नवीन लेखन...

श्रध्दा

गोष्ट अगदी खरीखुरी आहे. एका बाईला खूप प्रयत्नांनी बाळ होते. परंतु जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टर त्या बाईला जेवढी मदत करता येईल तेवढी करतात. परंतु बाळाची तब्येत सुधारत नाही. डॉक्टर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला देतात.

ती बाई फारशी सधन नसते. तिला समजते की मोठ्या हॉस्पिटलमधले डॉक्टर बरेच पैसे घेतात. काही वर्षे तशीच जातात. ती आपल्या बाळाला सांभाळायचा कसोशीने प्रयत्न करते. परंतु ते बाळ फार काळ तग धरु शकत नाही.

ते बाळ पाच वर्षाचे झाल्यावर त्याला श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागतो. इतरही काही अडचणी येऊ लागतात. त्याचा चेहरा काळा निळा पडू लागतो. आईला कळते की त्याला आता मोठ्या डॉक्टरांकडे नेण्यावाचून गत्यंतर नाही.

आईने एवढे वर्षात काही पैसे साठवलेले असतात. ते घेऊन ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाते. तिथले डॉक्टर मुलाला तपासतात आणि आईला सांगतात “याचे ऑपरेशन करावे लागेल. परंतु तरीही ते यशस्वी होईल आणि तुमचा मुलगा सामान्य जीवन जगू शकेल याची खात्री मी देऊ शकत नाही. ऑपरेशन शिवाय दुसरा पर्यायही नाही आणि ऑपरेशनच्या यशाची हमी देता येत नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.”

आई ऑपरेशनचा पर्याय स्विकारते. त्या मुलालाही त्याची कल्पना दिली जाते. ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर मुलाला सांगतात की आम्ही तुझ्या हृदयातले छिद्र बुजवणार आहोत. तू घाबरायचे नाहीस.

मुलगा डॉक्टरांना म्हणतो “मी ऑपरेशनला घाबरत नाही. फक्त एक विनंती करायची आहे. माझी आई म्हणते की आपल्या हृदयात परमेश्वराचा वास असतो. ती म्हणते की माझ्या हृदयातही परमेश्वर आहे. ऑपरेशनच्यावेळी कृपा करुन त्या परमेश्वराला इजा होऊ देऊ नका.

मुलाचे बोलणे ऐकून डॉक्टर हेलावून जातात. ऑपरेशनला सुरुवात होते. आईने हे ऑपरेशन घडवून आणण्यासाठी फारच काळ घालवलेला असतो. डॉक्टरांनी पाच वर्षांपूर्वी हे ऑपरेशन करायला सांगितलेले असते. या पाच वर्षात मुलाची अवस्था अधिक बिकट झालेली असते.

ऑपरेशनच्या दरम्यान मुलाला खूप रक्तस्त्राव होऊ लागतो. डॉक्टरांना काही केल्या तो थांबवता येत नाही. ऑपरेशन मध्येच सोडून डॉक्टर आपल्या केबिनमध्ये जाऊन बसतात. त्या मुलाच्या आईला कसे सांगावे की तुमचा मुलगा काही क्षणांचा सोबती आहे याचा विचार ते करत असतात. अचानक त्यांना त्या मुलाचे शब्द आठवतात. त्याच्या हृदयातला परमेश्वर आठवतो. एवढ्यात नर्स ऑपरेशन थियेटरमधून सांगायला येते की रक्तस्त्राव थांबला आहे. डॉक्टरांना आश्चर्य वाटते. ते तसेच उठून पुन्हा ऑपरेशन थियेटरमध्ये धाव घेतात. रक्तस्त्राव थांबल्यामुळे त्यांना पुढचे ऑपरेशन करणे सोपे जाते. ऑपरेशन यशस्वी होते. मुलगा वाचतो.

डॉक्टर बाहेर येऊन मुलाच्या आईला ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगतात. आई डॉक्टरांच्या पाया पडू लागते. डॉक्टर एक क्षण स्तब्ध उभे रहातात. एका क्षणी त्यांनी ऑपरेशन मध्येच सोडून दिलेले असते हे आईला सांगायची हिम्मत त्यांना होत नाही. चमत्कार त्या मुलाच्या श्रध्देने घडवलेला असतो. त्याच्या एका वाक्याने त्याचे सारे भवितव्यच बदलते.

श्रध्दा ही आपल्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. तिच्या बळावर आपण अशक्य वाटणाऱ्या प्रसंगातूनही सुखरुप पार पडतो आणि आपल्यालाच आश्चर्य वाटते की हे कसे घडले. त्या मुलालाही आईने एवढी पक्की श्रध्दा दिलेली असते की त्या एका विश्वासावर ऑपरेशनचे सगळे गणित बदलते. आपण आपली श्रध्दा देवावर आहे असे म्हणतो खरे परंतु आपण पूर्ण श्रध्दा ठेवत नाही. पूर्ण श्रध्दा ठेवल्याने काय काय घडू शकते हे आपण या गोष्टीतून पाहिले. चला तर, आपणही आपली श्रध्दा अधिक सुदृढ करुया.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..