विधात्री धर्माणां त्वमसि सकलाम्नायजननीत्वमर्थानां मूलं धनदनमनीयाड्घ्रिकमले।
त्वमादि: कामानां जननि कृतकन्दर्पविजये
सतां मुक्तेर्बीजं त्वमसि परमब्रह्ममहिषी।।८।।
मानवी जीवनात प्राप्तव्य अशा चार अत्यंत श्रेष्ठ गोष्टींना पुरुषार्थ असे म्हणतात. अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. पुरुष अर्थात जीवाने मिळवण्याच्या या चार गोष्टी. धर्म-अर्थ-काम-मोक्ष अशा या चारही पुरुषार्थांना प्रदान करणाऱ्या आई जगदंबेचे वैभव आचार्यश्री या श्लोकात वर्णन करीत आहेत.
विधात्री धर्माणां त्वमसि सकलाम्नायजननी- हे आई तू सर्व धर्मांची विधात्री अर्थात निर्माण कर्ती आहे. तू सकल आम्नाय अर्थात शास्त्रांची जननी आहेस. या दृष्टीने सर्व धर्माचे तू मूळ आहेस.
त्वमर्थानां मूलं
धनदनमनीयाड्घ्रि
कमले- हे आई तू सर्व अर्थांचेही मूळ आहेस. धनद अर्थात कुबेर देखील वैभव प्राप्तीसाठी तुझ्या अंघ्री म्हणजे चरणकमलांचे वंदन करतो. कुबेराला देखील तूच वैभव प्रदान करते.
त्वमादि: कामानां जननि कृतकन्दर्पविजये – कंदर्प अर्थात मदन. त्याला आपल्या सौंदर्याने जिंकते ती कृतकन्दर्पविजया. अशी असणारी हे आई जगदंबे तू सर्व कामांची अर्थात इच्छांची जननी आहेस. काम शब्द मदनासाठी ही वापरतात आणि इच्छांसाठीही.
सतां मुक्तेर्बीजं त्वमसि परमब्रह्ममहिषी- हे परब्रह्म महिषी अर्थात परब्रह्माच्या सम्राज्ञी तू सर्व सज्जनांच्या मुक्तीचे बीज आहेस. अर्थात सिद्ध,योगी, मुनी मुक्तीसाठी तुझ्याच चरणाचा आश्रय घेतात.
अशारीतीने हे चारही पुरुषार्थ आई जगदंबेच्या चरणाशी प्राप्त आहेत. असेच आचार्यश्री येथे सुस्पष्ट करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply