वृषो वृद्धो यानं विषमशनमाशा निवसनंश्मशानं क्रीडाभूर्भुजगनिवहो भूषणविधि:।
समग्रा सामग्री जगति विदितैवं स्मररिपो-
र्यदेतस्यैश्वर्यं तव जननि सौभाग्यमहिमा।।१६।।
या श्लोकात आचार्यश्रींची प्रतिभा एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करते. आरंभीच्या तीन ओळीत भगवान शंकरांचे वर्णन आहे. हे वर्णन काहीसे नकारात्मक म्हणता येईल. मात्र त्या नकारात्मकतेच्या आधारे आचार्यश्री चौथ्या ओळीत आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.
कशी आहे भगवान शंकरांची अवस्था? आचार्यश्री म्हणतात,
वृषो वृद्धो यानं – त्यांना फिरण्या करता वाहन म्हणून एक म्हातारा बैल आहे.
विषमशनम्- अशन म्हणजे खाणे. खाण्यासाठी जवळ विष आहे.
आशा निवसनं- आशा शब्द येथे दिशे साठी वापरला आहे. आशा संपत नाहीत तसा दिशांना अंत नाही. त्या दिशा म्हणजे दिग् हेच ज्यांचे अंबर म्हणजे वस्त्र ते दिगंबर.
श्मशानं क्रीडाभू- क्रीडे ची अर्थात राहण्याची जागा कोणती तर स्मशान.
भुजगनिवहो भूषणविधि:- त्यांनी आभूषण अंगावर सर्प धारण केले आहेत.
अशाप्रकारे स्मररिपू अर्थात मदनाचे शत्रु असणाऱ्या भगवान शंकरांची, समग्रा सामग्री जगति विदितैवं – समग्र वैभवशाली संपत्ती सगळ्या जगाला माहीतच आहे. अर्थात त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काहीच वैभव नाही.
मात्र असे असले तरी त्यांना महादेव म्हटल्या जाते. ते का? याचे कारण विशद करताना आचार्यश्री म्हणतात,
यदेतस्यैश्वर्यं तव जननि सौभाग्यमहिमा- हे आई जगदंबे हा सर्व तुझ्या सौभाग्याचा महिमा आहे.
तू सोबत आहे म्हणून त्या स्मशानवासीला लोक शिव अर्थात पवित्र म्हणतात.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply