धुसर धुंद मेघांमधुनि, आली बरसत वर्षाराणी,
जलौघांच्या थेंबामधुनि, नकळत ब्रम्हानंदी टाळी लागली ।।धृ।।
बिंदु नव्हते शुद्ध जलाचे, ते तर अनमोल मोती माळेमधले,
झुळझुळणार्या शुभ्र धारांमधुनि, स्वानंदे अंतर भिजले ।
वर्षांमागुनि वर्षे सरली, परी वर्षा स्नाने सदैव रंगुनि आली,
निसर्ग देवीचे अगम्य वैभव, देई मनां नित्य झळाळी ।।
जलौघांच्या थेंबामधुनि, नकळत ब्रम्हानंदी टाळी लागली ।।१।।
कंच हिरव्या सृष्टी सखीला भेट द्यावया, मेघराज गर्जत आला,
देखुनि चिंब ओले भाव तयाचे, सृष्टीसखीला तोष जाहला ।
झिमझिमणार्या तुषारांतुनि, वर्षाराणी स्वैर धावू लागली,
घेतां अंगावरती ओघ जळाचे, मरगळ मनाची दूर जहाली ।।
जलौघांच्या थेंबामधुनि, नकळत ब्रम्हानंदी टाळी लागली ।।२।।
रोम रोम थेंबां मधुनि, पुलकित होऊनि, मनमयूर डोलू लागला,
संतोषाचा भव्य पिसारा, अवघे, अंतर माझे, व्यापुनि उरला ।
मुळशी जलाची संगतन्यारी, गात्रे सारी, शांत शांत झाली झाली,
नितांत सुंदर वातावरणीं, शमली तृष्णा, सदैव वर्षा-स्नानाची ।।
जलौघांच्या थेंबामधुनि, नकळत ब्रम्हानंदी टाळी लागली ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
८ जून २००७
मुळशी डॅम, ताम्हिनी घाट, पुणे
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply