हिमाद्रे: संभूता सुललितकरै:
पल्लवयुतासुपुष्पा मुक्ताभिर्भ्रमरकलिता चालकभरै:।
कृतस्थाणुस्थाना कुचफलनता सूक्तिसरसा
रुजां हन्त्री गन्त्री विलसति चिदानन्दलतिका!!६!!
हिमाद्रे: संभूता- हिम म्हणजे बर्फ. अद्री म्हणजे पर्वत. बर्फाने आच्छादलेला पर्वत म्हणजे हिमालय. त्या पर्वतराजा पासून जन्माला आलेली, कन्या. त्यामुळे हिमाद्रे: संभूता.
सुललितकरै: पल्लवयुता- सुललित म्हणजे अत्यंत मनोहारी. लोभस. पल्लवयुता अर्थात वेल. कर म्हणजे हात. वेलीप्रमाणे नाजूक, लोभस, मनोहारी हातांनी युक्त असणारी. सामान्यतः हात दोनच असतात. पण आई जगदंबेचे स्वरूप अष्टभुजा, दशभुजा असते. त्यामुळे येथे कर शब्दाचे बहुवचन आले आहे.
सुपुष्पा मुक्ताभिर्भ्रमरकलिता चालकभरै:- सपुष्पा फुलांनी फुलवलेला. मुक्ता म्हणजे मोत्यांनी सजवलेला. भ्रमरकलिता म्हणजे त्या फुलां मुळे तथा आईच्या अंगभूत सुगंधाने आकृष्ट झालेल्या भुंग्यांच्या रांगांनी युक्त असलेला, अलकभर म्हणजे केशसंभार. यांने युक्त असलेली ती
सुपुष्पा मुक्ताभिर्भ्रमरकलिता चालकभरा .
कृतस्थाणुस्थाना- स्थाणू अर्थात अविचल. भगवान शंकरांना स्थाणू असे म्हणतात. त्यांना जी स्थान अर्थात बसण्याची जागा करते, अर्थात त्यांच्या मांडीवर विराजमान असते तिला कृतस्थाणुस्थाना म्हणतात.
कुचफलनता- हृदयस्थ अमृतभाराने झुकलेली.
सूक्तिसरसा- स्तोत्राचा रसग्रहण करणारी
रुजां हन्त्री- सकल रोगांना दूर करणारी.
गन्त्री- गमनशीला. चैतन्यमयी.
विलसति- शोभायमान. अतीव सुंदर.
चिदानन्दलतिका- चित् म्हणजे चैतन्य, ज्ञान आणि आनंद यांची जणू लतिका म्हणजे वेल. भक्तांना या गोष्टी पुरविणारी.
– अशी माझी आई जगदंबा आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply