शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते.
शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती. या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने ‘ लष्करी ‘ होते. इथे आलेले इस्लामी लोक हे मूळचे अरबी , इस्लामचा संस्थापक मुहम्मद पैंगंबर इ.स.६६२ मध्ये मरण पावला. तोपर्यंत इस्लाम धर्मप्रसाराला वेगळा रंग चढला होता. मग धर्मवेडाने पेटलेल्या या अरबांनी पैंगंबरच्या मृत्युनंतर जगभर आक्रमणे करून सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. या आक्रमणाची एक लाट आठव्या शतकाच्या मध्यात इराण ओलांडून भारत व चीन पर्यंत पोहोचली.
इस्लामी दाहकतेच पहिला संबंध आला तो इ.स. ७११ मध्ये मुहम्मद बिन कासीमच्या वेळी, यावेळी सिंध प्रांताचा चा हिंदु राजा ‘दाहीर’ याचा पराभव झाला.या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून हजारोंच्या कत्तली करणे,गुलाम म्हणून जनतेला कैद करणे,स्त्रियांचा छळ अशा प्रकारे विध्वंस माजवला.सुदैवाने हा मुहम्मद कासीम सिंध प्रांत ओलांडून दक्षिणेकडे आला नसल्याने त्याची दाहकता भारतातील इतर भागांना पोहोचली नाही. सुदैवाने या स्वारीनंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्ष इस्लामी आक्रमणांपासून मुक्त राहीला. पण त्यानंतर इस्लामी आक्रमणे येतच गेली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ .
महमुद गझनवी (इ.स. ९९८-१००२) – याने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या त्यात प्रचंड मानवी संहार आणि लुट , मंदिरे उध्वस्त केली,स्त्रीयांचा अमानुष छळ केला.गुजरात मधील भव्य आणि प्रसिद्ध सोमनाथ मंदिर पाडले.
मुहम्मद घोरी (इ.स.११७५-१२०६) – नुसती लुट न करता इथेच सत्ता स्थापन करावी या उद्देशाने घोरी भारतावर आला, याने इस्लामचा पाया घालुन दिल्लीस सूलतानशाहीची स्थापना केली, यानंतर तब्बल एक लाख लोकांची हत्या करून दबदबा निर्माण केला.
अल्लाउद्दीन खल्जी – (इ.स.१3१३-१३१६) : खल्जी घराणे भारतात आले त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. खल्जी वंशातल्या या अल्लाउद्दिनने विचित्र कायदे केले -हिंदुनी घोड्यावर बसू नये, हत्यार बाळगु नये, मौल्यावान पोषाख घालु नये असे कायदे केले, मूर्तीपुजेस बंदी , जिझिया कर लादून अमानुष छळ केला.
मुहम्मद तुघलक – (इ.स.१३२५-१३५१) हा तुघलक विक्षिप्त म्हणून प्रसिद्धच होता, याने जनतेवर एवढे कर बसवले कि गरीब जनता पार धुळीस मिळाली, श्रीमंत बंड करून उठले. दुष्काळी परिस्थितीत गावच्या गाव ओसाड झाली.
तैमुर -(इ.स.१३७२-१४०५) दिल्लीच्या लढाईत तुघ्लूकाचा पराभाव झाला आणि दिल्ली शहर तैमुरच्या हाती सापडले, उपलब्ध वर्णनानुसार सतत पाच दिवस त्याने दिल्ली रक्ताने धुवून काढली.
बाबर -(इ.स. १५२६ -१५३०) मुघल राजवाटीची मूळ सुरवात बाबरच्या भारत स्वारी पासून झाली.यानेही जनतेचे अतोनात हाल करत काफिरांच्या(हिंदूंच्या) शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोत्सव केला, स्त्रियांचा छळ, तसेच मंदिरे पडून तिथे मशिदी बांधल्या.
अकबर -बाबरची राजसत्ता पुढे कायम करत अकबरने असंख्य हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर केले , पुढे चितोड हत्याकांडात जे राजपूत ठार केले , या मृत शरीरांवरून जमा केलेल्या जाणवांचे वजन तब्बल ७४ मण भरले एवढा संहार केला.अशीच भयंकर आणि दाहक कारकीर्द पुढे जहांगीर ,शाहजहान यांनी चालू ठेवली.
शिवपूर्वकाळात सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलूमांनी भरडून काढला.
शिवपूर्वकाळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदु राजे होऊन गेले, पुढे यावनी आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला.
महाराष्ट्रात सातवाहन-वाकाटक – राष्ट्रकुट – चालुक्य – शिलाहार -कदंब या राजवंशानी राज्य केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती आता पाहु –
सातवाहन – (इ.स.पुर्व २३२ ते ~ इ.स. २१०) सातवाहनांचे वैशिष्टय असे की त्यांची सागरावर सत्ता होती. पैठण ही त्यांची पहिली राजधानी.याकाळात प्रजा आनंदी, स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व प्रतिष्ठा होती. याच काळात शालीवाहन शक या कालगणनेचा उदय झाला.
वाकाटक – (इ.स. २४८ ते ~इ.स. ४९३) यांनी विदर्भात सत्ता स्थापन केली.त्यांच्या काळात धर्म , विद्या , कला , स्थापत्य, शिल्प यांना महत्व होते असे दिसते.
चालुक्य – (इ.स.५०० ते ७५०) हे घराणे मूळचे अयोध्येकडील.वाकाटकानंतर चालुक्य राजवंशाने सुमारे २५०वर्षे राज्य केले.शिल्पकलेत चालुक्य शैलीची मंदिरे , शिल्पे उत्कृष्ट समजली जातात.
राष्ट्रकुट – (इ.स.७५० ते ९८३) चालुक्यानंतर राष्ट्रकुटांनी २०० वर्षे राज्य केले. याच काळात जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदले गेले. हे यांच्या कारकिर्दीतच मुसलमान व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर उतरले. राष्ट्रकुटांच्या काळातच संस्कृतीला विकृत स्वरूप येऊ लागले.सोवळे- ओवळे, देवदासी, विधवा केशवपन व सतीची चाल हळू हळू रूढ झाली. सातवाहनकाळातील महाराष्ट्राचा वैभवसूर्य राष्ट्रकुटांच्या काळात ढळू लागलेला दिसतो.
शिलाहार – (इ.स. ८२५ ते १२६५) या राष्ट्रकुटांनंतर महाराष्ट्रावर चालुक्य, कदंब आणि शिलाहारांचे राज्य आले. कादंबांचे आरमार हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकाचवेळी या सत्ता निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. कोकणात शिलाहार राज्य करीत , शिलाहारांचे वैशिष्टय म्हणजे बळकट डोंगरी किल्ले बांधण्याचा पहिला घाट त्यांनी घातला
यादव – (इ.स. ११७८ ते १३१८) देवगिरीकर यादवांनी शिलाहार व कदंब यांना जिंकून सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. यादव हे यदुवंशीय आणि राजभाषा मराठी, सुवर्ण गरुडध्वज हे यादवांचे निशाण होते. १२२८ मध्ये पुंडलीकाने पंढरपुरी श्री विठ्ठलाची स्थापना केली. पुढे रामचंद्रदेव राजाच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी हा काळ अविस्मरणीय केला. पण हा सुखद काळ जास्त दिवस टिकला नाही. रामदेवराय राजाच्या कारकिर्दीत दिल्ली सुलतानाचा पुतण्या (आणि जावई) ‘ अल्लाउद्दिन खल्जी ‘ देवगिरीवर चालून आला. दुर्दैव हे की यावेळी रामदेवपुत्र ‘शंकरदेवराय’ दक्षिणेत सैन्य मोहिमेवर घेऊन गेला होता.अशा परिस्थितीत हे यावनी आक्रमण यादवांना सोसले नाही आणि यादवांचा गरुडध्वज पडला.तब्बल २०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेलं देवगिरीच वैभवशाली साम्राज्य अवघ्या १५-२० दिवसात कोसळले. यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे ३०० वर्ष इस्लामी राजवटीचा वरवंटा फिरतच राहिला.
यापुढील प्रदीर्घ काळात.बहमनी, तुघलक, खल्जी, निजामशाही, आदिलशाही, बरिदशाही , इमादशाही, मोगल, पोर्तुगीज यांनी थैमान घातले.शिवपूर्वकालीन हिन्दुस्थानाचे इस्लामी राजवटीचे स्वरूप नुसते वरवर न्याहाळले तरी शिवपुर्वकालीन भारत कोणत्या बिकट आणि विचित्र परिस्थिती मधून जात होता आणि शिवाजीराजे जन्माला नसते आले तर काय परिस्थिती उद्भवली असती हे आता कोणालाही उमजू शकेल.
रोहित पवार
संदर्भ :
शककर्ते शिवराय (खंड १) – विजयराव देशमुख
श्री राजा शिवछत्रपती – गजानन मेहेंदळे
मुसलमानपुर्व महाराष्ट्र – वा.कृ. भावे
शिवकालीन महाराष्ट्र – वा.कृ. भाव
Leave a Reply