जन्म.२ जून १९५७
शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवाजी फुलसुंदर यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. शालेय शिक्षणाबरोबरच वडिल आणि भावांबरोबर मोटा हाकणे, शेतीला पाणी भरणे इ. कामे ते आवडीने करत. पुणे येथील कृषी महाविद्यालयातील कृषी विषयक शिक्षणानंतर डिसेंबर १९८१ मध्ये ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचे निर्माते म्हणून दूरदर्शन मुंबई येथे रुजू झाले.
शिवाजी फुलसुंदर हे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकरी बांधवांना नेमके काय हवे याची त्यांना जाणीव होती. गावाशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांची दाहकता त्यांनी अनुभवली होती. सर्व प्रथम त्यांनी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी गीतकार शांतारामजी नांदगांवकर यांच्या सहकार्याने साकारलेले हे शीर्षक गीत “ही काळी आई,धन धान्य देई, जोडते मनाची नाती,आमची माती आमची माणसं,” घराघरात पोहचलेल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी विविध कृषीविषयक कार्यक्रमांची निर्मिती अनेक वर्षं केली आहे.
शिवाजी फुलसुंदर यांनी १९८५ साली ‘गप्पागोष्टी’ हे नवीन सदर सुरू केले.
‘आमची माती आमची माणसं’ अंतर्गत ‘मुंबई दुरदर्शन’ चा हा अनोखा पण लोकप्रिय झालेला प्रयोग होता. पुस्तकी भाषा टाळून बोली भाषेत सादर होणारा हा कार्यक्रम खूपच गाजला. आपल्या अवतीभवती वावरणारी माणसं वाड्याच्या सोप्यात, चावडीवर बसून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारत, हसत खेळत, एकमेकांना कोपरखळ्या देत शेतीची माहिती लोकांपर्यंत पोहचवायची. हा कार्यक्रम एवढा लोकप्रिय झाला की बीबीसी या जागतिक वृत्तवाहिनीने देखील त्यावेळी त्याच्या लोकप्रियतेची दखल घेतली.
शिवाजी फुलसुंदर यांचेकडे अनेक कार्यक्रमांची निर्मिती, सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली.त्यामधे सप्रेम नमस्कार, मिष्कीली, महाचर्चा, दीपावली,नवीन वर्षारंभ कार्यक्रम,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूजविषयक कार्यक्रम त्याचप्रमाणे अपना उत्सव, दहीहंडी,गणेश विसर्जन, विधिमंडळ थेट प्रसारण ह्यासारख्या कार्यक्रमांचे नियोजन आणि प्रथम थेट प्रसारण ह्याचा उल्लेख करता येईल.
त्यानंतर २००६ साली त्यांनी प्रसार भारतीच्या मार्केंटिंग विभागात “संचालक” म्हणून कार्यभार सांभाळला.तिथेही त्यांनी त्यांच्या कौशल्याची छाप पाडली.
त्यानंतर पदोन्नतीवर २०११-१४ ते अहमदाबाद येथे “DD गिरनार” ह्या गुजराती वाहिनीचे संचालक म्हणून कार्यरत होते. २०१५ मध्ये भारत सरकारचा ‘डीडी किसान’ या चॅनलचे दिल्ली येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले. या चॅनलचे कार्यक्रम नियोजन,सादरीकरण आणि प्रसारण करण्याचे श्रेय शिवाजी फुलसुंदर यांना जाते. यासाठी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी त्यांची विशेष नियुक्ती केली होती. शिवाजी फुलसुंदर यांच्या ‘ग्रीन गोल्ड’ या पर्यावरण पूरक डॉक्यूमेंट्रीला चेकोस्लोव्हाकिया येथे इकोफिल्म – ८९ या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये ‘ॲवार्ड मिळाले. त्यांनी शेती विषयक केलेल्या कामाची दखल घेऊन १९९३ मध्ये ‘वसंतराव नाईक पुरस्कार’ मिळाला. महाराष्ट्र कला निकेतनचा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ २००४ मध्ये देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने २००६ साली त्यांच्या कार्याचा ‘शेतीमित्र पुरस्कार आणि सुवर्ण पदक’ तत्कालीन राज्यपाल एस्. एम्. कृष्णा यांचे शुभहस्ते देऊन गौरव केला. अनेकदा डीडी ॲवार्डस्, ओतूर येथील श्री. गजानन महाराज शिक्षण संस्थेने ‘शिवनेरभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय निवडणूक आयोगाने शिवाजी फुलसुंदर यांचा त्यांनी ‘मतदार शिक्षण आणि जनजागृती’ यासाठी दूरदर्शन अहमदाबाद येथे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१४ साली ‘नॅशनल मिडीया ॲवार्ड’ राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी यांचे शुभहस्ते देऊन यथोचित गौरव केला. तसेच २०२० मध्ये निवृतीपश्चात आरसीएफ तर्फे “कृषी विस्तार आणि प्रसारण” या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
ते मुंबई दूरदर्शनचे (DD सह्याद्री) चे उपमहासंचालक/केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सद्या ते “वंदे किसान” ह्या सामाजिक संस्थेच्या ऑनलाईन अनौपचारिक कृषीविषयक शिक्षण प्रकल्पात कार्यरत असून त्यांचा “फेरफटका” हा कृषी,आरोग्य,संस्कृती आणि शिक्षण विषयक “युट्युब चॅनेल” ही सुरू आहे.
शिवाजी फुलसुंदर ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply