नवीनार्कभ्राजन्मणिकनकभूषापरिकरै-
र्वृताङ्गी सारङ्गीरुचिरनयनाङ्गीकृतशिवा।
तडित्पीता पीताम्बरललितमञ्जीरसुभगा
ममापर्णा पूर्णा निरवधिसुखैरस्तु सुमुखी।।५।।
सौंदर्य म्हटले की अनिवार्यपणे ज्यांचा विचार येतो ती म्हणजे आभूषणे. आई जगदंबेच्या अशा दिव्य दागिन्यांचे वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, नवीनार्क अर्थात् नुकताच उगवलेला म्हणजे सूर्य. त्याचे भ्राज म्हणजे तेज,चकाकी हा त्या दागिन्यांचा स्थायीभाव आहे. नुकताच उगवलेला सूर्य म्हणतांना तेजस्विता तर अपेक्षित आहे पण दाहकता नाही.
अशा आल्हाददायक तेजाने युक्त असलेले मणी म्हणजे रत्न आणि कनक म्हणजे सोने यांनी युक्त असणाऱ्या आभूषणांनी जिचे अंग वेढलेले आहे अशी ती ‘नवीनार्कभ्राजन्मणिकनकभूषापरिकरै-
र्वृताङ्गी’.
सारङ्गि – सारंग शब्दाच्या अनेक अर्थांपैकी आहे एक अर्थ आहे हरीण. त्याच्या समान डोळे असणारी ती सारंगी.
अशी हरिणी प्रमाणे रुचिर अर्थात सुंदर डोळ्यांनी ती जगदंबा भगवान शंकरांकडे पाहत राहते. त्यामुळे तिला ‘सारङ्गीरुचिरनयनाङ्गीकृतशिवा ‘ असे म्हणतात.
तडित्पीतापीताम्बर- तडित् अर्थात विद्युत. त्या विजेप्रमाणे पिवळ्याधमक रंगाच्या आणि चकाकणाऱ्या पीतांबरांने आई शोभून दिसत आहे. ललितमञ्जीरसुभगा- ललित अर्थात अत्यंत सुंदर. मंजिर म्हणजे पैंजण. त्याने सुभगा अर्थात भाग्यशालीनी असणारी ती ललितमञ्जीरसुभगा.
अपर्णा माझे पान देखील न खाता भगवान शंकराची उपासना करणारी.
ती परीपूर्ण, सुमुखी निरवधी अर्थात तत्काळ सुखप्रदान करणारी होवो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply