
एखाद्याचं लक्ष वेधण्यासाठी, त्याला साद घालण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीला दाद देण्यासाठी तोंडानं जोरात शिटी वाजवली जाते. अशी शिटी म्हणजे फक्त एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी असतो. या शिटीत भाषेशी संबंधित कोणताही अर्थ दडलेला नसतो. सर्वसाधारणपणे अशी शिटी ही जरी अर्थहीन असली तरी, आज काही ठिकाणी शिटी ही चक्क संभाषणासाठीही वापरली जाते आहे. तोंडानं केलेल्या संभाषणाप्रमाणे शिटीद्वारेसुद्धा व्यवस्थित संभाषण होऊ शकतं. शिटीवर आधारलेल्या अशा भाषा आज जगभर किमान ऐंशी ठिकाणी तरी वापरल्या जात आहेत. यापैकी, आफ्रिका खंडाजवळ असणाऱ्या कॅनरी बेटांपैकी ला गोमेरा बेटावर वापरली जाणारी शिटीच्या स्वरूपातील सिल्बो ही स्पॅनिश भाषा आणि तुर्कस्तानमध्ये वापरली जाणारी शिटीच्या स्वरूपातली तुर्किश भाषा – या दोन भाषांना तर, युनेस्को या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांस्कृतिक शाखेकडून सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यताही दिली गेली आहे. हा सांस्कृतिक वारसा वैज्ञानिकांच्याही संशोधनाचा विषय झाला आहे. फ्रांसमधील ग्रेनोबल तंत्रज्ञान संस्थेतले भाषातज्ज्ञ प्रा. ज्यूलिअन मेयर यांनी काही महिन्यांपूर्वीच या विषयावरील संशोधनाचा आढावा ‘अॅन्यूअल रिव्ह्यू ऑफ लिंग्विस्टिक्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केला आहे.
शिटीच्या भाषा साधारणपणे जंगलांनी व्याप्त प्रदेशात किंवा डोंगराळ प्रदेशात वापरल्या जातात. अशा दुर्गम ठिकाणी दूरवरील व्यक्तीशी संपर्क साधणं, हे अत्यंत कठीण असतं. काही वेळा ज्याच्याशी संपर्क साधायचा तो माणूस दिसू शकत नसतो; तर काही वेळा माणूस दूरवर दिसत असतो, परंतु त्याच्यापर्यंत प्रत्यक्ष पोचणं हे जिकिरीचं ठरू शकतं. निव्वळ ओरडून त्या दूरच्या व्यक्तीपर्यंत आपला निरोप पोचवणं, हेही अशा परिस्थितीत कठीण ठरतं. अशा वेळी ही शिटीची भाषा अत्यंत उपयुक्त ठरते. शिटीचा आवाज हा सर्वसाधारण ओरडून सांगण्याच्या तुलनेत सुमारे दहापट दूरवर पोचू शकतो, तसंच तो अधिक स्पष्टपणे ऐकू येतो. शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.
शिटीची भाषा ही त्या-त्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेवर आधारलेली असते. नेहमीच्या भाषेप्रमाणेच शिटीच्या भाषेतही पूर्ण वाक्यं बोलली जातात. किंबहुना, बोलल्या जाणाऱ्या भाषेतले शब्दंच हे शिटीच्या स्वरूपात रूपांतरित केले जातात. मात्र शिटीच्या भाषेतली वाक्यं सोपी असतात व बोलण्याचा वेग हा नेहमी बोलण्याच्या भाषेच्या वेगापेक्षा काहीसा कमी असतो. बोलल्या जाणाऱ्या भाषांतले ध्वनी हे स्वररज्जूंद्वारे निर्माण केले जातात, तर शिटीच्या भाषातले ध्वनी हे तोंडाच्या पुढच्या भागातील हवेच्या दाबातल्या बदलांद्वारे निर्माण केले जातात. शिटीद्वारे योग्य तो ध्वनी निर्माण करण्यासाठी ओठ, जीभ, दात, जबडा, बोटं, इत्यादींचा वापर केला जातो. आवाजाची तीव्रता वाढवण्यासाठी काही प्रकारांत, तोंडावर विशिष्ट प्रकारे हातही धरला जातो. प्रत्येक प्रकारच्या शिटीचं वैशिष्ट्य वेगवेगळं असतं. एखाद्या ठिकाणी कोणत्या प्रकारची शिटी वापरली जाते, हे त्या-त्या परिसराच्या स्वरूपावर अवलंबून असतं. साधारणपणे दाट जंगलात वावर असणाऱ्यांकडून, ओठांच्या वापराद्वारे तसंच तोंडावर हात धरून शिटी वाजवली जाते. याउलट डोंगराळ भागात, जिथे शिटीचा आवाज दूरपर्यंत पोचवायचा असतो, तिथे शिटीसाठी ओठांबरोबर दातांचाही वापर केला जातो. शिटीच्या भाषेचा वापर मेंढपाळ, शेतकरी, शिकारी, हे निरोपांच्या देवाणघेवाणीसाठी करतातच; परंतु तुर्कस्तानच्या काही भागातील शेतकरी तर शिटीच्या भाषेचा उपयोग दूरवरच्या सहकाऱ्यांबरोबर संभाषणासाठी, गप्पा मारण्यासाठी, हास्य-विनोदासाठीही करतात.
शिटीचा आवाज दूरवर पोचण्याचं एक कारण म्हणजे शिटीच्या आवाजाची तीव्रता! शिटीचा आवाज हा मानवी आवाजाच्या कमाल तीव्रतेच्या दहापट तीव्र असू शकतो. शिटीच्या भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या कंपनसंख्येची व्याप्ती ही सेकंदाला फक्त एक हजार ते चार हजार इतकी मर्यादित असते. या कंपनसंख्येत अतिशय जोरदार शिटी वाजवणं शक्य असतं. निसर्गात इतरत्र या कंपनसंख्येचा वापर कमी होत असल्यानं, या कंपनसंख्येत इतर ध्वनींद्वारे फारशी ढवळाढवळ होत नाही. त्यामुळे इतर आवाज असतानाही, शिटीचा आवाज दूरपर्यंत स्पष्टपणे ऐकू येतो. शिकार करणाऱ्या जमातींच्या दृष्टीनं एक वेगळा फायदा म्हणजे, प्राण्यांना हा आवाज माणसाचा असल्याचं कळत नाही व ते बेसावध राहतात.
आपण बोलणाऱ्याच्या दोन अक्षरांतील फरक ओळखू शकतो. उदाहरणार्थ ‘क’ आणि ‘ख’. शिटीतही असा दोन अक्षरांत फरक करणं हे शक्य असतं. शिटीच्या भाषेत स्वर आणि व्यंजनं हीसुद्धा वेगवेगळी दाखवता येऊ शकतात. त्यामुळे त्या-त्या भाषेतली वाक्यं शिटीच्या स्वरूपात बोलता येतात. या कारणांमुळेच शिटीद्वारे संभाषण करणं, अनेक भाषांत शक्य होतं. मात्र ज्या भाषांत अक्षरांची निर्मिती करताना कंपनसंख्येतील बदलाचा वापर केला जातो, त्या भाषांच्या बाबतीत मात्र शिटीच्या भाषेवर काही मर्यादा येतात. यासाठी प्रा. ज्युलिअन मेयर चिनी भाषेचं उदाहरण देतात. चिनी भाषेत एकच शब्द हा कंपनसंख्या बदलून वेगवेगळ्या अर्थी वापरला जातो. उदाहरणार्थ, चिनी भाषेतला ‘मा’ हा शब्द. एका ठरावीक उच्च आणि स्थिर अशा कंपनसंख्येत त्याचा वापर केला की या शब्दाचा अर्थ होतो ‘आई’. मात्र हाच शब्द एका विशिष्ट पद्धतीनं, वर-खाली होणाऱ्या कंपनसंख्येनं उच्चारला की त्याचा अर्थ होतो ’घोडा’. शिटीच्या भाषेसाठी फक्त तोंडाच्या पुढील भागाचा वापर केला जात असल्यानं, या भाषेत कंपनसंख्येत फार बदल करणं शक्य नसतं. त्यामुळे कंपनसंख्येवर आधारलेल्या भाषांतले काही शब्द शिटीच्या भाषेद्वारे वेगवेगळे उच्चारणं, शक्य होत नाही.
शिटीच्या भाषांचा अभ्यास हा विविध कारणांनी महत्त्वाचा आहे. बोललेल्या भाषा ऐकल्यानंतर त्याला मेंदूचा प्रतिसाद कसा व कोणत्या भागाकडून मिळतो, हे संशोधकांकडून अभ्यासलं जात आहे. या संशोधनासाठी नेहमीच्या भाषांपेक्षा शिटीची भाषा अधिक उपयुक्त ठरू शकते. कारण, नेहमीचं बोलणं हे ध्वनीशास्त्राच्या दृष्टीनं अतिशय गुंतागुतीचं आहे. त्यामानानं, मर्यादित कंपनसंख्या वापरल्या जात असल्यानं, शिटीची भाषा ही या संशोधनासाठी निष्कर्ष काढण्याच्या दृष्टीनं अधिक सोयीची ठरू शकते. शिटीच्या अभ्यासाचं आणखी एक महत्त्व हे थेट मानवी उत्क्रांतीशी संबधित आहे. मानवी भाषांच्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला या शिटीच्या भाषांची मदत होऊ शकेल, असं काही संशोधकांचं मत आहे. शिटीची भाषा ही नेहमीच्या बोलण्यावर आधारलेली असल्यानं, ती काही बोलण्याच्या भाषेच्या आधी निर्माण झालेली नाही. तरीही उत्क्रांतीपूर्व भाषा आणि आजची ही शिटीची भाषा, यात काहीतरी साम्य असण्याची शक्यता संशोधक व्यक्त करतात. अशा या विविध कारणांनी शिटीच्या भाषेचा अभ्यास हा फक्त कुतूहलापुरता मर्यादित राहिला नसून, शरीरशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, यासारख्या विज्ञानाच्या विविध शाखांतही तो संशोधनप्रिय झाला आहे.
आभार: डॉ. राजीव चिटणीस.
(विज्ञानमार्ग संकेतस्थळ)
छायाचित्र सौजन्य: Ministry of Culture and Tourism – Turkey.
Leave a Reply