त्वदन्यस्मादिच्छाविषयफललाभे न नियम-
स्त्वमर्थांनामिच्छाधिकमपि समर्थां वितरणे।
इति प्राहु: प्राञ्च: कमलभवनाद्यास्त्वयि मन-
स्त्वदाससक्तं नक्तं दिवमुचितमीशानि कुरु तत्।।१३।।
आई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
त्वदन्यस्मादिच्छाविषयफललाभे न नियम:- आई त्वदन्यत् म्हणजे तुझ्यापेक्षा भिन्न कोणाकडूनही, अस्मद् इच्छा विषय म्हणजे आमच्या मनात येणारे विषय, इच्छा, आशा आकांक्षा, फललाभे अर्थात फलद्रूप होण्याच्या बाबतीत, पूर्ण होण्याच्या बाबतीत, न नियम: अर्थात निश्चित असा नियम नाही. कदाचित या पूर्ण होतील किंवा कदाचित होणार देखील नाहीत. खात्रीने पूर्ण होतीलच असा नियम नाही. वेगळ्या शब्दात अन्य देवता परिपूर्ण मनोवांछित प्रदान करण्यात कदाचित समर्थ असतील किंवा नसतील, पण आई जगदंबे तुझ्या बाबतीत बोलायचे तर,
त्वमर्थांनामिच्छाधिकमपि समर्थां वितरणे। तू मात्र मागणी करणाऱ्यांच्या इच्छां पेक्षा देखील अधिक प्रदान करण्यास समर्थ आहेस.
आपल्या बोलण्याला आधार देण्यासाठी आचार्य श्री म्हणतात हे मीच म्हणतो असे नाही तर,
इति प्राहु: प्राञ्च: कमलभवनाद्या:- हात जोडून उभे असलेले, कमलभवन म्हणजे भगवान ब्रह्मदेव. आदी म्हणजे विष्णु, शंकर इत्यादी देखील इति प्राहु: अर्थात असेच म्हणत असतात. त्यांच्याही सगळ्या इच्छा तूच पूर्ण करतेस.
त्वयि मन-
स्त्वदासक्तं- माझे मन तुझ्याच ठायी आसक्त झाले आहे. नक्तं म्हणजे रात्र तर दिवं म्हणजे दिवस. अर्थात ही म्हण रात्रंदिन तुझ्याच चरणी लीन आहे. आता मला अन्य शरणस्थान नाही. आता तूच काय तो विचार कर आणि उचितमीशानि कुरु तत्- हे ईशानी, परमेश्वरी तूच उचित म्हणजे योग्य काय ते कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply