स्फुरन्नानारत्नस्फटिकमयभित्तिप्रतिफल-त्त्वदाकारं चंचच्छशधरकलासौधशिखरम्।
मुकुन्दब्रह्मेन्द्रप्रभृतिपरिवारं विजयते
तवागारं रम्यं त्रिभुवनमहाराजगृहिणि।।१४।।
आई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे. ते म्हणतात
स्फुरन्नानारत्नस्फटिकमयभित्ति:- आई तुझा भवनाच्या भिंती या तेजाने लखलखणाऱ्या स्फटिक इत्यादी रत्नानी जवडलेल्या आहेत.
प्रतिफलत्त्वदाकारं चंचल् – हे पुढचे वर्णन अधिक रोमांचकारी आहे. भिंतींना रत्न जडवले आहे त्यात वैशिष्ट्य नाही त्या प्रत्येक रत्नात आई तुझे प्रतिबिंब दिसत आहे. जणू त्यामुळेच ती रत्ने चमकत आहेत. ती रत्ने जड, अचेतन न उरता तुझ्या प्रतिबिंबांच्या चैतन्याने युक्त, चंचल् झालेली आहेत .
शशधरकलासौधशिखरम्- या भवनाच्या उज्वलतेचे कार्य भगवान श्री चंद्र सांभाळत आहेत. शश म्हणजे ससा. तो ज्याने अंगावर धारण केला आहे तो शशधर. त्याच्या कला. त्याच्या प्रकाशाने आई जगदंबेच्या महालाचे सौध शिखर म्हणजे गच्चीवरचा भाग उजळून निघालेला आहे.
मुकुन्दब्रह्मेन्द्रप्रभृतिपरिवारं – घराचे वैभव केवळ बाह्य सौंदर्यात नाही तर तेथे राहणाऱ्या लोकात आहे. आईच्या घरात मुकुंद म्हणजे भगवान विष्णू, ब्रह्म म्हणजे भगवान ब्रह्मदेव, इंद्र अर्थात देवराज असा अतिदिव्य परिवार आहे. ते खरे वैभव आहे.
विजयते तवागारं रम्यं त्रिभुवनमहाराजगृहिणि- अशा अद्वितीय घरात रहात असल्यामुळे तू महाराजगृहिणी आहेस.
संपूर्ण त्रैलोक्यात रम्य असणाऱ्या तुझ्या या घराचा विजय असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply