श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. त्यावेळेस आम्ही देवीचौकात रहात होतो. घरासमोर देवीचे देऊळ तेथे श्री.सामक कुटुंब रहात होते. त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा त्यामुळे त्यांचेकडे रोज जाणे येणे असायचे. श्री. सामक हे श्रावण महीन्यात श्रावणीचे आयोजन करीत. बहुधा सुट्टीच्या दिवशीच रविवारी हा कार्यक्रम असे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन सोळे नेसून जावे लागत असे. माझे वय ११/१२ त्यामुळे सोळे नेसणे माहीत नव्हते. श्री. सामक यांची मुलेही माझ्याच वयाची त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला एक सोळ्याची लंगोटी केलेली होती. मीही तशीच सोळ्याची लंगोटी नेसून श्रावणीसाठी जायचो. सोबत पळी पंचपात्र आवश्यक होते. गुरुजी सांगतील त्या प्रमाणे आचमन संध्या करुन सुरुवात होई. वय लहान असल्याने फारसे गांभीर्य नसायचेच. पण श्रावणी नंतर नवीन जानवे घालायला मिळणार याचाच जास्त आनंद असायचा. पण त्या नविन जानव्यासाठी पंचगव्य नामक पेय प्यावे लागायचे. त्याची चव ज्यांनी पिले तोच सांगू शकेल. त्यानंतर गुरजी नवीन जानवे देत व ते घालून घरी आनंदात यायचो.
आता तो काळही गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.
— सुरेश काळे
२५/०७/२०१७