घृतक्षीरद्राक्षामधुमधुरिमा कैरपि पदै-र्विशिष्यानाख्येयो भवति रसनामात्रविषय:।
तथा ते सौन्दर्यं परमशिवदृङ्मात्रविषय:
कथंकारं ब्रूम: सकलनिगमागोचरगुणे !!२!!
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी आई जगदंबेच्या गुणांचे वर्णन करण्याचा संकल्प तर केला. पण त्यांची पंचाईत झाली आहे की हे वर्णन करावे तरी कसे?
गुणांचे वर्णन तर फार लांब झाले. साधे सौंदर्याचे वर्णनही संभव नाही. साधे सौंदर्याचे यासाठी म्हटले की ते प्रथम दृष्टीस पडते. गुण खूप नंतर कळतात.
आई जगदंबेच्या सौंदर्याचे वर्णन का करता येत नाही? तर आचार्य श्री म्हणतात, घृत अर्थात तूप, क्षीर अर्थात दूध, द्राक्षा अर्थात फळांचा रस, मधू अर्थात मध या सर्व गोष्टींचा गोडवा कोणत्या शब्दात वर्णन करणार?
हे सर्व पदार्थ विशेष रूपात अनाख्येय अर्थात न सांगता येणारे आहेत. कारण ते केवळ रसनेचा विषय आहेत. अर्थात त्यांचा केवळ अनुभव घेता येतो वर्णन करता येत नाही.
वर्णन करते जीभ. जीभ ही अशी अद्भुत आहे की रसना रूपात ती ज्ञानेंद्रियात आहे आणि जिव्हा रूपात कर्मेंद्रियातही.
पण तरी तिची अडचण पहा कशी आहे? दोन्हीकडे असणारी ती, या पदार्थांची चव ती स्वतः घेत असली तरी त्या चवीचे कोणतेच वर्णन तिला करता येत नाही.
स्वतः अनुभवलेल्या गोष्टींची जर ही अवस्था असेल तर डोळ्यांनी पाहिलेल्या सौंदर्याचे ती काय वर्णन करणार? तो तिच्या अनुभवाचा विषयच नाही. त्याबद्दल ती काय सांगणार?
त्यातही ते सौंदर्य सामान्य नाही. बाह्य जड पदार्थाचे नाही. सामान्य स्त्रीच्या सौंदर्याचा विषय नाही
आचार्य श्री म्हणतात,
‘परमशिवदृङ्मात्रविषय:’ अर्थात आई जगदंबेच्या सौंदर्याचा अंतपार फक्त भगवान शिवांनाच लागू शकतो.
सकल निगम अर्थात वेद, शास्त्रांनाही जिचे गुण अगोचर आहेत अशा हे जगदंबे मी तुझ्या गुणांचे वर्णन करू तरी कसे?
‘शब्दात वर्णन करताच येत नाही’, अशा शब्दातच ते जगदंबेच्या गुणातीतत्वाचे वर्णन करीत आहेत. केवळ वंदन करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply