विशालश्रीखण्डद्रवमृगमदाकीर्णघुसृण-प्रसूनव्यामिश्रं भगवति तवाभ्यंगसलिलम्।
समादाय स्रष्टा चलितपदपांसून्निजकरै:
समाधत्ते सृष्टिं विबुधपुरपंकेरुहदृशाम्।।१९।।
खरे वैभव ते, जे इतरांना वैभवसंपन्न करते. खरे श्रेष्ठत्व ते जे इतरांना श्रेष्ठत्व प्रदान करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य ते जे इतरांना सौंदर्य प्रदान करते. आई जगदंबेच्या अशा सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री प्रथम तिच्या स्नानासाठी केलेल्या तयारीचे वर्णन करीत आहेत.
विशालश्रीखण्डद्रवमृगमदाकीर्णघुसृण-
प्रसूनव्यामिश्रं भगवति तवाभ्यंगसलिलम्- येथे विशाल हा शब्द भरपूर, प्रचुर या अर्थाने आला आहे. श्रीखंड म्हणजे चंदन. त्याचा द्रव अर्थात एकतर चंदनाचे तेल किंवा चंदनाची उगाळलेली उटी. मृगमद म्हणजे कस्तुरी. चंदन आणि कस्तुरीच्या कणांनी सुगंधित केलेले. प्रसून शब्दाचा अर्थ आहे पुष्प. कुसुम. व्यामिश्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. तर अभ्यंगसलील म्हणजे स्नानाकरिता काढलेले गरम पाणी. सगळ्याचा एकत्रित अर्थ करता, हे भगवती आई जगदंबे तुझ्या स्नाना करिता काढलेले गरम पाणी चंदन आणि कस्तुरीच्या कणांनी सुगंधित केले असून त्यात विविध फुले विखुरली आहेत.
समादाय- अशा तुझ्या स्नानाने अधिकच पवित्र झालेल्या जलाला गोळा करून, चलितपदपांसून्निजकरै:- असे स्नान करून स्नानगृहातून निघाल्यानंतर तुझ्या पावलाने पवित्र झालेली धूळ आपल्या हाताने गोळा करून,
समाधत्ते सृष्टिं विबुधपुरपंकेरुहदृशाम्- विबुधपुर अर्थात स्वर्गातील अप्सरा अशा पंक म्हणजे या सर्व सुगंधित द्रव्यांनी अधिकच सुगंधित झालेल्या तुझ्या चरणधूलीने आपले सौंदर्य प्रसाधन करतात.
त्यांना सौंदर्यासाठी तुझ्या चरणकमलांची धूलीच साधन ठरते. हे तुझे सौंदर्य महात्म्य होय.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply