त्वदीयं सौन्दर्यं निरतिशयमालोक्य परयाभियैवासीद्गंगा जलमयतनु: शैलतनये।
तदेतस्यास्तस्माद्वदनकमलं वीक्ष्य कृपया प्रतिष्ठामातन्वन्निजशिरसिवासेन गिरिश:।।१८।।
आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,
त्वदीयं सौन्दर्यं निरतिशयमालोक्य परया
भियैवासीद्गंगा जलमयतनु: शैलतनये।
हे शैल अर्थात पर्वत तनये पार्वती ! तुझ्या निरतिशय अर्थात सर्वाधिक अद्वितीय सौंदर्याला पाहून आपले सौंदर्य यापुढे काहीच नाही असा विचार मनात आल्याने, आपल्या सौंदर्याच्या पराभवाच्या भीतीने देवी गंगा जलमयतनु म्हणजे पाण्याचा देह धारण केलेली झाली. वेगळ्या शब्दात लाजून तिचे पार पाणी पाणी झाले. यामुळेच मूळ देवता रूप असलेली गंगा जलमय होऊन नदीरूपात वाहू लागली.
अर्थात आई आदिशक्तीच्या सौंदर्याने देवी गंगेचे असे पारिपत्य झाले असले तरी भगवान शंकरांना ती देखील तितकीच प्रिय आहे. तिच्या पराभवाने तिची झालेली अवस्था पाहून त्यांचे मन द्रवित झाले. तिला सन्मान प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी एक वेगळाच प्रयोग केला. आचार्य श्री म्हणतात,
तदेतस्यास्तस्माद्वदनकमलं वीक्ष्य कृपया- तिचे मुखकमल अशा रीतीने अत्यंत म्लान झालेले पाहून, तिच्यावर कृपा निर्माण झालेल्या, तिची दया आलेल्या,
प्रतिष्ठामातन्वन्निजशिरसिवासेन गिरिश:- भगवान गिरीश म्हणजे शंकरांनी तिला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून आपल्या मस्तकावर धारण केले.
जणू थोडे वरचे स्थान देऊन तिचा सौंदर्य पराभवाने गेलेला गौरव वाढविला.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply