नवीन लेखन...

शिष्यत्व जपा, गुरु ठायी ठायी आहेत..

गुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले प्रत्यक्ष गुरू. पण अप्रत्यक्ष, अपरिचित गुरू तर अगणीत असतात. ते देतच असतात, आपण किती घेतो आणि आपल्या वाटेला आलेला शिष्य धर्म कसा निभावतो याचा विचार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं गरजेचं ठरतं..

आमच्या मुंबईसारख्या शहरात रोज सकाळी कामासाठी बाहेर पडल्यापासून शिकायची सुरुवात होते. नेहेमीच्या बसचा कंडक्टर, बसमधूल प्रवासी, रिक्शावाला, लोकल प्रवासातील सहप्रवासी -यात प्रथम वर्गातले वेगळे आणि द्वितिय वर्गातले वेगळे-, नाक्या नाक्यावर लागलेले ‘काविळ’ झालेल्या तथाकथीत समाजसेवक, नेते यांचे बॅनर्स, रस्त्याने चालताना दिसणारी अगणित माणसं हे सारे सारे मला कसं वागावं आणि कसं वागू नये याचं अप्रत्यक्ष शिक्षण देत असतात. त्यांच्याकडून मी बरच काही शिकत असतो आणि स्वत:त ते मला देत असलेल्या अप्रत्यक्ष शिकवणीनुसार माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही बरीच सुधारणा अद्याप व्हायची बाकी आहे, याचा साक्षात्कार पुन्हा हेच चक्र दुसऱ्या दिवशी फिरताना होतो. साक्षात्कार आणि गुरूचा संबंध मला असा रोज नव्याने अनुभवायला मिळतो आणि मग मी दररोज या गुरुंच्या नव्याने प्रेमात पडत जातो..

अशाच एका क्शावाल्याने आपलं उदरभरण करणाऱ्या साधनाकडे, म्हणजे एखादा हातगाडीचा ठेला असो वा पानपट्टीची टपरी असो वा एखादं काॅर्पोरेट आॅफिस असो व अगदी हमाली असो, कसं पाहावं हे शिकवलं. त्याने त्याच्या रिक्शाला ‘चक्क ATM’ असं नांव दिलं होतं. जगातल्या सर्व ग्रंथांचा कीस पाडूनही रिक्शासाठी इतकं समर्पक नांव सुचलं नसतं, जे त्या सामान्य माणसाला सुचलं होतं. प्रेम असलं की असं छान छान सुचतं. आपले पोट भरणाऱ्या साधनाकडे प्रेमाने पाहावं हे त्या जेम तेम शिकलेल्या उत्तरप्रदेशी रिक्शावाल्याने मला शिकवलं. एका टॅक्सीवाल्याने गाडीचा हाॅर्न हा जनावरांना मागून येणाऱ्या गाडीपासून सावध करण्यासाठी असतो, माणसांसाठी नसतो, हे शिकवलं;वर ‘आजकल तो मन्सा न होने पर भी हारन बजाना पडता है साहब, क्या करे, आदमी जानवरसे भी बदतर हो गया है’ असं त्याचं अनुभवसिद्ध ज्ञानही साध्या सोप्या शब्दात दिलं. राजकारणी-भ्रष्ट अधिकारी समाजात कसं वागू नये याची शिकवण तर सकाळ संध्याकाळ देत असतात, ते ही गुरुच..!!

असं रोज काही ना काही आपल्याला शिकवून मला माझ्या शिष्यधर्माची सातत्याने याद दिलवणारे सर्वच मला गुरुस्थानी वाटतात. ‘मला समजते ते सर्व काही नाही’ हे माझं आवडतं वाक्य अशाच गुरुंची मला मिळालेली मोलाची शिकवण आहे. हे गुरू मला सातत्याने जमिनीवर राहाण्यास मदत करत असतात..

दररोज भेटणाऱ्या या सर्व गुरुंसारखाच पुस्तकं हा माझा महत्वाचा गुरू. सदा सर्वकाळ माझी संगत करणारा. लोक मुद्दाम टाईम अॅडजस्ट करून, आजुबाजूला जाहिरात करत ‘सत्संग’ करायला जातात. अलिकडे तर सत्संग हा स्टेटस सिंम्बीॅल झालाय हे पेप्रात येणाऱ्या जाहिरातींवरून समजतं. पण पुस्तकाचा सत्संग करायला कुठंही जावं लागत नाही. तेच बिचारं माझ्या झोळीत (पक्षी सॅकमधे. मी झोळीच वापरतो, म्हणून मी झोळी म्हणालो) निवांत बसून माझा संग करत सोबत प्रवास करत असतं. सोबत एखादं पुस्तक आहे ही भावनाच किती आश्वासक असते, हे ज्याने अनुभवलंय त्यांनाच कळेल. सतत सोबत करणारा, अबोल मार्गदर्शन करणारा पुस्तक हा एकमेंव गुरू. कोणतीही बंधनं नाहीत की बंधं नाहीत, व्रत नाही की सोहळे नाहीत की काहीच अवजड प्रथा-परंपरा नाहीत.

आपण कल्पना करू शकणार नाही एवढं सामर्थ्य या गुरुत आहे. मी माझ्या गुरुच्या या सामर्थ्याचा मन:पूत अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो. तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या साऱ्या- साऱ्याचा विसर पाडून क्षणात समाधी अवस्थेत नेणारा हा विलक्षण गुरु आहे. मेडीटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी स्वतःशी एकरूप होणं हा असतो, हे मला ऐकून माहित आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे. आणि ती समजूत जर खरी असेल, तर मी खात्रीने सांगू शकतो, की पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. मी ध्यान, योग, अध्यात्म यांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणारांना मिळत असेल, त्यापेक्षा मला पुस्तकातून मिळणारी अनुभूती त्या पेक्षा कणभरही कमी नाही. पुन्हा या गुरूशी रमणाम होण्यासाठी कोणतीही विशिष्ट जागा, उदबत्तीचा सुगंधी धूर, मंद प्रकाशयोजना, गूढ गंभीर स्वरातले मंत्रोच्चार किंवा आणखी काही इत्यादी कशाचीही गरज भासत नाही. पुस्तक गुरूशी एकरूप होऊन, त्या गुरूच्या हृदयीचे माझ्या हृदयी येण्यासाठी गर्दीचा रस्ता, रेल्वेचा फलाट, उडप्याच हॉटेल किंवा अगदी स्मशानही चालतं. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव होऊन गेलेल्या त्या संताना आला असेल तो असेल, पण या गुरूशी तादात्म्य पावण्याचा माझा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नाही. समाधी लागणं, मला वाटतं, यालाच म्हणत असावेत..!!.

या गुरुचं वैशिष्ट्य म्हणजे, याने ‘मी सर्वज्ञानी नाही’’ याची जाणीव माझ्यात सतत तेवत ठवली. एक पुस्तक वाचून मला काहीतरी समजतंय न समजतंय, तोवर दुसर त्याच विषयावरचं, परंतु वेगळी मांडणी असणारं पुस्तक हातात पडतं आणि ‘आपल्याला काही समजत नाही’ ही जाणीव आणखी तीव्र होते. मला वाटतं, आपल्याला काही समजत नाही किंवा आपल्याला जे जे समजतं असं वाटतं, ते सर्व काही नसतं, ही भावना आपल्यात निर्माण करून, ज्ञानाच्या दिशेने आणखी चार पावलं नेऊन आपली विचार शक्ती विकसित करणारा पुस्तकासारखा अन्य दुसरा गुरु नाही. माझ्यातलं शिष्यत्व सतत जागतं ठेवणारा हा माझा आणखी एक गुरु.

अनुभव हा आणखी एक गुरु. कोणताही गुरु माणसाला शहाणा करतो, असं आपण म्हणतो. अनुभवाच्या बाबतीतही हे आपण म्हणू शकतो. ‘म्हणू शकतो’ हा शब्द प्रयोग करण्यामागे, अनुभवाने माणूस शहाणा होतोच असं नाही, हा अनुभव आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण म्हणूनच ठीक आहे. अन्यथा प्रत्यक्षात पुढच्यासही ठेच आणि मागच्यासही ठेचच, हा अनुभव आपल्याला वारंवार आला नसता. सध्या तर इथे आपण दुसऱ्याच्या सोडाच, स्वतःला लागलेल्या ठेचेतूनही काही शिकावयास तयार नाहीत, हे वारंवार सिद्ध होतंय. इथे गुरु चुकत नाही, तर शिष्य या नात्याने आपण चुकतो. गुरु मोठा असेल, तर शिष्यही त्याच तयारीचा लागतो. इथे कस लागतो तो आपल्यातल्या शिष्याचा. सध्याच्या सर्वत्र अविश्वास भरून राहिलेल्या काळात तर गुरूपेक्षा शिष्याची जबाबदारी खूप वाढलेली आहे. मोबाईलवर येणारे परंतु बुद्धीला न पटणारे मेसेजेस, नेत्यांच्या कोलांट उड्या, धार्मिक आणि जातीय उन्माद, आपल्या सर्वांच्यातच निर्माण झालेले पैशांचे अतोनात महत्व आणि त्यातून लयाला गेलेली माणुसकी ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वानुभावाच्या कसोटीवर घासून त्या प्रमाणे आपलं वर्तन करायची आपण शिष्य म्हणून आपली जबाबदारी आहे. खऱ्या-खोट्याची शहानिशा कशी करावी, हे अनुभव शिकवतच असतो, आपण शिकत नाही ह्याची खंत आहे.

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूच महात्म्य सांगणारे, गुरुकडून काहीतरी शिकलो म्हणून गुरुचे उपकार स्मरणाऱ्या हजोरो मेसेजेसचा धुंवाधार पाउस पडतोय, पण गुरूने दाखवलेल्या मार्गावर त्यापैकी कितीजण चालताहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर पदरी निराशाच पडेल याविषयी मला तरी शंका नाही. आपण आजवरच्या आयुष्यात जे जे काही शिकलो, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही चांगलं शिकवलं त्या शिकवणुकी प्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हीच खरी गुरुदक्षिणा असेल.असं केलं तरच त्या गुरुपौर्णिमेला अर्थ..!!

गुरुपौर्णिमा हा केवळ शुभेच्छा (ह्या का देतात हे मला अद्याप समजलेलं नाही. एकाने तर गेल्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्याही शुभेच्छा दिल्या होत्या.) देण्याचा दिवस नाही, तर आपल्यापैकी प्रत्येक शिष्याने अंतर्मुख होऊन, आपण ज्या ज्या गुरुकडून जे जे काही शिकलो त्या प्रमाणे आपण स्वत: वागतो आहोत का, याचा विचार करण्याचा, आपल्यातलं. शिष्यत्व सतत जागतं आहे का हे तपासण्याचा दिवस आहे, अस मी समजतो..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..