विराजन्मन्दारद्रुमकुसुमहारस्तनतटी
नदद्वीणानादश्रवणविलसत्कुण्डलगुणा।
नतांगी मातंगीरुचिरगतिभंगी भगवती
सती शम्भोरम्भोरुहचटुलचक्षुर्विजयते।।४।।
विराजन्मन्दारद्रुमकुसुमहारस्तनतटी- आई जगदंबेच्या गळ्यात मंदार पुष्पांचा माळा असतात. मंदार म्हणजे पांढरी रुई. याला शास्त्रात कल्पवृक्ष म्हटले आहे. हा स्वर्गीय वृक्ष. त्याच्या फुलांच्या माळा आईच्या गळ्यात शोभून दिसत आहेत.
नदद्वीणानादश्रवणविलसत्कुण्डलगुणा- नदद्वीणा अर्थात नाद करीत असलेल्या वीणा. त्या वीणेचा दिव्य नाद तो नदद्वीणानाद. कुंडलांनी सुशोभित असणाऱ्या कानांनी आई जगदंबा त्या नादाला ऐकत बसली आहे.
नतांगी- नत म्हणजे नम्र. आई जगदंबा परमशक्तीशाली असून देखील त्या शक्तीने उन्मत्त नाही. शक्ती आणि नम्रता यांचा अद्वितीय संगम आईच्या ठाई आहे.
मातंगी- दशमहाविद्यां मध्ये आई जगदंबेचे एक रूप मातंगी वर्णिले आहे. मतंग ऋषींच्या आश्रमात प्रकटल्यामुळे हे नाव प्राप्त झाले. वाणीची आणि सुख शांतीची देवता आहे देवी मातंगी.
रुचिरगतिभंगी- आई जगदंबा चालते त्यावेळी तिच्या भारदस्तपणामुळे ती मध्येच थांबत थांबत पुढे जाते. त्यामुळे तिचा होणारा गतिभंग हा अत्यंत रुचीर, रमणीय, सुंदर आहे अशी.
भगवती- भग शब्दाचा अर्थ आहे तेज. तेजाने युक्त ती भगवती.
सती शंभो:- भगवान शंकरांची प्रियतमा असणारी.
अम्भोरुहचटुलचक्षु- अंभ म्हणजे पाणी. त्यात निर्माण होते ते अंभोरूह म्हणजे कमळ. त्या कमळाची जशी मोहक हालचाल असते आणि जसे मनोहरी सौंदर्य असते तसे जिचे चक्षु म्हणजे नेत्र आहेत ती अम्भोरुहचटुलचक्षु.
अशा जगदंबेचा विजय असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply