वी एसएससीचा रिझल्ट फार-तर ५०-६० टक्क्यांच्या आसपास लागायचा. नापास झालेल्या ४०-५० टक्क्यांत एखाद-दुसरा संवेदनशील विद्यार्थी आत्महत्या करायचा. आजही करतात. आत्महत्येचं मुख्य कारण कमी मार्कांची टोचणी पेक्षा, घरचे ओरडतील हेच असायचं. पण नापासांची संख्या कमी होऊन मोठ्या संख्येने मुलं पास व्हावीत या हेतूनं शिक्षण पद्धतीत आणि मार्क्स देण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे, भविष्यात मोठ्या प्रमाणार सुशिक्षीत ‘फ्रस्ट्रेटेड’ बेकारांची फौज आपण निर्माण करत आहोत हे आपण विसरतोय. या हातांना आपल्या उपलब्ध व्यवस्थेत पुरेसं आणि त्यांच्या पदवीच्या तुलनेत सन्मानाचं काम उपलब्ध आहे की नाही ह्याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. पूर्वी नापास झाल्यावर काही मुलं आत्महत्या करत, आता मात्र मला वाटतं, की नैराश्यामुळे भविष्यातील पिढीच्या पिढी जीव तरी देईल किंवा जीव घेईल तरी. अर्धशिक्षीत आशेपेक्षा सुशिक्षीत निराशा जास्त डेंजरस असते. भविष्यात घडू शकणाऱ्या एका भयानक घटनेची पूर्वसुचना मला मिळतेय असं मी म्हणतो ती हीच..
इयत्ता पहिली ते दहावी हे शिक्षण मुलांच्या भवितव्याचा पाया असतो असं आपण म्हणतो. या मुलांना आपण पोरं समजतो आणि याच्या शिऱ्क्षणाला अर्थातच ‘पोरखेळ’ असं समजण्यास जागा आहे..! कुठल्याही गोष्टीचा पोरखेळ झाला की बट्ट्याबोळ हा होणारच. पोरांना कोण हो सिरियस घेतं? भरघोस मार्कांची खेळणी हातात दिली, की ती गप्प बसतात आपली. पण आपण एक विसरतोय, आपण ज्यांना पोरं समजून त्यांच्या हातात मार्कांची भरपूर खेळणी देतोय, ते भविष्यातले देशाचे नागरीक आहेत, ते देश चालवणार आहेत. आपण स्विकारलेल्या पैसा केंद्रीत शिक्षण पद्धतीतून, सुजाण नागरीकांपेक्षा पैसे कमावणारे भावनाहीन नागरीक तयार करत आहोत आणि भविष्यात त्यांच्या अपेक्षा पूर्ण न होऊ शकलेले आणि म्हणून निराशेने घेरलेले हे नागरीक देशाचाच पोरखेळ करून ठेवतील याचीच शक्यता मला जास्त वाटतेय..
सावध व्हा, ऐका पुढल्या हाका..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply