षट्तारां गणदीपिकां शिवसतीं षड्वैरिवर्गापहांषट्चक्रान्तरसंस्थितां वरसुधां षड्योगिनीवेष्टिताम्।
षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां ष़ड्भावगां षोडशीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।४।।
षट्तारां – हा शब्द समजून घेण्यासाठी थोडी कसरत करणे आवश्यक आहे.
षट्तारा म्हणजे सहा ताऱ्यांचा समुदाय. असा समुदायास असतो कृतिका नक्षत्राचा. त्या सहा कृतिका देवसेनापती कार्तिकेयाच्या माता. श्री कार्तिकेय म्हणजे स्कंद हे देवी पार्वतीचे पुत्र. ती देवी पार्वतीच सर्व रूपात नटली असल्याने, कृत्तिका रूपातील सहा ताऱ्यांच्या रूपात नटलेली ती षट्तारा.
या सहापैकी सगळ्यात मोठ्या ताऱ्याचे नाव अंबा आहे हे विशेष.
गणदीपिकां- विश्वातील सर्व जीव हेच जणू जगदंबेचे गण आहेत. त्यांना चैतन्य प्रदान करणारी.
शिवसतीं- भगवान शंकरांची प्रियतमा. षड्वैरिवर्गापहां- काम, क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर यांना षड्वैरी म्हणतात. त्यांच्या वर्ग म्हणजे समुदायाला, अपहा म्हणजे दूर करणारी.
षट्चक्रान्तरसंस्थितां- मूलत: सहस्त्रारचक्रात निवास करणारी आदिशक्ती, शरीरातील मूलाधारा पासून आज्ञाचक्रा पर्यंत सहा चक्रांच्या ठिकाणी निवास करते.
वरसुधां- श्रेष्ठ अमृत स्वरूपिणी.
षड्योगिनीवेष्टिताम्- सेवा करण्यासाठी सहा योगिनींनी वेढलेली.
षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां- नाभी कमलस्थित कुंडलिनी शक्ती सहा चक्रांवर आपली पावले उमटवत शेवटी सहस्त्रार चक्रात स्थिर होते. त्या चक्रांना पार करत जाण्याला, त्याद्वारे चरण सुशोभित असणाऱ्या जगदंबेला षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदा म्हणतात.
ष़ड्भावगां – शास्त्रात वर्णिलेल्या अस्ति, भाति इ. सहा भाव अर्थात अवस्थांची अधिष्ठात्री.
षोडशीं- कायम सोळा वर्षांच्या युवती प्रमाणे सौंदर्यवती.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply