महान्तं विश्वासं तव चरणपंकेरुहयुगे
निधायान्यन्नैवाश्रितमिह मया दैवतमुमे।
तथापि त्वच्चेतो यदि मयि न जायेत सदयं
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्।।११।।
आई जगदंबेच्या चरणी असलेली आपली अनन्य शरणता आचार्य श्री येथे आर्तपणे सादर करीत आहेत. भक्ताच्या भक्तीचे ते सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे. भक्ती ही पतिव्रतेसमान एकनिष्ठ असायला हवी. या अनन्यशरणतेने आचार्यश्री म्हणतात,
महान्तं विश्वासं- माझा परम विश्वास, परिपूर्ण विश्वास आता एकाच जागी स्थिरावला आहे. ती जागा कोणती? म्हणशील तर,
तव चरणपंकेरुहयुगे- तव म्हणजे तुझे . पंके म्हणजे चिखलात. रुह म्हणजे उगवणारे.अर्थात कमळ. तर युग म्हणजे जोडी. अर्थात आई जगदंबे! कमळाप्रमाणे सुकुमार असणाऱ्या तुझ्या दोन चरणांवरच माझा ठाम विश्वास आहे. अविचल श्रद्धा आहे. त्यामुळेच,
निधायान्यन्नैवाश्रितमिह मया दैवतमुमे- हे उमे अर्थात देवी पार्वती ! तुझ्या या चरणांना निघाय अर्थात सोडून मी इह अर्थात या जगात अन्य कशालाही शरण गेलेलो नाही. तुझ्यावरच्या पूर्ण विश्वासामुळे मला अन्य कोणाकडे पाहण्याची आवश्यकताच नाही.
तथापि त्वच्चेतो यदि मयि न जायेत सदयं- तथापि अर्थात असा अनन्य शरण असतानां देखील जर त्वचेतो अर्थात तुझे मन माझ्याबद्दल सदय म्हणजे दयापूर्ण झाले नाही तर,
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्- हे लंबोदर जननी ! श्रीगणेशांच्या अनेक अवतारांच्या माते ! निरालंब अर्थात आश्रय रहित झालेला मी,कं यामि शरणम् ? म्हणजे कोणाला शरण जाऊ? ते तूच सांग.
मला आता तुझ्या शिवाय अन्य शरणागती नाही हेच आचार्यश्री निसंदिग्धपणे वर्णन करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply