दैनिक ‘मराठा’ च्या माजी संपादक , मराठीतील ख्यातनाम लेखिका ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका आणि ‘हायकू ’ हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणणा-या कवयित्री शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणाऱ्या लेखिका शिरीष पै. आचार्य अत्रे यांच्या शिरीष पै या कन्या. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.
लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबर्या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला, अशी पुस्तके गाजली. आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण पप्पा आणि वडिलांचे सेवेशी या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे. शिरीष पै यांचे दोन सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
मराठीतील ‘हायकू’ला प्रतिष्ठा मिळवून देणा-या शिरीष पै यांच्या गाजलेल्या काही हायकू…
पाहिला नाही असा उन्हाळा
उगवतानाच
सूर्य भडकलेला
दुरून पाऊस पाडेन
काळा ढग येतो आहे
लांबूनी जोर दिसतोय
आठवून सारे हसू येते
याचसाठी का मी
रडले होते
केव्हापासून करत आहे
काव काव कावळा
एवढा का भरून
येतो त्याचा गळा
केळीचे पान वा-यावर डुलतय
पण त्याला माहीत नाही
टराटरा फाटतंय
बागेमध्ये आनंदात फुलपाखरू
गेलं बागडून
पाऊस थांबला म्हणून
प्राचीन किल्ल्यात पाय ठेवताच
आपल्याला कळले
भूतकाळात काय घडले
Leave a Reply