“बाळ श्रावणा”, आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?”
“हा काय तुझ्या जवळच आहे”, श्रावण म्हणाला.
“असा जवळ ये बरं”, आई म्हणाली.
“हा आलो, काय पाहिजे आई तुला?” श्रावणाने विचारले.
आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी….’ “त्यापूर्वी काय? आई मी तुझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवणार नाही.’ श्रावण म्हणाला.
आई म्हणाली, “ते आम्हाला ठाउक का नाही? आम्ही उभयता म्हातारी माणसं, त्यात आंधळी. आमचं सर्व काही तू प्रेमाने करतोस. आम्हाला क्षणभरही विसरत नाहीस. सर्व प्रकारची सेवा करतोस. तुझ्यासारखा मातृभक्त आणि पितृभक्त मुलगा आम्हांस मिळाला आहे, ही देवाची कृपा. पण ..
“पण काय आई?, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने मातापितरांची सेवा केलीच पाहिजे. ते त्याचे कर्तव्यच आहे. पण आई, तुला काय हवे ते संकोच न करता सांग. बघ मी तुझी इच्छा पूर्ण करतो की नाही.” – श्रावण म्हणाला.
“तू करशील रे, म्हणूनच संकोच वाटतो. तुला किती त्रास द्यायचा!” “बाबा, तुम्ही तरी सांगा हो. माझं काही चुकलं आहे का? सेवेत काही कमी तर पडलो नाही?” “नाही रे बाळा, तुझ्या आईच्या मनांत काशी यात्रेला जावयाचे आहे. तुला कष्ट द्यायला तिचं मन तयार होत नाही.” श्रावणाचे बाबा म्हणाले.
“त्यात कसले कष्ट? बाबा, आई, आपण उद्याच निघायचे.
“अरे, पण आम्हांला चालणे कसे होणार? बैलगाडीचे हादरे आम्हांस सहन होणार नाहीत.’ “त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका.” श्रावण म्हणाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध व अंध मातापितरांना घेऊन श्रावणाने काशीचा मार्ग धरला. त्याने एक कावड केली. तिच्यामध्ये त्याने त्यांना बसवले.
ती खांद्यावर घेऊन तो मार्ग आक्रमू लागला. बरेच दिवसानंतर तो एका घनदाट अरण्यात आला. माता पितरे थकल्यामुळे त्याने अरण्यातच मुक्काम करावयाचे ठरविले. त्यांना तहान लागली म्हणून तो लोटा घेऊन पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.
याच वेळी आयोध्येचा राजा दशरथ त्याच अरण्यात आलेला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी हिंस्त्र प्राणी आले की त्यांची शिकार करावयाची म्हणून नदीच्या तीरावरील एका झाडावर धनुष्यास बाण लावून बसला होता.
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला.
लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि “आई ग!” अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
“कोण तू? अशा रात्री या अरण्यात काय करीत होतास?” – दशरथाने विचारले.
“मी श्रावण. माझ्या वृद्ध आणि अंध मातापितरांसाठी पाणी न्यायला आलो होतो. पण आपण कोण?” श्रावणाने क्षीण आवाजात विचारले.
“मी आयोध्येचा राजा दशरथ. शब्दवेधाची विद्या मला येत नसती, तर किती बरं झालं असतं! हा प्रसंग टळला असता.”- राजा म्हणाला.
“झालं ते झालं. होणारं कधीच टळत नाही. आता असं करा महाराज, हा कुशीत घुसलेला बाण काढा. फार वेदना होताहेत हो. अन् मग हे पाणी घेऊन माझ्या आईवडिलांना द्या. मात्र काही बोलू नका. तुम्ही श्रावण नाही, हे त्यांना कळणार नाही.” राजाने सांगितले की, बाण बाहेर काढल्याबरोबर तू मरण पावशील. तुला मी आयोध्येस नेतो व राजवैद्याकडून उत्तम औषधे देऊन बरा करतो. पण श्रावणाने ते ऐकले नाही. या वेदनेपेक्षा मृत्यू बरा, असे तो म्हणाला. नाइलाजाने राजाने बाण बाहेर काढला. विव्हळत विव्हळत मातृपितृभक्त श्रावणाने “आई! बाबा!” करीत प्राण सोडला.
दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मातापितरांकडे आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली, “बाळा, किती रे वेळ झाला तुला! किती कष्टतोस तू आमच्यासाठी! बाळा पाणी मिळेना का? फार दूर जावे लागले का रे?” दशरथाने तोंडातून चकार शब्द न काढता लोटा आईच्या हाती दिला. पण ती माऊली पाणी न पिताच म्हणाली, “बाळ, बोल ना रे. रागावलास आमच्यावर? तुला फार त्रास देत आहोत आम्ही. पण काय करू? रागावलास म्हणून बोलत नाहीस, होय ना? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीत.”
तहानलेल्या त्या वृद्धांनी पाणी प्यावे म्हणून दशरथास बोलावे लागले.
त्याचा आवाज ऐकताच दोघेही एकदम म्हणाले, “कोण तू? आमचा बाळ कोठे आहे? सांग काय केलंस तू त्याला?” दशरथाला सर्व हकिगत सांगावीच लागली.
ती ऐकताच त्या दोघांनी एकच आकांत मांडला. “बाळ, आम्हाला सोडून कसा रे गेलास? आम्हा आंधळ्यांची काठी गेली! बाळ किती कष्ट पडले रे तुला आमच्याकरता! आणि आमच्यासाठी प्राणही दिलास रे! तुझ्याशिवाय आम्ही जिवंत तरी कसे राहू? बाळ श्रावणा, श्रावणा…’ दशरथाने त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ती दोघे त्याच्यावरच उसळली आणि संतापाने म्हणाली, “आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास. आम्ही तर आता जगत नाहीच; पण लक्षात ठेव, आमच्यासारखाच तू पुत्रशोकाने मरशील. आमचा शाप आहे तुला.” आणि थोड्याच वेळात त्यांनी पुत्रशोकाने प्राण सोडला. धन्य मातृपितृभक्त श्रावण आणि धन्य ती मातापितरे!
[ ‘बालसुधा’, पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १२०-१२४]
Leave a Reply