देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरीवामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥
देवी- देव शब्दांमध्ये संस्कृतचा द्यू धातू आहे. त्याचा अर्थ चमकणे, दिव्यत्वाने उजळणे, इतरांना चमकवणे. असे करतात ते देव. त्याचा स्त्रीलिंगी शब्द देवी. अर्थात अत्यंत उज्ज्वल असणारी. सकल विश्वाला तेजस्वी करणारी.
सर्वविचित्ररत्नरचिता- अनेक सौंदर्यपूर्ण रत्नांनी युक्त असे अलंकार धारण करणारी.
दाक्षायणी- देवी पार्वती पूर्वजन्मात सती होती. तिचा तो अवतार दक्ष प्रजापतीच्या घरी झाला होता. त्या स्वरूपात दक्षांची कन्या म्हणून दाक्षायणी.तिने स्वतःला दक्ष यज्ञात जाळून घेतल्यानंतर पुढे ती पार्वती रुपात जन्माला आली.
सुन्दरी- लोकोत्तर सौंदर्याने युक्त असणारी.
वामा- वामा शब्दाचा अर्थ देखील सौंदर्यवती असाच आहे. वाम म्हणजे डावा. जी आपल्या सौंदर्याने सगळ्यां सौंदर्यवतींना डावीकडे सरकवते अर्थात् गौण ठरवते अशी.
स्वादुपयोधरा – स्वादु अर्थात अत्यंत गोड. पय म्हणजे दूध. आपल्या मातृत्व रूपात अत्यंत मधुर दूग्ध धारण करणारी.
प्रियकरी- भक्तांचे साधकांचे सर्वांगाने प्रिय करणारी.
सौभाग्यमाहेश्वरी – सकल प्रकारच्या सौभाग्याची सर्वश्रेष्ठ स्वामिनी असणारी.
भक्ताभीष्टकरी- भक्तांना अपेक्षित वर प्रदान करणारी.
सदा शुभकरी- साधकांचे,उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगलदायीनी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हेमा ते अन्नपूर्ण मला भक्ती ज्ञान आणि वैराग्य स्वरूप भिक्षा प्रदान कर.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply