माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ १२॥
परमपूज्य आचार्यश्रींचे मागणे सामान्य नाही. त्यांची भूक केवळ पोटाची नाही. त्यांना अपेक्षित असलेले अन्न केवळ पोट भरणारे अन्न नाही. हे सिद्ध करणारा हा या स्तोत्रातील अंतिम श्लोक.
आचार्यश्री आपल्या अतिदिव्य संसाराबद्दल येथे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात,
माता च पार्वती देवी- देवी पार्वती हीच माता आहे. पार्वती म्हणजे अत्यंत स्थिर असणारी, अविचल श्रद्धा. शिवपार्वती चे स्वरूप ‘श्रद्धा विश्वासरूपिणौ’ असेच वर्णन केले आहे. ती दृढ श्रद्धा आहे देवी पार्वती. अशा दृढ श्रद्धेने युक्त असणारी बुद्धी म्हणजेच पार्वती.
ह्या बुद्धीने मिळणाऱ्या तृप्ततेचा विचार खरा महत्वाचा आहे. ही तृप्तताच शाश्वत आहे. पोटाची तृप्तता काही तासात संपणार आहे. बौद्धिक तृप्तता मात्र शाश्वत आहे. ती तृप्ती येते शास्त्राच्या ज्ञानाने. ते देते ती खरी अन्नपूर्णा.
ती बुद्धी ज्या जीवात्म्याची क्रीडासंगिणी तोच माझा पिता. त्यासाठीच उल्लेख केला, पिता देवो महेश्वरः !
या माया- मायेश्वराच्या साहचर्याचा परिणाम आहे हे सर्व विश्व. हे दोघेच सकल जीवांचे जन्मदाते. पर्यायाने सकल जीव माझे बांधव.
बान्धवाः शिवभक्ताश्च- हा उल्लेख याच साठी. पण त्यातही नाते कोणत्या जीवांसोबत तर शिवभक्ताश्च. बाकीच्यां सोबत वेळेचा अपव्यय नको. भगवद्भक्त तेवढेच माझे. माझ्या भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला पोषक असतील तेच बांधव. बाकी निरर्थक. त्यांना सोडता यायला हवे.
फक्त भगवद्भक्तांनाच धरायचे.
मग माझ्या विस्ताराला, आनंदाला पारावार नाही. कारण,
स्वदेशो भुवनत्रयम् !
हे संपूर्ण विश्वाच माझे म्हटल्यावर दु:ख कुठले?
हीच भिक्षा हवी.
या परम आनंदची मागणी आहे अन्नपूर्णाष्टकम्.
ती मागणी पुरवते माता अन्नपूर्णा.
जय अन्नपूर्णे !
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply