कडक खांदा होणे हे साधारणतः चाळीशीनंतर पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते. याची सुरुवात थोडयाशा खांद्याच्या दुखण्याने होते. पुढे पुढे रात्री दुखणे, खांद्याची हालचाल करणे कठीण होणे तसेच दिवसाही दुखण्यास सुरुवात होणे आणि नंतर संपूर्ण हातात दुखणे फैलावणे व सांधा संपूर्णपणे कडक होणे इ.मध्ये शेवट होऊ शकतो. याचे निश्चित कारण अजूनही कळलेलं नाही. म्हणून त्या दुखण्याला Idiopathic म्हणजे कारण न समजलेले दुखणे समजतात, परंतु हे दुखणे धूम्रपान करणाऱ्यांना, दमेकऱ्यांना, मधुमेह असलेल्यांना तसेच नेहमी खोकणाऱ्यांना आणि हृदरोग असलेल्यांना अधिकतः होते. पण असे रोग नसलेल्यांनाही होते. कधीतरी खांद्याजवळ किंवा हातात कुठेही अस्थिभंग झालेल्यांना चाळीशी झालेल्या लोकांना होऊ शकते. या प्रकारात एक गोष्ट चांगली म्हणजे हा मुदतीचा रोग आहे.
ठराविक मुदत संपल्यानंतर हा रोग आपोआपच निघून जातो व खांदा ठीक होतो. या रोगाची मुदत ६ महिने, १ वर्ष किंवा १ ।। वर्षे अशी असते. जितके आपले वय अधिक तितकी या रोगाची मुदत अधिक. ही मुदत जर तीन बरोबर भागात तोडली तर पहिल्या भागात याचा त्रास अधिक -असतो. म्हणजे रुग्णाला दुखणे अधिक असते. दुसऱ्या भागात ते कमी होते; पण सांध्याचा कडकपणा वाढतो आणि तिसऱ्या भागात मात्र हा कडकपणा हळूहळू कमी होत जातो आणि सांधा सुटू लागतो. पहिल्या भागात रुग्णांनी आपल्या सांध्याला सांभाळावे.
व्यायाम करून त्या आजारी सांध्याला अधिक त्रास देऊ नये. गरम पाण्याचा शेक देणे, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाणे वगैरे उपाय करावे, दुखत नसेल तेवढीच हालचाल करावी. दुसऱ्या भागात थोडी हालचाल करावी. तिसऱ्या भागात मात्र अवश्य हालचाल, व्यायाम करून सांधा सोडविण्यास मदत करावी. हल्ली दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करूनही हा सांधा सोडविता येतो. पूर्वी बेशुद्ध करून हा हात डॉक्टर जोरात हलवून सुटा करत असत. परंतु हल्ली असे सहसा करीत नाहीत; विज्ञानं जनहितार कारण त्यात इतर गुंतागुंत (कॉम्प्लिकेशन्स) होण्याची शक्यता असते. थोडक्यात ‘कडक खांदा’ सोडविण्यासाठी रामबाण औषधे निश्चितच उपलब्ध नाहीत. हा मुदतीचा रोग असल्याने मुदत संपताना जो डॉक्टर त्याचा इलाज करतो तो यशस्वी आणि नाणी डॉक्टर असे रुग्ण मानू लागतात.
-डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply