निवास: कैलासे विधिशतमखाद्या: स्तुतिकरा:कुटुम्बं त्रैलोक्यं कृतकरपुट: सिद्धिनिकर:।
महेश: प्राणेशस्तदवनिधराधीशतनये
न ते सौभाग्यस्य क्वचिदपि मनागस्ति तुलना।।१५।।
आई जगदंबेच्या संसारातील प्रत्येकच गोष्ट अद्वितीय आहे.
आईच्या या लोकोत्तर संसाराचे अधिक वर्णन करताना आचार्य म्हणतात,
निवास: कैलासे- आईचे हे निवासस्थान कैलासावर आहे. इथे एक वेगळीच गोष्ट समजून घ्यायला हवी. कैलासाला जाणे याचा अर्थ सामान्य माणसाचा संसार संपणे. जिथे सगळ्या जगाचा संसार संपतो तेथे आईचा संसार आरंभ होतो.
कैलासात इतरांचा संसार राखरांगोळी होतो. मात्र आईचा संसार त्या कैलासात फुलतो. हेच तिचे लोकविलक्षणत्व आहे.
विधिशतमखाद्या: स्तुतिकरा:- विधी अर्थात भगवान ब्रह्मदेव. शतमख म्हणजे शंभर यज्ञ. शंभर अश्वमेध यज्ञ केल्यावर देवांचे राजपद प्राप्त होत असते. असे स्वर्गाधीश पद प्राप्त झालेले इंद्र. हेच या आईचा भवनातील स्तुतिपाठक आहेत.
कुटुम्बं त्रैलोक्यं- संपूर्ण त्रेलोक्य हेच आईचे कुटुंब आहे.
कृतकरपुट: सिद्धिनिकर:- सर्व ६४ कोटी अर्थात् ६४ प्रकारच्या सिद्धींचा निकर म्हणजे समूह कृतकरपुट: म्हणजे आई जगदंबेच्या समोर सेविका रूपात हात जोडून उभा असतो.
महेश: प्राणेश:- भगवान महेश अर्थात श्री शंकर हे तुझे प्राणेश्वर, पती परमेश्वर आहेत.
अवनिधराधीशतनये- अवनी अर्थात पृथ्वी, ती सगळ्यांना धारण करते त्यामुळेच तिला धरा असे म्हणतात. त्या धरेला धारण करणारा पर्वत म्हणजे धराधर. त्या हिमालयाची कन्या असल्यामुळे आईला अवनिधराधीशतनया असे म्हणतात.
न ते सौभाग्यस्य क्वचिदपि मनागस्ति तुलना- आई अशा अद्वितीय गोष्टींमुळे तुझ्या संसाराला, सौभाग्याला या जगात तुलनाच नाही.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply