सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता. त्याच्यावर बहुधा फ्रान्सचा नौसेना किंवा सैनिक तळ असल्याचे दिसत होते. किल्ला अत्यंत मजबूत आणि सुस्थितीत होता तसेच त्याच्यावर चारही बाजूला तोफा दिसत होत्या. आम्हाला नांगर टाकून जवळपास आठ दिवस झाले होते. फ्रान्स मध्ये त्यावेळी कामगारांचा संप सुरू असल्याने सगळे ऑईल टर्मिनल काम बंद आंदोलनामुळे ठप्प झाले होते. आपल्याकडे दिवाळी जवळ येत होती. माझा कॉन्ट्रॅक्ट पाच महिन्यांचा होता चार महिने संपून पाचवा महिना सुरू असताना आम्ही फ्रान्सच्या बंदरात येऊन पोचलो होतो. साईन ऑफ साठी वन मंथ नोटीस देऊन दहा दिवस झाले होते. कार्गो डिस्चार्ज झाला की दिवाळीसाठी घरी जाता येईल म्हणून सुरवातीला मज्जा आली होती. पण जसजसा संप लांबत जायला लागला तसतसे दिवाळीसाठी घरी जाण्याचे स्वप्न धूसर व्हायला लागले होते. माझ्या चीफ इंजिनियरला सुद्धा घरी जाणं गरजेचं होते. त्याच्या मिसेस ला नववा महिना सुरू होता आणि तिची डिलिव्हरी डेट जवळ येत चालली होती. त्याच्या आईचे वय झाल्याने तसेच आजारपणामुळे आणि त्याला अगोदरच 3 वर्षांची लहान मुलगी असल्याने मिसेसच्या डिलिव्हरी अगोदर त्याला घरी जाणे अत्यंत आवश्यक होते. फ्रान्सच्या बंदरात तो आणि मी कार्गो डिस्चार्ज झाले की घरी जाऊ असे ठरले होते. पण आम्ही नेमकं बंदरात पोचलो आणि संप सुरू झाला. संपाचे प्रकरण त्यावेळेला खूप गाजले होते. सरकार आणि कामगार संघटना कोणीच माघार घेत नव्हते. सात दिवस मग पंधरा दिवस उलटुन गेले तरीसुद्धा संप मिटत नव्हता. जहाजावरील फ्रेश वॉटर चा साठा सुध्दा संपत आला होता. जहाजाचे मेन इंजिन सुरू असते तेव्हा इंजिनच्या उष्णतेचा उपयोग करून समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून जहाजावर पिण्यायोग्य तसेच नेहमीच्या वापरासाठी गोडे पाणी म्हणजेच फ्रेश वॉटर बनवले जाते. इंजिनची उष्णता कुलिंग वॉटर मार्फत फ्रेश वॉटर जनरेटर मध्ये वापरून समुद्राचे खारे पाणी बाष्पीभवन प्रक्रियेने डीस्टील्ड केले जाते. परंतु जहाज पंधरा दिवस नांगर टाकून उभे असल्याने फ्रेश वॉटर जनरेटर बंद होता. इंजिन बंद असताना बॉयलर ची स्टीम वापरून चालवता येत होते परंतु त्यासाठी बॉयलर मध्ये डिझेलची खपत वाढत होती आणि पाणी बनवणे महाग पडत होते. मग पाण्याचे राशनिंग सुरू केले गेले. काम करताना घाम येतो आणि कपडे किंवा बॉयलर सूट धुवायला लागू नये म्हणून अत्यंत जरुरीचे असेल तेच काम हाती घ्यायला लागले. एरवी चोवीस तास सुरू असणारा केबिनच्या पाणीपुरवठा सकाळ संध्याकाळ फक्त अर्धा तास करण्यात येऊ लागला. पाण्याची ही अवस्था असताना प्रोविजन सुद्धा संपायला आले होते परंतु संपामुळे तेही महाग असूनसुद्धा मिळणे पण मुश्किल झाले होते. भाजीपाला मांस मच्छी सगळं संपत आले होते फ्रोजेन व्हेजिटेबल खाऊन उबग आला होता. चीफ इंजिनियर चा चेहरा दिवसेंदिवस चिंताक्रांत दिसू लागला होता त्याच्या मिसेस ची डिलिव्हरी जवळ येऊनही त्याला घरी जायला मिळत नव्हते त्यापुढे मला दिवाळीला घरी जाण्यासाठी न मिळण्याचे दुःख क्षुल्लक वाटतं होते. त्यातच घरच्यांनी सांगितले ठीक आहे नाहीतर नाही दिवाळीला तू घरी आलास की पुन्हा दिवाळी साजरी करू त्यामुळे सणासुदीला घरी जायची ओढ थोडी कमी झाली. चीफ इंजिनियर नेहमीसारखं हसणं आणि बोलणं विसरला होता संप आज मिटेल उद्या मिटेल या आशेने व्याकुळ होऊन गेला होता. फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ असल्याने त्याला रोज घरी संपर्क करता येत होता. कंपनी कडून चीफ इंजिनियर ला
घरी पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात होते परंतु त्याची रँक अशी होती की रीलिव्हर आल्याशिवाय त्याला घरी जाता येत नव्हते. शेवटी लवेरा बंदरात येऊन अठरा दिवस झाल्यानंतर चीफ इंजिनियर चा रिलिव्हर जहाजावर आला आणि तो ज्या दिवशी घरी जायला निघाला त्याच दिवशी सकाळी त्याच्या मिसेस ची डिलिव्हरी झाली होती. पहिल्या मुली नंतर मुलगा झाला होता. चीफ इंजिनिअर जहाजावरुन उतरत असताना त्याचे डोळे पाण्याने भरले होते. मुलगा झाल्याच्या शुभेच्छा देत असताना त्याच्यासह आमच्या सर्वांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रु तरळले होते. सुमारे 21 दिवस संप सुरू राहिला होता आणि कार्गो डिस्चार्ज झाल्यावर दिवाळीच्या चार दिवसानंतर मी घरी परतलो होतो.
सुमारे 21 दिवस समोर किनारा दिसत होता पण किनाऱ्यावर पाऊल ठेवणे शक्य होत नव्हतं. कंपनीची परवानगी, व्हिसा, पोर्ट अथोरीटी , टर्मिनलची परवानगी एक ना एक बारा भानगडी. दुरून डोंगर साजरे ऐवजी दुरून किनारा साजरा असे म्हणायची वेळ येते. किनाऱ्यावर जाऊन नवीन देश नवीन शहर बघायचे असते पण शोअर लिव्ह मिळेल का हे विचारायची पण हिम्मत होत नाही.
हल्ली इंटरनेटमुळे एखाद्या बंदरात पोचण्यापूर्वी तिथली प्रेक्षणीय स्थळे पर्यटन केंद्रे याबद्दलची माहिती एका क्लिक वर मिळते पण बंदरात पोचल्यावर शोअर लिव्ह नाही असं समजलं की सगळे जण हिरमुसले होऊन कामाला लागतात आणि पुढच्या बंदरात तरी जमिनीशी अर्थिंग होईल अशी अपेक्षा ठेवतात आणि दुर्बिणीच्या साहाय्याने किनाऱ्यावरील सृष्टी सौंदर्य पाहण्यात समाधान मानतात.
व्हॉट्स ऍप आणि मेसेंजर वर एखाद्या प्रियकराला त्याची प्रेयसी नेहमी ऑनलाईन दिसत असते तरीपण त्याला तिचा नकार येईल का या भीतीने I love you म्हणता येऊ नये अशी जी बिकट अवस्था होते तशीच अवस्था जहाजावर असणाऱ्या प्रत्येकाला समोर किनारा दिसत असताना होत असते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply