प्रभूता भक्तिस्ते यदपि न ममालोलमनस-
स्त्वया तु श्रीमत्या सदयमवलोक्योSहमधुना।
पयोद: पानीयं दिशति मधुरं चातकमुखे
भृशं शंके कैर्वा विधिभिरनुनीता मम मति:।।९।।
स्वतः कडे न्यूनत्व घेणे, स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हे संतांचे वैभव आहे. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे स्वतःच्या अशाच अल्पक्षमतेचे कथन आई जगदंबे च्या समोर करीत आहेत. असे असले तरी माझ्यासारख्या सामान्य जीवालाही ती सर्वस्व प्रदान करते हे सांगण्याची भूमिका त्यामागे आहे.
प्रभूता भक्तिस्ते यदपि न ममालोलमनस:- या पहिल्या ओळीतील ममालोलमनस हा शब्द व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. अलोल शब्दाचा अर्थ स्थिर असा होतो. त्याला विरुद्धार्थी अ उपसर्ग लावला तर शब्द तयार होतो आलोल. त्याचा अर्थ चंचल.मग अर्थ लक्षात येतो की ममालोलमनस म्हणजे माझ्या अत्यंत चंचल मनात.
आचार्य म्हणतात, हे आई जगदंबे! माझ्या या अत्यंत चंचल मनात जरी तुझी प्रचुर भक्ती नाही तरी…
त्वया तु श्रीमत्या सदयमवलोक्योSहमधुना ! आता हे परम बुद्धिशालिनी माते तू दयापूर्णरीतीने माझ्याकडे पाहिले आहेस.
त्यामुळे प्रसन्न तर वाटत आहे पण आता मला एकच काळजी आहे.
पयोद: पानीयं दिशति मधुरं चातकमुखे- पयोद अर्थात ढग चातकाच्या मुखात मधुर देत असतो. त्यासाठी चातक त्याला प्रार्थना करतो. मला मात्र ती प्रार्थना कशी करावी हेही समजत नाही.
भृशं शंके कैर्वा विधिभिरनुनीता मम मति:- आई जगदंबे माझ्या बुद्धीने तुला कोणत्या विधीने प्रार्थना करावी? हीच माझी मोठी शंका आहे.
प्रार्थना करण्याएवढीही बुद्धी मला नाही असे मत आचार्य शरण जात आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply