नवीन लेखन...

शिक्षणाचे मानसशास्त्र – प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप

To लिही, or not to लिही! That is the प्रश्न!

‘प्रश्न’ या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का – प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड. (टीप: सावधान! लेख मोठा आहे.)

प्रश्नाबद्दल प्रश्न कशासाठी?
हे दोन उदाहरण पहा.

  1. अथर्ववेदा मधे प्रश्नोपनिषद नावाचे उपनिषद ज्याचे स्वरूप प्रश्नोत्तर असे आहे. या उपनिषदाचे स्वरूप शिष्यांनी पिप्पलादांना विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं असे आहे. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान मांडले आहे.
  2. विख्यात तत्त्ववेत्ता सॉक्रेट्स आपल्या शिष्याना एक प्रश्न विचारायचे. विचार करून शिष्य उत्तर द्यायचे की ते त्यांचाच उत्तरातून उद्भवलेला प्रश्न विचारायांचा. असे करून त्यांनी सखोल आणि सर्वांगीण विचार करून प्रश्नांचे उत्तर शोधण्यास शिकवले. महान तत्त्ववेत्ता प्लेटो हा यांच्या शिष्य.
  3. दोन्ही उदाहरणं ‘प्रश्नां’चा योग्य उपयोग केल्याचा फायदा दाखवतात. प्राचीन काळा पासून यांचा सुंदर वापर दिसतो. पण काही गोष्टी अतिसामान्य गणल्यामुळे दुर्लक्षित होतात. चर्चेपेक्षा एकतर्फी भाषणावर भर, समजण्यापेक्षा मुखोदगत करण्यावर भर दिल्यामुळे प्रश्न विचारणारा ज्ञानोपासक कधी ‘आगाऊ’ झाला कळलेचं नाही.

प्रश्नां बद्दल कुठे, कधी आणि काय शिकवले जाते?
शाळेत, लहानपणी. व्याकरणात ‘क’ अक्षराचे क्रियापद आणि ? चिन्ह वापरले की झालं!

चांगला प्रश्न म्हणजे काय?
(स्वगत: काय हा वात्रटपणा.) जो प्रश्न चांगला तो चांगला प्रश्न. कळलं?
(स्वगत:- xxxx%$॥*)

प्रश्न प्रकारावर विचार करण्याचा आग्रह का?
हा शैक्षणिक साहित्याचा आणि प्रयासाचा, नव्हे एकंदरीतच महत्वाचा प्रकार आहे. बी. एड., एम. एड. अभ्यासकर्मातच काय, भाषेच्या अभ्यासात सुद्धा महत्वाचा विषय म्हणून ‘प्रश्न’ प्रकार फारसा चर्चिला जातो असे वाटत नाही (किंवा मला माहित नाही). कुठे, कधी, केव्हा, काय प्रश्न विचारावेत, त्याची रचना कशी असावी, उत्तर कसे वाचावे / ऐकावे – एखादातरी लेख पाहण्यात यावा? असो! (प्रश्नोपनिषद चा कॉपी राईट श्री.. पिप्पलदिंकडे आहे आणि या बडबडीला अजून फर्मास नांव काय देऊ? म्हणून प्रश्नोपचाराचे उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप!)
शैक्षणिक दृष्ट्या प्रश्नांना अनन्यसाधारण महत्व आहे, आणि हे महत्व फक्त परीक्षेतल्या प्रश्नासारखे गुणांकना पुरते मर्यादित नाही. प्रश्न विद्यार्थाला शैक्षणिक प्रयासात सहभागी करून घेण्याचेे तंत्र तर कधी एकतर्फी व्याख्यानाला दूतर्फी संवादरूप देण्याचा मंत्र आहेत. (वर्गात झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला पकडण्याचे यंत्र सुद्धा आहे.) प्रश्न विचारल्याने वक्त्याला कुठे विस्तार करावा, कुठे आवरते घेऊन पुढे जावे, तर कुठे दोन पावले मागे येऊन पुन्हा सांगावे हे कळते. श्रोत्यांना आपण जे श्रवण करतो, ज्याचे दर्शन घडते आहे ते पटतं, समजतं, ग्राह्य, योग्य, तर्कशुद्ध आहे का अशा अनेक शंकांचे उत्तर मिळते.

इतक्या सामान्य गोष्टीवर चर्चा कशाला आणि कशाची?
सर्वात जास्त उपयोग परीक्षेमधे होतो आणि तिथे सुद्धा प्रश्न अत्यंत विचार पूर्वक घडवावे लागतात. अभ्यासक्रमाचा चौफेर आढावा, कमी अधिक काठिण्य मिश्रण, असंदिग्ध रचना… हेच पहा ना, परीक्षेत केवळ १ आणि 2 अंकी संख्येच्या बेरजा वजाबाकी करण्याचे प्रश्न विचारले, तर अंक गणित चांगले येते असे म्हणता येईल? (भाजीवाली मावशी चटाचटा हिशोब करतात म्हणून काही त्यांना गणित तज्ञ म्हणता येणार नाही. त्यांना वर्गमूळ) चे गणित जमेल?)

व्याख्यानामधे श्रोत्यांना सहभागी करण्याचे, ध्यान आकर्षित करण्यासाठी किंवा महत्व ठासून सांगण्यासाठी … कितीतरी उपयोग आहेत आणि म्हणून अभ्यास महत्वाचा. ईथे महत्व ठासून सांगण्यासाठी जे म्हटले आहे, त्यासाठी कोणता प्रश्न प्रकार वापराल? त्याच शब्दांकन कसे कराल? पहा विचार करून.

शैक्षणिक साहित्याच्या विशिष्ट घटकांचा शोध मी मानस शास्त्राचा माग घेऊन बघतो आहे. तोच विषय आता त्या घटकांच्या तपशीलाकडे निर्देश करतो आहे. प्रश्न प्रकार हा फारच महत्वाचा घटक. पण केवळ ‘प्रश्न प्रकार’ जाणून चालणार नाही, तर त्यांची रचना, व्याकरण, प्रकार, उद्दिष्ट आणि उपयुक्तता पहावी लागेल. विषय प्रथमदर्शनी बाळबोध वाटला तरी तो महत्वाचा म्हणून त्याला औपचारिक स्वरूप दिले पाहिजे असे वाटते. प्रयत्नम समरपयामी!

प्रश्नांचे काही प्रकार वगैरे असे वर्गीकरण करता येईल का?
इंग्रजीत ओपन एन्डेड, क्लोज एन्डेड असे प्रश्न प्रकार आढळतात. मराठीत असे काही वर्गीकरण आहे का नाही हे मला माहित नाही. त्यामुळे मी माझ्या परीने इंग्रजी वर्गीकरण प्रमाण मानून घोड दामटतो. (भविष्यात तुमच्या सूचना पाहून सुधारणा करता येईल.)

  1. खुले (Open ended) प्रश्न (वर्णनात्मक किंवा मुक्त अभिव्यक्ती प्रश्न)
    असे प्रश्न उत्तर देणाऱ्याला आपला विचार मांडण्यास संपूर्ण स्वातंत्र्य देतात. उत्तराचा विशिष्ट साचा, दिशा, परिपूर्णता असावी ई. कुठल्याही अटी नसतात. हे प्रश्न उत्तर देणाऱ्याशी संवाद साधण्यासाठी, त्याचे विचार, समज-उमज जाणण्यासाठी उपयुक्त असतात. उत्तराचा आधार घेऊन संवाद पुढे नेण्यासाठी वाव असतो.
    उदा:
    दिवाळीत फटाके उडवण्यावर तुमचे काय मत आहे? (पूर्णपणे मुक्त विचार)
    दिवाळी मध्ये फटाक्यांचा वापर करणे कितपत योग्य आहे? (विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न दिसतो, तरीही खुला प्रश्न.)
  2. बंद (Close ended) प्रश्न
    या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आणि स्वच्छ असते. त्यावर एकच प्रतिक्रिया असू शकतो चूक किंवा बरोबर. चर्चा, संवाद, किंवा विस्तार नसतो. ऊत्तर बरोबर किंवा चूक का आहे हा पुढचा प्रश्न किंवा प्रतिक्रिया होते. प्रश्नाप्रमाणेच शैक्षणिक उपयोगही रोखठोक आहे. ज्ञात आहे का नाही, येतं का नाही असा सरळ स्पष्ट निष्कर्ष मिळतो. यात व्यक्ती किंवा स्थिती विशिष्ट असे काही नसते. सब्जेक्टिव्हिटी नाही, असल्यास प्रश्न सदोष होतो. पक्षपात होत नाही.
    उदा:
    पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा प्रवेग किती? (एकाच उत्तर बरोबर आणि त्यावर चर्चा नाही.)
    भारतात विविध संस्थांना मतदानाचा हक्क कोणाला मिळतो? (अनेक उत्तर आहेत, पण तरीही बंद प्रश्न.)

बंद आणि खुले, या वर्गीकरणा व्यतिरिक्त अजूनही प्रकार आहेत का?
होय, बहुतेक प्रकार प्रश्नाच्या स्वरूपावर आणि उद्दिष्टावर केलेले आहेत. त्यातले प्रमुख:

  • शोधक प्रश्न. (Probing) हा प्रकार खोलात जाण्याचा प्रयत्न करतो. आधी दिलेल्या उत्तराच्या किंवा कथनाच्या अनुषंगाने विचारले जातात. उदा: विक्रमादित्य वेताळ गोष्टीमधे विक्रमादित्याला वेताळ कुठे भेटला? उदा: विक्रमादित्य जंगलात का गेला होता? विक्रमादित्याने मौन का सोडले? वेताळाच्या अटी काय होत्या?
  • सूचक प्रश्न. (Leading) प्रश्नच उत्तराची सुचना देतो. सर्वतोपरी वर्ज्य प्रकार मानला जातो. चित्रपटातले वकील अशा प्रश्नांना ऑब्जेकॅशन म्हणत हरकत घेतात आणि न्यायाधीश सस्टेंन्ड ओवर रूल्ड म्हणताना आपण पहिलेच आहे. उदा: राखी पौर्णिमा हा शुभ दिन आहे हे हिंदू म्हणून तुम्हाला मान्य आहे ना?
  • गृहिताग्रही प्रश्न. (Loaded) या प्रश्नात पूर्व गृहितांचा किंवा हेतूंचा आग्रह. उदा. मूक प्राण्यास दगड मारणे कधी थांबवलेत? (इथे उत्तर देणारा दोषी आहे हा पूर्वगृह दिसतो.)
  • भावनात्मक उद्गार दर्शक. (Rhetorical) उत्तराचे अपेक्षा नाही, केवळ भावना व्यक्त करण्यासाठी उपयुक्त. उदा: टू बी ऑर नॉट टू बी? दैव जाणिले कुणी?
  • फसवा प्रश्न (Trick) हा प्रश्न दिशाभूल करणारे शब्दांकन वापरतो. करमणुकीसाठी उत्तम. उदा: एका मुंगीच्या मागे दोन आणि पुढे दोन मुंग्या उभ्या आहेत. एकूण किती मुंग्या आहेत?

अजूनही बरेच विशेषण लावून प्रकार वेगळे करता येतील, पण उद्दिष्ट शैक्षणिक साहित्याचे घटक होण्यास पात्र प्रश्ना पुरता मर्यादित आहे. (तुम्ही काही सुचवले तर लेखात समाविष्ट करीन.)

प्रश्नांचा शैक्षणिक उपयोग पाहण्यासाठी कुठले इन्स्ट्रक्शनल मॉडेल वापरावे?
(इंग्रजीत ‘इन्स्ट्रुकॅशन’ चा अर्थ शिकवण्याच्या उद्दिष्टाने दिलेल्या सूचना असाही आहे.)
इन्स्ट्रक्शनल मॉडेल्स बरेच आहेत. प्रत्येक मॉडेल काही विशिष्ठ अंगाने रचलेले आहे. मूळ तत्व शिक्षणाच्या मानस शास्त्रात असलेल्या चार दर्शनांवर आधारित आहेत. (4 schools = behavioural, cognitive, constructive and humanity) प्रो. डेविड मेरील यांनी सर्व दर्शनांचा आणि अभ्यासाचा आढावा घेत एक सर्व समावेशक मॉडेल मांडण्याचा प्रयास केला आहे. त्यावर आधारित एक साधा ढाचा मांडतो. शिकण्याच्या प्रक्रियेची एक सोपी सांकेतिक रचना अशी करता येईल:

  1. ज्ञानदान — ज्ञान मिळवणे / देणे (Delivery) =====>
  2. सक्रिय संवाद — पूर्व ज्ञान, ई. वापरून विचार प्रक्रिया जागृत करणे (Interaction) =====>
  3. अनुभूती — आत्मसात करणे, अनुभव, वापर प्रयोग, स्मृती (Internalisation) =====>
  4. सिद्धी — कौशल्य, कसब, स्मृती, संज्ञान, पूर्व ज्ञान कोशात ज्ञान समाविष्ट करणे unknown to known (Assimilation & Integration) =====>(पुन्हा 1. ज्ञानदानाकडे …)

शैक्षणिक उपयोग पाहण्यासाठी मांडलेल्या इन्स्ट्रक्शनल मॉडेल मध्ये विविध प्रश्न प्रकार कसे वापरता येतील?

ज्ञानदान — (Delivery of instruction)

  • बहुतेक लेक्चर बोर होतात हे आता सर्वश्रुत आहे. आणि प्रत्येक शिक्षक हा चांगला वक्ता असतोच असे नाही. एकतर्फी संवाद हा दूतर्फी करण्यासाठी प्रश्नांचा उपयोग चतुरपणे करावा लागतो. इथे बंद प्रश्न उपयोगाचे आहेत का? खुला प्रश्न विचारला आणि सत्र भरकटले तर? प्रश्नांची योजना अतिशय काळजी पूर्वक करावी लागते. जे तत्व सांगितले आहेत त्याचा पुनरुच्चर करण्यासाठी बंद प्रश्न कामास येतात. खुला प्रश्न विचारून अनेक विचारधारा प्रकट करवून समावून घेता येतात. सूचक प्रश्नांनी चर्चेला दिशा देण्यास उपयोगी पडतात. शोधक प्रश्न विचारांचे पैलू पाकळ्या उलगडतात, तर कधी भावनात्मक उद्गार प्रश्न लक्षवेधी ठरतात… सांगावे तितके थोडे!
  • डिस्कवरी लर्निंग आणि सॉक्रेटिक क्वेस्चनिंग टिचिंग टेकनिक दोन्ही प्रश्नोत्तरावर आधारित आहेत. Dick and Carey Instruction Design Model मधे शैक्षणिक प्रयासाची सुरवात चाचणी प्रश्नांनी होते. शिकणाऱ्याची पूर्वज्ञान तयारी तपासून पुढे अभ्यास क्रमाची (lesson plan) योजना आखण्यात येते. Professor M. David Merrill – The First Principles of Instruction मधे ज्या Activation प्रक्रियेची चर्चा करतात ती बहुतांशी प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. गॅनिये, वायगोत्सकी, कोलब् … सर्व Schema आणि Scaffolding या संकल्पना प्रश्नोत्तराचा योग्य वापर गृहीत धरतात.

सक्रिय संवाद — (Interaction with content, Comprehension)

  • वर्गात (क्लासरूम किंवा फेस टु फेस) शिकवताना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला खुले (ओपन एन्डेड) प्रश्न चांगलेच उपयोगी आहेत. एका विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरावर दुसरा बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो, मुद्दे पुढे नेऊ शकतो. शिकवणाऱ्याला विद्यार्थ्यांची समज, जाण, खोली, व्याप्ती, प्रगल्भता अशा अनेक शैक्षणिक निर्देशकांची जाणीव देतो. ह्याचा उपयोग पुढची अध्ययन कृती ठरविण्यास होतो. स्वाध्याय (सेल्फ स्टडी पद्धतीत खुले प्रश्न विचार करायला आणि विषयाचा कथनाशी /, मजकुराशी सक्रिय संवाद (इंटरऍक्शन) साधण्यास मदत करतात. या प्रश्नांना खोदून विचारणाऱ्या (प्रोबिंग) प्रश्नांची जोड दिली तर शैक्षणिक दृष्ट्या उत्कृष्ट प्रयास होतो. (Socratic questioning technique).
  • पण या प्रश्न प्रकाराचे गुण त्याचेच दोष होऊ शकतो. घडणारी चर्चा किंवा संवाद अनियंत्रित असल्या मुळे कुठे नेईल हे सांगता येत नाही. परीक्षेत याचे मूल्यांकन हे तपासणाऱ्याच्या व्यक्तिगत आवडी निवडीवर (सब्जेक्टिव्ह) अवलंबून असते. पक्षपाताच आरोप टाळणे अवघड असते. म्हणून अश्या प्रश्नांना थोड्याफार प्रमाणात अपेक्षांचे निर्देश दिलेले उपयुक्त ठरतात. याचा कौशल्यपूर्ण उपयोग शिकून सरावाने समर्थ करावा लागतो.

अनुभूती — (Internalisation, Reinforcement and Recall) आणि सिद्धी — (Assimilation, Integration)

  • एकदा कानावर पडलेली किंवा वाचलेली गोष्ट दीर्घकालीन स्मृती मधे परिवर्तित होणं सामन्यात: अवघड असते. पाहिलेल्या गोष्टी थोड्या जास्त आणि केलेल्या गोष्टी बऱ्याच जास्त स्मरणात राहतात. पण घटनेची ढोबळ स्मृती कामाची नाही म्हणून त्यातली शिकवण – कथन, मजकूर, बारकावे पडताळून, विचार प्रक्रिया, चर्चा, वादविवाद करून त्याला पूरक कृतीचा जोड द्यावा लागती. स्मृती आणि ज्ञान फरक असला तरी दोन्ही हवेत. स्मृतिसाठी बंद प्रश्न उपयोगी पडतात. मल्टिपल चॉईस, गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा … (ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ) हे सर्वश्रुत प्रश्न प्रकार फारच उपयुक्त आहेत. एखाद्या वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टीचा पुनरुच्चार केला की ती स्मृतीत राहते. पण नुसती घोकम पट्टी उपयोगी नाही. मेंदूला ताण द्यावा लागतो. कदाचित मेंदूच्या ग्रे सेल्सला जोडणारे synapses व्यायामाने भक्कम होतात की काय?

विस्तार, वैशिष्ट्य, गुण दोष, निष्कर्ष, परामर्श – इथे खुले प्रश्न हवे हे सांगणे न लगे.

प्रश्नाबद्दल विशेष सूचना?
प्रश्न विषयांतर करणारे, दिशाहीन, फालतू किंवा निरर्थक असले तर शैक्षणिक दृष्ट्या असे साहित्य कमकुवत होते. तसेच उत्तर सुचवणार (give away) प्रश्न लिहून चालत नाही. शिकण्यासाठी आणि त्या शिकवणीची स्मृती दृढ करण्यासाठी बुद्धीला चॅलेंज केले पाहिजे. विचार रुपी व्यायाम घडला पाहिजे.
उदा:

  • चांगले नाही: प्रश्नाबद्दल विशेष सूचना? हेच मुळात चांगले शब्दांकन नाही. कसली सूचना – शब्दांकनाची, व्याकरणाची, प्रकाराची … ?
  • 22 भागीले 7 या गुणोत्तराला काय म्हणतात? हात, पाय, तोंड का नाक? – असे प्रश्न चांगले नाहीत.
  • असा कोणता खेळ आहे ज्यात “off” आणि “offside” संज्ञा वापरत नाहीत – क्रिकेट, टेनिस, का हॉकी? ऑफ म्हणजे क्रिकेटमधे समोरची बाजू आणि हॉकीत ऑफसईड म्हणजे फाउल. दोन वेगळ्या संकल्पनांचे मिश्रण. हा KBC मधे विचारला होता आणि तिथेच ठीक.
  1. चांगले: 22 भागीले 7 गुणोत्तराला काय म्हणतात? Archimedes’ constant, Euler’s number, Planck’s constant or Boltzmann constant?

प्रश्न तयार करणे किती अवघड आहे?
हे करून बघा: तुम्हाला दिवाळीत फटाके उडवावे का नाही ह्याच्यावर 15 मिनिटे बोलायचे आहे. श्रोत्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रश्नांनी सुरू करा, मधे सहभागासाठी एखादुसरा प्रश्न विचारा आणि शेवटी तुमच्या विचाराकडे नेण्यासाठी प्रश्न विचारा. कुठले प्रकार वापराल? पहा तरी एव्हडे चार प्रश्न लिहून!

इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा!

राजा वळसंगकर
२०/११/२०२०

 

Avatar
About राजा वळसंगकर 18 Articles
नमस्कार. मी व्यवसायाने इन्स्ट्रक्शनल डिझाइनर आहे. शैक्षणिक मजकूर / साहित्य उत्तम शिकता कसे येईल ह्याचा शास्रोक्त विचार करून ई-लर्निंग प्रणाली तयार करावी लागते. सादर करण्यासाठी नाटक / चित्रपटाच्या स्क्रिप्ट (स्टोरी बोर्ड) प्रमाणे मजकूर पुनः बांधणी करून लिहावा लागतो. नंतर या स्क्रिप्ट प्रमाणे प्रणालीकरते (प्रोग्रामर्स) संगणकावर किंवा मोबाइलवर चालणारी प्रणाली तयार करतात. सादरीकरणासाठी मजकूर अँड स्क्रिप्ट तयार करणे हे माझे मुख्य काम. ह्यातला मुख्य अभ्यासाची तोंड ओळख मराठीतुन करून देण्याचा माझा लेखन प्रपंच. अभिप्राय - प्रतिक्रिया - crabhi@hotmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..