
‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.
१५ ऑगस्ट २०२४ ला शोलेने वयाची ४९ वर्षे पूर्ण करुन दिमाखात सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केला. सिनेरसिकांची पिढी दर दहा वर्षांनी बदलते म्हणतात. म्हणजे सिनेरसिकांच्या पाच पिढ्या शोलेच्या अंगाखांद्यावर मनसोक्त हुंदडल्या. आम्ही आमच्या (स्ट्रेचलॉनच्या) पहिल्यावहिल्या फुलपँटमधे शोले पाहिला. माटुंग्याच्या बादल थिएटरमधे तेव्हा चार रुपये चाळीस पैसै स्टॉलचे तिकीट होते,आणि पाच रुपये पन्नास पैसे बाल्कनी. मामाकडून तिकिटाचे पैसे मिळविण्यासाठी मला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची “राजास जी महाली,सौख्ये कधी मिळाली” ही कविता पाठ करावी लागली होती. ही कविता मला आजही तोंडपाठ आहे. शोलेच्या संवादांसारखीच. मराठेसरांनी शिकविलेल्या एकसामायिक समिकरणांप्रमाणे काही समिकरणे आमच्या डोक्यात फिट्ट बसलेली आहेत.
अनारकली…..मधुबाला.
अभिनयातील शेवटचा शब्द……दिलिपकुमार.
आघाडीचा सर्वोत्तम फलंदाज…..सुनिल मनोहर गावस्कर.
आणि
या भारतभूमीतील सर्वात प्रेक्षकप्रिय सिनेमा…..अर्थातच शोले.
दोन मार्कांचा विषय संपला.
आपल्या उचलेगिरीचे समर्थन करण्यासाठी, ‘रामायण आणि महाभारत सोडले तर बाकी या जगात ओरिजिनल काहीच नाही’ असं शोलेकार सलीम-जावेद त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत मोठ्या मिजाशीत सांगायचे.सांगोत बापडे. जेव्हा लेखक स्वतःच येथून-तेथून हात मारल्याचे मान्य करतो तेव्हा त्याच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचे कारणच नाही.
पण तुम्हाला सांगतो,अगदी आजही, घरबसल्या स्विगीवरून मागविलेली बिर्याणी खाताना,शेवटच्या प्रसंगात, “वीरू, बस एक बात रह गयी, तेरे बच्चोंको कहानी नहीं सुना सका.लेकीन तुम उन्हे अपने दोस्तीकी कहानी जरूर सुनाना” असे अमिताभ पुटपुटल्यावर डोळे पुसणारे रसिक मला ठाऊक आहेत. आणि जयाकडे बघत त्याने “यह एक कहानी भी अधुरी रह गयी” असे हताश उद्गार काढल्यावर, तांदूळ निवडता निवडता डोळ्याला पदर लावलेल्या स्त्रियासुद्धा मी पाहिल्या आहेत.
१९९८ साली आलेल्या “कुछ कुछ होता है” मधे आघाडीचा विनोदवीर जॉनी लिव्हर सहज बोलून जातो ‘ मेरा बाप अंग्रेज के जमाने का टेलर था !’ आणि आजही संपूर्ण थिएटर हास्यकल्लोळात बुडून जाते. याचा संबंध पन्नास वर्षांपूर्वीच्या असरानीच्या ‘हम अंग्रेज के जमाने के जेलर है !’ या संवादाशी आहे हे कोणत्याही नातवाला त्याच्या आजोबांनी सांगण्याची गरज पडत नाही.
शोलेच्या नेत्रदीपक यशामागे त्यातल्या छप्परतोड संवादांचा मोठा हात आहे असा एक सर्वमान्य समज आहे. शोलेच्या संवादांच्या तबकडीची तडाखेबंद विक्री झाल्यामुळे या समजाला बळकटीच मिळाली आहे. पण चपखल,आशयगर्भ आणि प्रवाही संवादांची गोळाबेरीजच करायची झाली तर के.आसिफच्या मुघल-ए-आझमचे, बी.आर.चोप्रांच्या नया दौर आणि वक्तचे, चेतन आनंदच्या हीर रांझाचे आणि ऋषीकेश मुखर्जींच्या अनाडीचे संवाद कोणत्याही निकषावर शोलेच्या संवादांपेक्षा सरसच ठरतील.
हेलनने ‘मेहबुबा मेहबुबा’ या गाण्यावर केलेले दिलखेचक नृत्य पहाण्यासाठी हेलनग्रस्त प्रेक्षक थिएटरवर परतपरत चाल करुन जातात अशी शोलेच्या यशाची पैजेवर फोड करणारे चाहते मला भेटलेले आहेत. मात्र त्याचप्रमाणे राज सिप्पीच्या इन्कारमधे हेलनचे “मुंगळा” नृत्य जास्त मारु आणि कडक होते असे शपथेवर सांगणारे कॅब्रेविशारदही काही कमी नाहीत.पण इन्कार त्याकाळी पन्नास आठवडे चालला आणि काळाच्या ओघात विस्मृतीच्या डोहात गडप झाला.तो काही शोलेप्रमाणे मैलाचा दगड बनू शकला नाही.
संजीवकुमार,धर्मेंद्र व अमिताभ (आणि अमजदखान) यांची अभिनय जुगलबंदी पाहाण्यासाठी रसिकांनी पंढरपूरप्रमाणे शोलेच्या वाऱ्या केल्या असेही काहीजण म्हणतात. कोणाला शिकवताय राव ?
शक्तीमधे दिलिपकुमार,अमिताभ (व राखी) ,त्रिशूलमधे संजीवकुमार,अमिताभ ( व शशी कपूर) , मशालमधे दिलिपकुमार,नवखा अनिल कपूर ( व वहिदा रेहमान) आणि परिंदामधे नाना पाटेकर,जॅकी श्रॉफ व अनिल कपूर यांची जुगलबंदी जास्त प्रभावी आणि परिणामकारक होती असं नाही वाटत तुम्हाला ?
‘जॉय मुकर्जी व विश्वजित यांच्यात स्त्रियांना आवडणारं नेमकं काय होतं ?’ या गहन विषयात पी.एच.डी. करता करता राहिलेल्या माझ्या एका सर्वज्ञ मित्राच्या मते (त्याच्या बायकोला व मुलीला अनुक्रमे कुमार गौरव व करण जोहर आवडतात) त्याग,मैत्री,प्रेम आणि सूड हे हिंदी सिनेमाला चढत्या भाजणीने तोलून धरणारे चार स्तंभ आहेत. या चारही भावभावनांचे यथायोग्य मिश्रण (म्हणजे कॉकटेल) हे शोलेच्या यशाचं एकमेव रहस्य आहे. नशा उतरली की एखाद्या अफिमबाजाप्रमाणे प्रेक्षक पुन्हापुन्हा शोलेकडे ओढले जातात. जोपर्यंत या पृथ्वीतलावर मनोव्यापाराचा हा चतुष्कोन जिवंत आहे तोपर्यंत शोलेला मरण नाही.
आता मला विचाराल तर,अतिशय बंदिस्त व बांधेसूद कथा आणि पटकथा, ठसठशीत प्रमुख व्यक्तिरेखा, सर्वच पात्रांचा कसदार अभिनय,पारंपारिक खलनायकाची प्रतिमा तोडून मोडून अमजदखानने साकार केलेला काहीसा वेडसर,ओंगळ व पुढेमागे सुधारण्याची सुतराम शक्यता नसलेला पूर्णतः क्रूर खलनायक हे शोलेला यशस्वी करण्यामागील प्रमुख घटक असू शकतात. त्याचप्रमाणे सफाईदार गतीमान दिग्दर्शन,देखणं कला निर्देशन, लक्षणिय चित्तवेधी छायाचित्रण आणि शोलेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारं संकलन हे शोलेच्या उत्तुंग यशामागील सहाय्यक घटक असण्याचीही शक्यता आहे.
“सिक्के और इन्सानमे शायद यही फर्क है”, “मुझे बेफुजुल की बाते करने की आदत तो है नहीं” आणि “तुम्हारा नाम क्या है बसंती ?” सारखे सहजगत्या तोंडी घोळणारे चटपटीत संवाद हे शोलेचे मोठं बलस्थान आहे यात शंकाच नाही.
मात्र सहसा एक्स्ट्रात गणली जाणारी अथवा दुर्लक्षित राहणारी आणि शोलेमधे मात्र काळजीपूर्वक फुलवलेली सशक्त दुय्यम पात्रे आणि त्यांचे नैसर्गिक संवाद हा शोलेचा सर्वात मोठा USP आहे असं मी मानतो. सत्येन कप्पू,असरानी,जगदीप,
ए.के.हंगल,लीला मिश्रा आणि मॅकमोहन ही सगळीच पात्रे गेली कित्येक वर्षे त्यांच्या पडद्यावरील नावांसह व संवादांसकट वेगवेगळ्या मिमिक्री शोजमधून, ऑर्केस्ट्राजमधून आणि स्टँडअप कॉमेडी व जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतच आहेत.
फक्त एक उदाहरण द्यायचा मोह आवरत नाही. होळीच्या सणाला संजीवकुमार जयाच्या वडिलांना भेटायला त्यांच्या गावी येतो. जयाची अव्याहत चाललेली बडबड ऐकून इफ्तिकार अंगणात येतात.समोर संजीवकुमारला पाहून किंचित दटावणीच्या सुरात जयाकडे बघून म्हणतात….’अरे,ठाकुरसाब आये है…कहती भी नहीं.’ त्यावेळची त्यांची लगबग , त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव व संवादाचे टायमिंग बघावे. इथे दुय्यम पात्रांवर मेहनत घेणारा दिग्दर्शक दिसतो.
आणि सर्वात शेवटी नशीब हा घटक तर महत्वाचा आहेच. अमिताभच्या “सच कहा मौसी,बडा बोझ है आप पर” पासून सुरु झालेला आणि धर्मेंद्रच्या “मै नीचे उतरुंगा मौसी….मौसीजी” ला संपणारा प्रसंगच वानगीदाखल घ्या. मध्यंतरानंतर धर्मेंद्रची भूमिका काहीशी सपाट होते आहे म्हणून ऐनवेळी या प्रसंगाचा घाट घातला गेला.मात्र शूटींगचा दिवस उजाडला तरी हा प्रसंगच लिहून तयार नव्हता.शुटींगच्या दिवशी पहाटे बँगलोर विमानतळावर जाताना जावेद अख्तरने घाईघाईत गाडीत आणि शेवटी बोर्डिंगपास बनेपर्यंत गाडीच्या बॉनेटवर हा प्रसंग अक्षरशः खरडला. तो परत वाचायला किंवा त्यात सुधारणा करायला त्याला वेळच मिळाला नाही. त्याने तसाच तो आपल्या सहकाऱ्याच्या हातात दिला आणि त्याला रामगढला पिटाळले. इथे लेखकाची त्याच्या लिखाणावरची पकड आणि त्याचा आत्मविश्वास दिसतो. हा प्रसंग नंतर सिनेमाचा रिलीफ हायलाईट ठरला. मात्र सव्वातीन तासांच्या सिनेमामधे हा चौदा मिनिटांचा प्रसंग जरा जास्तच लांबतोय,रेंगाळतोय असे वाटून या प्रसंगाला कात्री लावण्याचा अघोरी विचार काही काळ रमेश सिप्पीच्या मनात तरळून गेला होता. परंतु त्याच्या,प्रेक्षकांच्या आणि शोलेच्या नशिबाने हा प्रसंग सिनेमात कायम राहिला.
चित्रिकरणाला जेमतेम महिनाभर राहिलेला आणि मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी (ऐनवेळी डॅनीने नकार दिल्यामुळे) अभिनेताच ठरलेला नाही. अशावेळेस अचानक सलिमला जावेदने कधीकाळी कौतुक केलेल्या, दिल्ली विद्यापीठाच्या नाट्यमहोत्सवात “ए मेरे वतनके लोगो” नाटकात दमदार अभिनय केलेल्या,जेष्ठ कलाकार जयंतच्या मुलाची आठवण झाली. गब्बरसिंग अमजद खानचा पुढचा इतिहास तर बच्चा बच्चा जाणतो. आता सांगा हे नशीब कोणाचे ?
शोले आमच्या भावजीवनात किती खोलवर झिरपलाय पहा. “कितने आदमी थे ?” हा निरुपद्रवी भासणारा सवाल आम्हाला गेली कित्येक वर्ष छळतोय. ४९ वर्षांपूर्वी कालिया विजू खोटेने या प्रश्नाचं खरं उत्तर गब्बरसिंगला देऊन आपल्या दोन सहकाऱ्यांसह गुमान नरकाची वाट पत्करली.
‘सरदार, दो आदमी !’
(विरू और जयदेव.)
आज नव्या पिढीची दिग्दर्शिका नम्रता रावला हा प्रश्न तिच्या “Angry young men” या डॉक्युसिरीजमधे पुन्हा विचारावासा वाटला.
या प्रश्नाचं तिला पटलेलं उत्तरदेखील तिनेच दिलं.
“दो आदमी !”
(सलिम और जावेद.)
आम्ही सोपविलेल्या एका नाजूक कामगिरीवरून परतलेल्या आमच्या सोज्वळ मित्राला रूईया नाक्यावरच्या मणीजमधे मसाला डोसा खाऊ घालताना आम्ही धडधडत्या अंतःकरणाने त्याला हाच प्रश्न विचारला.
कितने आदमी थे ?
आधीच ऑर्डर केलेला दहीवडा येण्याच्या मार्गावर आहे याची खात्री पटल्यावर सोज्वळकुमार जाबडला. ‘तीन आदमी. तुमच्या हृदयदुखीच्या घरी तीन आदमी आहेत.माझगाव डॉकमधे चिफ सिक्यूरिटी ऑफिसर असलेले तिचे वडील व नेमाने तळवलकर जिमला जाणारे तिचे दोन मोठे भाऊ.” सिनेमाचा दी एंड. त्या मसाला डोसा व दहीवड्याच्या पैशात मिनर्व्हाला अजून एकदा बाल्कनीतून शोले पाहता आला असता याची आम्हाला आजही चुटपूट लागून राहिली आहे.
दुष्कर्माला वाहून घेतलेल्या अजित,प्रेम चोप्रा आणि मंडळींप्रमाणे हिंदी सिनेमाला वाहून घेतलेल्या मित्रवर्य जयंत विद्वांसांचं या प्रश्नावरचं उत्तर तर भन्नाट आहे. “माणूस गेल्यावर चार आदमी तो लगते है कमसे कम.जाण्याची वेळ आली की मी विचारेन ‘कितने आदमी है ?’ अरे चार आदमी जमेपर्यंत शोले लावा रे कुणीतरी. आरामात ऐकेन. मग चार जमले काय. चाळीस जमले काय.आपल्याला काही सोयरंसुतक नाही त्याचं.” राजकारणी मंडळींचा हिशोबच वेगळा.त्यांचं सगळच मोठं असतं.टमरेलदेखील. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या (डझनभर) पुढाऱ्यांना हा प्रश्न विचारा. ते उत्तर देतील…..१४५. जो १४५ आदमी (आमदार) जमवेल तो मुख्यमंत्री होईल.
शोले पाहण्यासाठी कोणाला काहीही निमित्त पुरतं. पण ते समोरच्याला फक्त सांगण्यासाठी. खरं तर शोले पहायला काही निमित्ताची गरज नाही हेच सत्य. माझा एक मावसभाऊ अकरावीची करावी तशी मिनर्व्हागढीवर शोलेची सहावी वारी करून आला. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून म्हणाला…’अरे, धर्मेंद्रचा जीव वाचविणारं अमिताभच्या मुठीतील नकली नाणे धर्मेंद्र त्वेषानं फेकतो. स्टिरिओफोनिक साउंडमुळे ते आपल्या अगदी बाजूला दगडावर आपटत गेल्याचा भास होतो. तो आवाज ऐकायला गेलो होतो.’ पुढल्या रविवारी सकाळी पठ्ठया परत तिकीटबारीवर हजर. मी तोंड उचकटायच्या आधीच त्याने खुलासा केला ….’७० एम.एम. मधे शेवटच्या प्रसंगात संजीवकुमारच्या संपूर्ण खिळ्यांचं सोल असलेल्या बुटाचा क्लोजअप जबरदस्त दिसतो.तो नीट आठवत नाही म्हणून पहायला आलो आहे.’ माझं नशीब,तू नेमकं काय बघायला आला आहेस हे त्यानं मला कधी विचारलं नाही.
आम्ही सुनिल,कपिल,शेन वॉर्न, मुरलीधरन आणि सचिनची अख्खी कारकीर्द डोळ्यांची निरांजनं करून पाहिली. आम्ही १९७७ साली आलेली जनतालाट, ‘अंधेरेमे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश’ अशी बेंबीच्या देठापासून आरोळी देत अनुभवली. नंतर आलेल्या इंदिरालाटेला , राजीवलाटेला आणि मोदीलाटेला आम्ही द्विधा आणि विमनस्क अवस्थेत सामोरे गेलो. आम्ही विस्फारलेल्या डोळ्यांनी गेल्या अडीच दशकातील मोबाईल क्रांती पाहिली. आणि आम्ही गेल्या पन्नास वर्षांत, जेव्हाजेव्हा मनाला आणि शरीराला मरगळ आली तेव्हातेव्हा डॅश चार्जरने झटपट रिचार्ज होण्यासाठी हक्काने आजीच्या कुशीत शिरावे तसा शोले पाहिला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दिग्दर्शक शेखर कपूर म्हणतो “हिंदी चित्रपटाच्या इतिहासाचे ढोबळमानाने दोन भाग पडतात.
B.C. and A.D.
Cinema before Sholay
and Cinema after Sholay.
कधी वाटतं उठावं आणि सरळ बँगलोरला जावं.तिथे टांगा करून रामगढला पोचावं.तिथल्या मातीत कदाचित आजही जयने गब्बरसिंगच्या डोळ्यात फेकलेला होळीचा रंग मिसळलेला दिसेल. आजूबाजूच्या डोंगरकपारीतील दगडावर ठाकूर बलदेवसिंगच्या सुकलेल्या रक्ताचे डाग पडले असतील. एखाद्या उंचवट्यावर बसंतीच्या पायाचे ठसे सापडतील. सर्वत्र स्मशानशांतता पसरली असताना मशिदीच्या पायऱ्यांवरून थरथरत्या आवाजात कोणी विचारेल “इतना सन्नाटा क्यू है भाई ?”
माझा तीन वर्षांचा नातू मला परदेशी मूळ असलेल्या ऍवेंजर्स मालिकेतील सुपरहिरोजच्या गोष्टी भारावून सांगत असतो. कॅप्टन अमेरिका आणि आयर्न मॅन हे त्याचे सध्याचे नायक आहेत.अजून दहा वर्षांनी शोलेची जेव्हा साठीशांत असेल तेव्हा मी त्याला या मातीचा गंध असलेल्या आणि सलिम-जावेदच्या लेखणीतून उतरलेल्या सुपरहिरोजच्या कहाण्या सांगेन. समोर आपल्या एकुलत्या एक मुलाचा छिन्नविछिन्न मृतदेह पडलेला असतानादेखील नमाजाची वेळ न चुकविणारा आणि आपल्या खुदाला “मुझे और दो-चार बेटे क्यू नहीं दिये इस गावपर शहीद होने के लिए ?” असा जाब विचारायला निघालेला अंध इमामचाचा. डोळ्यासमोर मृत्यूचा भयाण खेळ सुरू असताना खोटं नाणे वापरून खऱ्या मैत्रीची प्रचिती देणारा आणि मित्रासाठी आपल्या स्वप्नांची आणि प्राणांची आहुती देणारा जयदेव. या काळ्या मातीतल्या सामान्य हाडामांसाच्या माणसांचे हे रुपेरी पडद्यावरचे असामान्य प्रतिनिधी हे खरे सुपरहिरोज आहेत असं मी त्याला सांगेन.
शक्य आहे की अजून पंचवीस वर्षांनी तो रीगल थिएटरमधे शोलेचा अमृतमहोत्सव आयोजित करेल. सचिनची फलंदाजी पहायला वानखेडेवर जसे चारही दिशांनी प्रेक्षक गर्दी करायचे तसे रीगलवर चित्रपटरसिकांचे मोहोळ उठेल. रीगलचा म्हातारा डोअरकीपर जाड निळा पडदा सरकवून संपूर्ण काळोख करेल. रुपेरी पडद्यावरील सर्वात रोमांचकारी सूडनाट्याला सुरूवात होईल. चार तासांनंतर थिएटरमधील गर्दी ओसरल्यावर आनंदाने चेहरा फुललेला माझा नातू आमच्या बाजूच्या सीटवर येऊन बसेल. माझ्या अन् शोलेच्या चिरंतन प्रेमाची एकमेव साक्षीदार असलेली त्याची आजी त्याला सर्वभक्षक काळावर मात केलेला तोच प्रश्न विचारेल.
कितने आदमी थे ?
शतकामागून शतके ही परंपरा अशीच सुरू राहील.
कारण हिंदी सिनेमा अमर आहे आणि शोले अजरामर आहे.
संदीप सामंत.
९८२०५२४५१०.
पूर्वप्रसिद्धी – श्रमकल्याण युग
दिवाळी अंक २०२४.
Leave a Reply