नवीन लेखन...

शिवाष्टकम् स्तोत्र

भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं
जगन्नाथनाथं सदानन्दभाजम् ।
भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं
शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।१।।

मराठी- जो  शक्तिमान आहे, जो सर्वांच्या जीवनाचा स्वामी आहे, जो सार्वभौम आहे, जो जगाचा स्वामी आहे, जो  विष्णूचा  स्वामी  आहे, जो सदैव परमानंदात निमग्न आहे, सध्या असणार्‍या तसेच होऊन गेलेल्या आणि पुढे होणार्‍या सर्व प्राण्यांचा नाथ असलेल्या अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

जगाचा, हरीचा, जनांचाहि स्वामी
असे शक्तिशाली नि सम्राट नामी ।
उद्या, आज, पूर्वी, जिवांच्या धन्याला
स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला ॥ ०१


गले रुण्डमालं तनौ सर्पजालं
महाकालकालं गणेशादिपालम्
जटाजूटगङ्गोत्तरङ्गै विशालं
शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।२।।

मराठी- ज्याच्या गळ्यात कवट्यांची माळ आहे,  ज्याच्या अंगाभोवती सापांचे जाळे आहे,  जो काळाचा संहार करणारा महाकाल आहे,  जो गणेश इत्यादींचा पालक आहे,  ज्याच्या मस्तकावरील केस गंगेच्या लाटांमुळे विस्कटलेले आहेत, अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

यमा मारितो, पोषितो जो गणांना
शिरी शुभ्रलाटा, जटाही टिकेना  |        (शुभ्रा- गंगा, शुभ्रलाटा – गंगेच्या लाटा)
तनू सर्प वेढी, गळां मुंड माळा
स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला ॥ ०२


मुदामाकरं मण्डनं मण्डयन्तं
महामण्डलं भस्मभूषाधरं तम् ।
अनादिं ह्यपारं महामोहमारं
शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।३।।

मराठी- जो सर्व जगभर आनंद पसरवतो, जो विश्वाला अलंकृत करतो, जो स्वतः अगाध ब्रह्मांड आहे, जो राखेने स्वतःला सजवतो, जो आरंभहीन आहे, ज्याला पारावार नाही, जो सर्व प्रकारची आसक्ती दूर करतो,  अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

अलंकार जो भूषणां, देत हर्षा

जगा, पूर्ण ब्रह्माण्ड, सर्वांग रक्षा ।

सजे, आदि ना अंत पारावराला

स्तुती अर्पितो  मी शिवा ईश्वराला ॥ ०३


वटाधोनिवासं महाट्टाट्टहासं

महापापनाशं सदासुप्रकाशम् ।

गिरीशं गणेशं सुरेशं महेशं

शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।४।।

मराठी- जो वडाच्या झाडाखाली राहातो, ज्याचे हसणे उत्फुल्ल आहे, जो मोठ्या पापांचा नाश करतो, जो सदैव तेजस्वी आहे, अशा पर्वताचा स्वामी, गणांचा प्रमुख, देवांचा नेता असणार्‍या कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

खळाळे हसूं, पाप नाशी जनांचे

वडाखालती वास, तेजें सदाचे ।

गिरीशा गणेशा सुरेशा महेशा

स्तुती अर्पितो ईश्वरा मी उमेशा ॥ ०४


गिरीन्द्रात्मजासङ्गृहीतार्धदेहं

गिरौ संस्थितं सर्वदापन्नगेहम् |

परब्रह्मब्रह्मादिभिर्वन्द्यमानं

शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।५।।

मराठी- ज्याने गिरिराजा (हिमालया) च्या कन्येचे अर्धे शरीर स्वतःच्या शरीरात सामावून घेतले आहे, जो  पर्वतामध्ये राहतो, जो नेहमी दुर्दैवी जनांसाठी आसरा आहे, जो परमात्मा असून ब्रह्मा आदि देवांना पूज्य आहे, अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

असे पूज्य ब्रहम्या,  गिरी धाम ज्याला

सदा आसरा दुःखितांना,  उमेला ।

समावून अंगी, परब्रह्म झाला

स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला ॥ ०५


कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं

पदाम्भोजनम्राय कामं ददानम् ।

बलीवर्दयानं सुराणां प्रधानं

शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।६।।

मराठी- ज्याच्या दोन हातात (मानवी) कवटी आणि त्रिशूळ आहे, जो आपल्या पदकमळांवर (पायी) शरण असणार्‍यांना इच्छिलेले सर्व देतो, (नंदी) बैल ज्याचे वाहन आहे, जो देवांमध्ये सर्वोच्च आहे, अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

करी दोन, मुंडा नि मेढे धरी  तो              (मुंड – कवटी, मेढे – त्रिशूल)

पदी नम्र होता हवे सर्व देतो ।

जया यान नंदी जसा बैला झाला

स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला ॥ ०६


शरच्चन्द्रगात्रं गणानन्दपात्रं

त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रम् ।

अपर्णाकलत्रं सदा सच्चरित्रं

शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।। ७।।

मराठी- ज्याचा चेहरा शरदऋतूतील चंद्रासारखा आहे,  जो गणांच्या आनंदाचा विषय आहे,  ज्याला तीन डोळे आहे,  जो शुद्ध आहे,  कुबेराचा मित्र आहे, पार्वती ज्याची पत्नी आहे,  ज्याची शाश्वत वैशिष्ट्ये आहेत, अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

शरच्चन्द्रसा चेहरा, मोद भूतां

कुबेरा सखा, सच्चरित्री विशिष्टा ।

उमेचा पती, तीन चक्षू जयाला

स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला ॥ ०७


हरं सर्पहारं चिताभूविहारं

भवं वेदसारं सदा निर्विकारम् ।

श्मशाने वसन्तं मनोजं दहन्तं

शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ।।८।।

मराठी- जो सापांची माला धारण करतो, जो स्मशान भूमीत हिंडतो, जो साक्षात ब्रह्मांड आहे,  जो वेदांचे सार आहे, ज्याला कोणतेही विकार कधीच स्पर्श करीत नाहीत, जो स्मशानात वसती करतो, ज्याने मदनाला (मनोज) जाळून टाकले आहे, अशा कल्याणकारी ईश्वराची – शंकराची मी स्तुती करतो.

अनंगास जाळी,  बधेना विकारा

स्मशानी वसे जो असे ब्रह्म सारा ।

स्मशानात हिंडे, गळा सापमाला

श्रुतीसार त्या वंदितो ईश्वराला ॥ ०८


स्तवं यः प्रभाते नरः शूलपाणेः

पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः ।

सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलत्रं

विचित्रं समासाद्य मोक्षं प्रयाति ॥ ९॥

मराठी – नेहमी सकाळी जो मनुष्य त्रिशूळ धारण करणार्‍या भगवान शिवाची भक्तिभावाने प्रार्थना करतो, त्याला  कर्तव्यदक्ष पुत्र,  चांगली संपत्ती, चांगला  मित्र,  जीवनसाथी, फलदायी जीवन आणि मोक्ष प्राप्त होतात.

सकाळी सदा भक्तिने वाचताहे

शिवाची स्तुती जो तया लाभताहे ।

गुणी पूत, सन्मित्र, संपत्ति, पत्नी

मिळे मोक्ष, आयुष्य जाई फुलोनी ॥ ०९

। इति शिवाष्टकम् संपूर्णम् ।

******************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

4 Comments on शिवाष्टकम् स्तोत्र

  1. मला संस्कृत फार थोडे समजते. तुमच्या अनुवादामुळे स्त्रोतांचा अर्थ कळतो. ध्न्यवाद.??

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..