योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥
आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत.
योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने या सर्व योगांचा आनंद तीच प्रदान करते. रिपुक्षयकरी- रिपू अर्थात शत्रूंचा नाश करणारी. शास्त्रात आळसालाच शरीरातील सगळ्यात मोठा शत्रू म्हटले आहे. अन्न भक्षणातून उत्साह येतो. आळस निघून जातो. पर्यायाने या महाशत्रूचा ती विनाश करते. धर्मैकनिष्ठाकरी- धर्मावर साधकाची अविचल एक निष्ठा निर्माण करणारी.
चन्द्रार्कानलभासमानलहरी- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य, अनल म्हणजे अग्नी, त्यांची भा म्हणजे तेज. त्याच्या समान जिच्या तेजो मंडळातील लहरी आहेत अशी.
त्रैलोक्यरक्षाकरी- स्वर्ग मृत्यु आणि पाताळ या तीनही लोकांचे रक्षण करणारी.
सर्वैश्वर्यकरी- साधकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणारी.
तप:फलकरी – त्यांच्या तपाचे फळ प्रदान करणारी. काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्ण! मला ज्ञान भक्ती वैराग्य रूपी भिक्षा प्रदान कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply