१९७३ सालातील गोष्ट आहे. बंगलोर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसची बस, ड्रायव्हर राज बहाद्दरने डेपोतून बाहेर काढली व स्टाॅपवरील प्रवाशांसाठी उभी केली. सर्व प्रवासी स्थानापन्न झाल्यावर कंडक्टरने आपल्या ‘स्टाईल’मध्ये शीळ घातली आणि बसचा प्रवास सुरु झाला. प्रत्येक थांब्यावर तो कंडक्टर बेल वाजविण्याच्या ऐवजी शीळ वाजवत होता आणि प्रवाशांची करमणूक करीत होता. त्या कंडक्टरचं नाव होतं, शिवाजीराव रामोजीराव गायकवाड! जो आज ‘रजनीकांत’ म्हणून ‘सुपरस्टार’ अभिनेता आणि त्याहीपेक्षा ‘माणूस’ म्हणून सुप्रसिद्ध आहे…ज्याला नुकताच त्याच्या सिने कारकिर्दीबद्दल सर्वश्रेष्ठ दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे!
१९५० च्या बाराव्या महिन्यात बारा तारखेला जन्म घेतलेल्या या सावळ्या रंगाच्या मुलाबद्दल जर कोणी सांगितले असते की, हा मोठेपणी भारतातील ‘सुपरस्टार’ होईल. तर कुणीही विश्वास ठेवला नसता…
दोन मोठे भाऊ, नंतर बहीणीच्या पाठचं हे शेंडेफळ! शिवाजी नऊ वर्षांचा असताना आई, जिजाबाईचं छत्र हरपलं. गरीबीच्या परिस्थितीत आचार्य पाठशाळेत शिक्षण झालं. नाटकात अभिनय करण्याचं वेड होतं. अनेक पौराणिक नाटकातून अभिनयाची हौस भागवली. रामकृष्ण मिशनच्या महाविद्यालयातून काॅलेज पूर्ण केल्यावर घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी कंडक्टरची नोकरी सुरु केली. तिथे ड्रायव्हर मित्र राज बहाद्दरने शिवाजीला मद्रासला जाऊन फिल्म इन्स्टीट्युटमधून शिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला व आर्थिक मदतही केली. शिवाजीने ते शिक्षण पूर्ण करीत असतानाच १९७५ साली दिग्दर्शक के. बालाचंदर यांनी शिवाजीला ‘अपूर्व रागंगळ’ या तमिळ चित्रपटात पहिली संधी दिली.
या चित्रपटापासून शिवाजी गायकवाडचा ‘रजनीकांत’ झाला! दरवर्षी त्याचे नवीन चित्रपट येत होते आणि तो त्याच्या ‘स्टाईलिश’ अभिनयाने यशाच्या पायऱ्या चढत राहिला. त्याच्या ‘एन्ट्री’ला प्रेक्षक शिट्या मारु लागले, पडद्यावर चिल्लर फेकू लागले. त्याची गाॅगल घालण्याची पद्धत, सिगारेट तोंडात घेण्याची पद्धत, चालण्याची ढब, संवादफेक, हाणामारी पाहून चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले. त्याचे अनेक फॅनक्लब निघाले.
त्याच्या चित्रपटाच्या शो चे तिकीट मिळविण्यासाठी रांगा लागू लागल्या. अमिताभ बच्चनच्या अकरा हिंदी चित्रपटांच्या ‘रिमेक’ मध्ये त्याने काम करुन दाक्षिणात्य निर्मात्यांना ‘ब्लाॅकबस्टर’ यश मिळवून दिले.
१९८३ साली ‘अंधा कानून’ चित्रपटाद्वारे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटांचे रौप्यमहोत्सव झाले.
हिंदी, कन्नड, तमिळ, मल्याळम, बांगला व इंग्रजी भाषेतील चित्रपट त्याने केले आहेत.
जॅकी चेन या आशिया खंडात चित्रपटाचे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यानंतर रजनीकांतचा दुसरा नंबर लागतो. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी दी बाॅस’ या चित्रपटासाठी त्याने सर्वाधिक म्हणजे २६ कोटी रुपये मानधन घेतले होते. गेली पंचेचाळीस वर्षे सलग चित्रपट सृष्टीमध्ये टिकून राहणे हे रजनीकांतच करु जाणे. तामिळनाडू मधील MGR नंतर एवढी लोकप्रियता मिळविलेला हा एकमेव कलाकार आहे.
रजनीकांतने योग्य वेळी लग्न केले. त्याला ऐश्वर्या व सौंदर्या या दोन मुली आहेत. दोन जावई, नातवंडं असा सुखी परिवार आहे. वयपरत्वे त्याला टक्कल पडले आहे, मात्र ते त्याने लपविण्याचा विग घालून केविलवाणा प्रयत्न केला नाही. जसा आहे तसाच माध्यमांसमोर उभा राहिला.
रजनीकांतने कित्येक समाजघटकांना वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याच्या दानशूरपणाचे अनेक किस्से वाचलेले आहेत. CBSEच्या अभ्यासक्रमात रजनीकांतच्या जीवनावर एक धडा देखील आहे.
इतक्या वर्षांत मानसन्मान भरपूर मिळाले. २००० साली पद्मभूषण पुरस्कार, सहा वेळा तामिळनाडू राज्य सरकारचा पुरस्कार, दहा वेळा फिल्म फेअर पुरस्कार, २००७ साली महाराष्ट्र शासनाचा राज कपूर पुरस्कार, २०१६ साली पद्मविभूषण पुरस्कार…आणि नुकताच जाहीर झालेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’!!
मध्यंतरी पुण्याला दिलेल्या भेटीमध्ये ‘सकाळ’ने त्याची मुलाखत घेतली. त्यात त्याने सांगितले की, त्याचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे आहे. त्याचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. म्हणूनच आपल्या मराठी मातीतील मराठी माणसाला मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार आपणा सर्वांना नक्कीच अभिमानास्पद आहे!!!
जय शिवाजी!!! जय भवानी!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-४-२१.
Leave a Reply