चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरीचन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ ९॥
चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि अनल म्हणजे अग्नी. सामान्य जगातील या तीन तेजस्वी गोष्टी. त्यामुळे स्वाभाविकच कोणत्याही तेजस्वी गोष्टीला उपमा द्यायची तर यांचीच द्यावी लागते.
पण त्यातही मर्यादा आहे. चंद्राला कलंक आणि क्षय आहे तर सूर्य आणि अग्नीला दाहकता.
त्यासाठी आचार्य तिन्हीचा एकत्र विचार करतात. सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता एकत्र. पण तरी ते कमी पडते. त्यामुळे कोटी कोटी अर्थात या तिघांच्या एकत्रित तेजाचा अगणित पट आई तेजस्वी आहे. हे तिघेही कोटी-कोटी रूपात एकत्र आले तर जे तेज प्रकट होईल त्याप्रमाणे असणारी.
चन्द्रांशुबिम्बाधरी- चंद्राप्रमाणे जिचे मुख अत्यंत सुंदर आहे अशी. दुसरा अर्थ म्हणजे जिने चंद्राची कोर आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशी.
चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी- चंद्र सूर्य आणि अग्नीच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असणारी कुंडले कानात धारण करणारी.
चन्द्रार्कवर्णेश्वरी – जिचा वर्ण अर्थात त्वचेचा रंग चंद्र सूर्याप्रमाणे उज्ज्वल आहे अशी.
मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी- जिने आपल्या चार हातात माला, पुस्तक, पाश म्हणजे दोरी आणि अंकुश धारण केले आहेत अशी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरी ची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply