शिवसेना या संघटनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने स्थापन झालेल्या संघटनेचे मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना असे नामकरण केले.
मा.प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली होती. मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली होती. या शपथेचा मसुदा होता आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा. शिवसेनेची स्थापना झाल्यावर २६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते ‘शिवसेना’!
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तब्बल चार लाख लोक जमले होते. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरले होते. विशेष म्हणजे, दादर रेल्वे स्थानकावरून शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते फुलून गेले होते. शाहीर साबळे यांच्या गाण्याने मेळाव्याची सुरुवात झाली. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार म्हणाले, ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला, या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे!
शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याची मार्मिकमधील जाहिरात.
मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा भव्य मेळावा.
मार्मिक कचेरी :
७७- ए रानडे रोड, शिवाजी पार्क,
मुंबई-२८, डीडी
फोन : ४५२८९२
दि. २७ आक्टोबर १९६६
जय महाराष्ट्र वि. वि.
महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतीक्षेचा माथा ठेवून महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा मेळावा रविवार दि. ३० आक्टोबर १९६६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, शिवाजी पार्क, दादर येथे.
भरणार आहे. आपण महाराष्ट्राचे निष्ठावंत अभिमानी. आपण या मेळाव्याला जातीने हजर राहावे, अशी शिवसैनिकांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे.
आपला नम्र, महाराष्ट्रसेवक
– बाळ ठाकरे
शिवसेनेचा इतिहास अनेक प्रकारे लिहिला जाईल. पण त्यातील दोन गोष्टी इतिहासाला ठामपणे लिहाव्याच लागतील. त्या दोन गोष्टी म्हणजे शेवट पर्यत एका पक्षाचा एकच नेता आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात राहून जात न माणणारा आणि मित्रता कायम जपणारा नेता. असा माणूस राजकारणात आता होणे नाही. दिलेला शब्द न मोडणारा, ‘तुझी जात कोणती’ असे न विचारता निवडणुकीत तिकीट देणारा आणि १९९५चे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील सर्व छोटय़ा-मोठय़ा जातींचे तयार करून सामाजिक समतेच संदेश देणारा देशातील एकमेव नेता म्हणजे मा.बाळासाहेब ठाकरे.
शिवसेनेचे सामर्थ्य वाढले ते सामान्य माणसाला बाळासाहेबांनी ताकद देऊन मोठे केले आणि ते स्वत: सत्तेपासून दूर राहिले म्हणून. आपल्याभोवती जमलेल्या सवंगड्यांवर त्यांनी विश्वास टाकला. त्यांना मोठे केले. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांमुळे राजकारणात मोठी झालेली जी माणसे आपण पाहतो आहोत, ती माणसे मनमोकळेपणाने आपल्या यशाचे सर्व श्रेय बाळासाहेबांना देतात, त्यात संकोच करीत नाहीत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply