मुखे ते ताम्बूलं नयनयुगले कज्जलकला !ललाटे काश्मीरं विलसति गले मौक्तिकलता।
स्फुरत्कांची शाटी पृथुकटितटे हाटकमयी !
भजामि त्वां गौरीं नगपतिकिशोरीमविरतम् ।।३।।
जरी परिपूर्ण वर्णनाची अडचण असली तरी जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या एकेका गोष्टी चे वर्णन करीत आहेत.
मुखे ते ताम्बूलं – आई तुझ्या मुखात तांबूल शोभून दिसतो. स्नान, विलेपन, अलंकार परिधान या सगळ्यानंतर भोजन केले जाते. त्यानंतर तांबूल भक्षण. अर्थात तो अंतर्बाह्य तृप्ततेचे प्रतीक आहे.
नयनयुगले कज्जलकला- अर्थात आईच्या दोन्ही डोळ्यात काजळाची रेष शोभून दिसत आहे.
ललाटे काश्मीरं- आईने कपाळावर केशर आणि कस्तुरीचा टिळा धारण केला आहे. केशर कश्मीर मध्ये तयार होते. तर कस्तुरी त्याच्याही पलीकडे असणाऱ्या हिमालयात आढळणाऱ्या कस्तुरी मृगां पासून मिळते. त्यामुळेच या दोन्ही पदार्थांना काश्मिर अर्थात कश्मीरमध्ये मिळणारे, असे म्हटले आहे.
विलसति गले मौक्तिकलता- अर्थात आई जगदंबेच्या गळ्यात मोत्यांच्या अनेक माळा लटकत आहेत.
स्फुरत्कांची शाटी पृथुकटितटे हाटकमयी – पृथुकटीतट अर्थात विशाल अशा कमरेच्या किनाऱ्यावर , स्फुरत अर्थात लखलखणारी, हाटकमयी म्हणजे सोन्यापासून निर्माण केलेली, रत्नजडित कांची म्हणजे मेखला कंबरपट्टा याने युक्त अशी शाटिका अर्थात साडी जगदंबेने परिधान केली आहे.
शेवटच्या ओळीत आचार्यश्री म्हणतात, नग म्हणजे पर्वत. त्यांचा पती म्हणजे राजा. अर्थात हिमालय. त्या हिमालयाची कन्या असणाऱ्या, हे नगपतिकिशोरी ! हे गौरी मी अविरत अर्थात अखंड तुझे भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply