अशेषब्रह्माण्डप्रलयविधिनैसर्गिकमति:श्मशानेष्वासीन: कृतभसितलेप: पशुपति:।
दधौ कण्ठे हालाहलमखिलभूगोलकृपया
भवत्या: संगत्या: फलमिति च कल्याणि कलये।।१७।।
भगवान श्री शंकरांचे केवळ बाह्यरंगच नव्हे तर अंतरंग देखील आपल्यासाठी तितकेच भयावह आहे हे सांगत असताना आचार्य श्री म्हणतात,
अशेषब्रह्माण्डप्रलयविधिनैसर्गिकमति:- अशेष म्हणजे या संपूर्ण, ब्रम्हांडाचा प्रलय म्हणजे विनाशाची, विधी म्हणजे पद्धती, त्यांची नैसर्गिक मती अर्थात स्वाभाविक प्रवृत्ती आहे. अर्थात त्यांच्या मनात सतत या विश्वाच्या विनाशाचा विचार चालत असतो. तेच त्यांचे कार्य आहे.
श्मशानेष्वासीन: – यासाठीच भगवान शंकर स्मशानात निवास करतात. कारण सामान्य जीवनाच्या दृष्टीने त्याच्या जीवनाचा विनाश येथेच होत असतो. समष्टीच्या प्रलयाची ही देवता व्यष्टि प्रलयाचे स्थान असणाऱ्या स्मशानात निवास करते.
कृतभसितलेप: – अंगाला ते भस्माचा लेप लावून बसलेले असतात. तेही सामान्य नव्हे तर चिताभस्म.
पशुपति:- पशुपती शब्दाचा सामान्य अर्थ नंदी वर बसणारे होतो. पण पशु शब्द जीव अर्थाचा असल्याने सकल जीवांचे अधिपती म्हणजे पशुपती. पण ते त्या जीवांच्या विनाशस्थळी आहेत.
मात्र असे असले तरी,
दधौ कण्ठे हालाहलमखिलभूगोलकृपया- सकल विश्वाच्या विनाशाचाच विचार करणाऱ्या त्या भगवान शंकरांनी सगळ्या जगावर कृपा करण्यासाठी आपल्या कंठात हलाहल विष धारण केले.
वास्तविक त्यांची ही कृती त्यांच्या मूळ स्वरूपाच्या विपरीत आहे. जगाचा विनाश करणारे ते विष त्यांनी स्वत:च्या कंठात धारण केले.
काय कारण असावे? आचार्य श्री म्हणतात, त्यांच्यात आलेली ही कृपाळू कृती म्हणजे,
भवत्या: संगत्या: फलमिति च कल्याणि कलये- हे कल्याणी! हे तुझ्या संगतीचे फल आहे. तुझ्या संगती मुळे ते विश्व विनाशक विश्व रक्षक ठरतात. हे तुझे माहात्म्य आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply