नवीन लेखन...

शिवजातस्य संभाजी महाराज : पूर्वार्ध

तस्यात्मज: शम्भूरिती प्रसिद्ध: समस्तसामंतशिरोवतंस:।
य: काव्यसाहित्यपुराणगीतकोदंडविद्यार्णवपारगामी ।।

अर्थ : काव्य, अलंकारशास्त्र, पुराणे, संगीत, आणि धनुर्विद्या यात पारंगत असलेलात्यांचा (छ. शिवाजीचा) मुलगा शंभू; सर्व राजांच्या अग्रस्थानी शोभत आहे.

(संदर्भ: छ. संभाजी महाराज विरचित ” बुधभुषणं ” श्लोक १५)

छ. शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून राज्य साधनेची लगबग करून, सह्याद्रीच्या कुशीत एक स्वाभिमानी स्वराज्य उभे केले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्या स्वराज्याची जबाबदारी छ. संभाजी महाराजांनी तितक्याच ताकदीने उचलली आणि स्वराज्याचे रक्षण करताना अखेर स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

ज्येष्ठ शुद्ध १२ शके १५७९ (आंग्ल दिनांक १४ मे १६५७) या शुभदिनी, माँसाहेब सईबाई यांचे पोटी पुरंदरगडावर संभाजीराजेंचा जन्म झाला.

शिवरायांची कारकीर्द सुरू होउन पहिले दशक पूर्ण होत असताना संभाजीराजांचा जन्म झाला होता. त्यानंतर अवघ्या ३ वर्षांत शिवाजी महाराजांचा अफझल वधाचा बृहद पराक्रम घडला. याच दरम्यान सईबाईंचे दुःखद निधन झाले. त्यामुळे स्वराज्य साधनेची धडपड करणारा पुत्र आणि त्याचा पुत्र या दोघांवर मायेची पाखर धरण्याची जबाबदारी राजमाता जिजाऊंकडेच होती. ज्या माँसाहेब जिजाऊनी शिवाजी महाराजांसारख्या शूर, नीतिमंत, कीर्तिवंत आणि यशवंत राजाची जडण घडण केली त्याच माँसाहेब जिजाऊनी संभाजी राजांची देखील जडण घडण केली. जे संस्कार शिवरायांवर झाले तेच संस्कार संभाजीराजांवर झाले असणार यात शंकाच नाही.

प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाणे वृद्धिंगत होत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचा युवराज हा, शस्त्र, शास्त्र, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण या सर्वांमध्ये पारंगत असलाच पाहिजे हे ध्यानी धरूनच,  संभाजीराजांची शिक्षण व्यवस्था केली गेली. त्यामुळे मल्लविद्या, धनुर्विद्या,घोडाफेक, तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे आदी सैनिकी शिक्षण तर पुरोहितांकडून रामायण श्रवण, पुराण श्रवण आदी धार्मिक शिक्षण देखील त्यांना देण्यात आले होते. सैनिकी शिक्षण केवळ शिकण्यापुरते मर्यादित न ठेवता शिवाजी महाराजांनी त्यांना काही वेळेस ५००० सैनिकांच्या तुकडीचे थेट नेतृत्व करण्यासाठी मोहिमेवर सुद्धा धाडले होते. एकंदरीतच काय तर, वर म्हटल्याप्रमाणे युवराज हाच भविष्यातला राजा असतो हे मर्म मनी ठेऊनच संभाजीराजांचे बालपण युवावस्था हि अश्या प्रकारच्या शिक्षणानी परिपूर्ण करण्यात आले होते. आपल्या पित्याचे पराक्रम पाहण्याची-ऐकण्याची संधी, उपजत असणारी धडाडी, शौर्य, सैनिकी शिक्षण, सैनिकी तुकड्यांचे नेतृत्व, शिवाजी महाराजांच्या निष्ठावान, कर्तृत्वसंपन्न सहकाऱ्यांचे अनुभव या साऱ्यामुळे संभाजीराजांठायी लष्करी कारवायातील निर्णयांची परिपक्वता निर्माण झाली होती.

संभाजीराजांचे कर्तृत्व हे केवळ शिपाईगिरी पुरते मर्यादित नव्हते. त्यांना खुद्द शिवाजीराजांनी मुलकी कारभाराची जबाबदारी देखील दिली होती. बऱ्याचवेळा इंग्रजांशी वाटाघाटी करण्यात संभाजीराजे आपली मुद्सद्देगिरी दाखवत असत. १६७७ साली इंग्रजांची राजापूरची वखार लुटल्यानंतर त्यांच्याशी पुढील वाटाघाटी करण्याकरता खुद्द शिवाजी महाराजांनीच संभाजीराजांना इंग्रजांकडे पाठवले होते. तह-करार-मदार, वाटाघाटी करण्यात तरबेज असणाऱ्या आपल्या अन्य सरदार, मंत्र्यांपेक्षा संभाजी महाराजांवर देण्यात आलेली ही जबाबदारी हीच संभाजीराजांच्याकडे देण्यात आली यातूनच त्यांची मुद्सद्देगिरी दिसते. संभाजीराजेंचा प्रकटपणे राजकारणात प्रवेश झाला तो आग्रा प्रकरणात. वयाच्या ८ / ९ व्या वर्षीच ते पाच हजारांचे मनसबदार झाले.

औरंगझेबाच्या तावडीतून सही सलामत सुटल्यानंतर, महाराज राजगडी पोहोचले पण संभाजीराजेंना मात्र मागे ठेवावे लागले होते. अर्थात यामध्ये संभाजीराजेंच्या सुरक्षेचाच विचार होता हे उघड आहे.

शिवाजी राजांच्या अनेक मास्टर स्ट्रोक पैकी हा एक होता हे आपण जाणतोच, पण अश्या या अटीतटीच्या वेळी ८ /९ वर्षांचे संभाजीराजे आपल्या वडिलांपासून, दूर राहून, मुघली सैनिकांचा ससेमिरा चुकवून, प्रसंगी त्यांना ठकवून अनोळखी माणसांसोबत २-३ महिने प्रवास करतात हे विशेषच म्हणावे लागेल. राजकारणाचे चातुर्यपूर्ण डाव, प्रसंगी सावधपणे शत्रूला फसवणे या बाबींचे प्रात्यक्षिकच त्यांना या प्रवासात पाहायला मिळाले होते असे वाटते.

हिंदवी स्वराज्याच्या पहिला अभिषिक्त युवराज आणि दुसरा अभिषिक्त राजा अशा दोनही भूमिकांतून संभाजीराजांचा प्रवास झाला होता. छ. शिवरायांच्या हयातीतच म्हणजे युवराज असतानाच त्यांची राज्यकारभारामध्ये चुणूक दिसली होती.

वेळ प्रसंगी रयत; मंत्र्यांपेक्षा युवराजांकडेच निवाड्याकरता येत होती यावरूनच रयतेचा विश्वास मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी दाखवलेले कर्तृत्व स्पष्ट होते.

कोणताही निवाडा सर्वमान्य होण्याकरता आवश्यक न्याय्यबुद्धी आणि मुख्य म्हणजे आपल्या पित्याचे पाहिलेले-ऐकलेले निवाडे, धोरणे यांमुळे संभाजीराजानी केलेले निवाडे रयतेस निश्चितपणे भावत असत. परंतु असे असले तरी, स्वतः च्या अखत्यारी बाहेरील तंट्यांमध्ये संभाजी राजांनी निर्णय दिले नाहीत. अर्थात यामधूनही त्यांची नियमांशी असणारी बांधिलकी आणि पर्यायाने न्यायबुद्धीच प्रतीत होते.

१६८० साली छ. शिवरायांच्या निधनानंतर, छत्रपतीपद भूषवतानाची त्यांची कारकीर्द ही अवघी ९ वर्षांची असली तरी, वादळी आणि पदोपदी परीक्षा पाहणारी ठरली होती.

आपल्या कर्तृत्ववान पित्यापाठी, छत्रपती म्हणून घेतलेली रयतेची जबाबदारी संभाजीराजांनी आपल्या पित्याला शोभेल अशीच पार पाडली यात शंकाच नाही.

संभाजीराजांना छत्रपती म्हणून कारभार सुरु करतानाच, आपलेच म्हणवणाऱ्या मंत्री, सरदार यांची कट-कारस्थाने आणि राजकारण यांना तोंड द्यावे लागले. आपल्या विरुद्धच्या तीन कपट-कारस्थानातून संभाजीराजे मोठ्या सावधतेने आणि चलाखीने सुखरूप बाहेर पडले.

एक राज्यकर्ता म्हणून आपल्याच मंत्रिगणांना कठोर शासन करावे लागले हे स्वराज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. वास्तवात, एका अभिषिक्त युवराजा विरुद्ध कट-कारस्थान करणे हा राजद्रोहच म्हणावा लागेल, पण केवळ त्या मंत्रिगणांच्या पूर्व पुण्याईला स्मरून, छ. संभाजी महाराजांनी दोषी मंत्रिगणांना क्षमादान केले हा त्यांचा मोठेपणाच म्हणावा लागेल. असे असूनही जेंव्हा अभिषिक्त छत्रपती असणाऱ्या संभाजी महाराजांच्या विरोधात कट-कारस्थानं झाली तेंव्हा, गद्दारीची विषवल्ली उपटून काढण्याशिवाय पर्यायच राहिला नाही आणि म्हणून अखेर कठोर निर्णय घेणे संभाजीराजांना भाग पडले. खरे तर, एक युवराज म्हणून, प्रजापालक म्हणून छ. संभाजी महाराज कधीही कोठेही कमी पडले नाहीत.

छ. शिवरायांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाची पोकळी संभाजीराजांच्या राज्याभिषेकाने, मंचकारोहणाने भरून निघाली. या घटनेचे महत्व विशद करताना, इतिहासकार वा. सी. बेंद्रे सांगतात की;

धार्मिक वेदोक्त विधीने प्रतिष्ठापित अश्या हिंदवी स्वराज्याच्या राजसिंहासनाच्या राजपरंपरेत दैववशात घडून आलेल्या घालमेलीमुळे व धर्मनिष्ठ व राजनिष्ठ प्रजेच्या मनात जे एक किल्मिष निर्माण केले गेले होते ते पुन्हा ऐन्द्रीयाभिषेक विधीने दूर केले. स्वराज्याच्या पवित्रतेची जाणीव दृढ केली गेली. ……. संभाजी महाराजांच्या धर्मविहित आचारआचरणुकीत दृष्टिगोचर होणारा आत्मविश्वास मोगली भीषण परचक्रालाही यशस्वीपणे व निर्धाराने तोंड देण्यास प्रवृत्त करत होता. हाच निर्धार व हिंदवी स्वराज्यावरील श्रद्धा औरंगजेबाला वीस वर्षाच्या आपल्या प्रयत्नांच्या निष्फळतेच्या जाणिवेतच महाराष्ट्राच्या भूमीत निराशेने देह ठेवावा लागण्यास कारण झाली. …..

आपल्या माता-पित्या कडून मिळालेला सत्शीलतेचा वारसा आणि आज्जीकडून (माँसाहेब जिजाऊ ) मिळलेले संस्कार त्यांनी मरणाच्या दारात उभे असताना देखील जपले; पण असे असूनही संभाजी महाराजांवर झालेले घाणेरडे आरोप हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावेच लागेल.

वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले यांच्या संशोधनाअंती संभाजी महाराजांवरील आरोपांची जळमटे प्रथम दूर झाली.

प्रत्येक महाराष्ट्रीयांनी या संशोधकाचे उपकारच मानले पाहिजेत.

छ. संभाजी महाराजांनी छत्रपती म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा प्रवास पुढील लेखातून पाहुयात.

 

संकलन-लेखन : श्रीपाद श्रीकांत रामदासी

टिप : सदर लेखासाठी, वा. सी. बेंद्रे लिखित श्री. छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. सौ. कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी, या ग्रंथांतुन संदर्भ घेतले आहेत.

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 12 Articles
मी, श्रीपाद श्रीकांत रामदासी [ मेथवडेकर ], मूळचा सोलापूर येथील असून; इ. स. २००५ पासून, पुणे येथे वास्तव्यास आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. गेली काही वर्षे सोलापूर, संभाजी नगर, पुणे, आदी जिल्ह्यातून, छ. शिवराय, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, हिंदुत्व या विषयांवर व्याख्याने, भाषणे दिली आहेत; देत आहे. मराठीसृष्टी, प्रगतिपर्व अश्या नियतकालिकांतून विविध विषयांवर लेखन देखील करत असतो. डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत, विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारे लेख सोशल मीडियावर, ब्लॉग वर लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न सुरु आहे. माझे आत्तापर्यंत ५५ हुन अधिक लेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले असून ही संख्या १०१ पर्यंत नेण्याचा मानस आहे. व्याख्याने, लेखमाला, याकरिता आपण मला इ-मेल द्वारे संपर्क करू शकता. इ-मेल : shripad.ramdasi [ at ] outlook [ डॉट ] [ कॉम ] आमचे लेख, कविता याबद्दल आपला अभिप्राय अवश्य कळवावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..