कस्तूरीतिलकाञ्चितेन्दुविलसत्प्रोद्भासिफालस्थलींकर्पूरद्रवमिश्रचूर्णखदिरामोदोल्ल सद्वीटिकाम्।
लोलापाङ्गतरङ्गितैरधिकृपासारैर्नतानन्दिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।२।।
आई ललितांबेच्या मुख कमलाचे सौंदर्य वर्णन करताना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कस्तूरीतिलकाञ्चित- कस्तुरी मिश्रित तिलकाद्वारे विलोभनीय असणारे.
सोळा शृंगारात शेवटचा शृंगार आहे तिलक धारण. त्या तिलका मधील सर्वश्रेष्ठ तिलक कस्तुरीचा. त्याचे वर्णन, अर्थात परिपूर्ण शृंगार केलेली.
इन्दुविलसत्- इंदू म्हणजे चंद्राप्रमाणे, विलसत् म्हणजे सुंदर दिसणारे. मुखकमल.
प्रोद्भासि- चमकदार असणारी
फालस्थलीं- भांग पाडलेली जागा. केसांमध्ये भांग पाडतांना जेथे ते दोन भागात विभागल्या जातात त्या स्थानाला फालस्थली म्हणतात.
कर्पूरद्रव म्हणजे कापूर.मिश्रचूर्ण त्याचे चूर्ण ज्या मध्ये मिसळले आहे असे.
विडा अर्थात पान तयार करताना त्यामध्ये भीमसेनी कापराचे चूर्ण घातले जाते. त्याचा येथे संदर्भ आहे.
खदिर- म्हणजे खैर. त्या झाडापासून काथ निर्माण करतात. येथे विड्याचा संबंध असल्याने खैर शब्दात काथ अपेक्षित आहे.
आमोदोल्लसद्- त्याचा सुगंध दरवळणारे,
विटिकाम्- पान, विडा.
आई जगदंबेच्या अत्यंत आवडत्या नैवेद्या मध्ये विडा सम्मिलित आहे. यांनी आईचे मुख, लालबुंद, रसपूर्ण आणि सुगंधी झाले आहे.
लोलापाङ्ग- हलणाऱ्या डोळ्याच्या कडा,
तरङ्गितै:- त्यांचा तरंगांनी
अधिकृपासारै:- वर्षाव करीत असणाऱ्या कृपेच्या द्वारे.
नतानन्दिनीं – विनम्र असणाऱ्यांना आनंद देणारी. अर्थात भक्तांना परिपूर्ण आनंद प्रदान करणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या, भगवतीं श्रीमातरं- देवी श्री भ्रमराम्बेला भावये- मी ध्यातो. मी अखंड तिचे ध्यान करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply