सपर्णामाकीर्णां कतिपयगुणै: सादरमिह
श्रयन्त्यन्ये वल्लीं मम तु मतिरेवं विलसति।
अपर्णैका सेव्या जगति सकलैर्यत्परिवृत:
पुराणोSपि स्थाणु: फलति किल कैवल्यपदवीम्!!७!!
आई जगदंबेच्या अपर्णा नावाचा विचार करीत आचार्यश्रींनी इथे एका वेगळ्याच पद्धतीने आईचा गौरव केला आहे.
सपर्णामाकीर्णां कतिपयगुणै:- सपर्णा अर्थात पानांनी लदबलेली. त्यासोबत अनेक गुणांनी आकीर्णा अर्थात संपन्न असलेली. इथे पानांचा संबंध वेली सोबत असल्याने अन्य गुण म्हणजे फुलांचे गुच्छ किंवा फळांचे भार.
सादरमिह
श्रयन्त्यन्ये वल्लीं- अशा वेलीला सामान्य लोक अत्यंत आदराने, प्रेमाने शरण जातात.
अर्थात अशा प्रकारे पाने, फुले, फळे देणाऱ्या वृक्षांना, वेलींनाच लोक पसंत करतात. अशा वेलीच्या आश्रयाला जातात.
मम तु मतिरेवं विलसति – पण या जगरहाटीच्या विरुद्ध जात आचार्यश्री म्हणतात, पण माझी बुद्धी तर असे सांगते…..
अपर्णैका सेव्या जगति सकलै- या जगात सगळ्यांना एक अपर्णाच सेवायोग्य आहे.
आई पार्वतीने भगवान शंकरांची आराधना करताना झाडाचे पान सुद्धा न खाण्याचे व्रत केले होते. त्यामुळे तिला अपर्णा असे म्हणतात.
आचार्य या अपर्णा शब्दावरून सामान्य जगातील कल्पवल्ली सोबत तुलना करीत त्या सपर्णा वेली पेक्षा ही अपर्णा श्रेष्ठ आहे हेच सांगत आहेत.
यत्परिवृत:
पुराणोSपि स्थाणु: फलति किल कैवल्यपदवीम् – तिचे श्रेष्ठत्व सांगतांना आचार्य शेवटी म्हणतात की स्थाणू अर्थात हालचाल न करणारा जुना खंबा किंवा निर्जीव दगड. तसे अत्यंत निश्चल असणाऱ्या भगवान शंकरांना स्थाणू म्हणतात. हिचा आश्रय केला तर असे स्थाणू भगवान शंकर देखील कैवल्य अर्थात परमानंद पदाला प्राप्त होतात.मग सामान्य सजीव वाट्टेल ते प्राप्त करेल यात आश्चर्य ते काय?
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply