गायत्रीं गरुडध्वजां गगनगां गान्धर्वगानप्रियांगम्भीरां गजगामिनीं गिरिसुतां गन्धाक्षतालंकृताम् ।
गङ्गागौतमगर्गसंनुतपदां गां गौतमीं गोमतीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ९॥
एकच अक्षर किंवा शब्द वारंवार वापरण्याला साहित्यात अनुप्रास अलंकार असे म्हणतात. मागील श्लोकात आचार्यश्रींनी क चा उपयोग करून तर या श्लोकात ग चा उपयोग करून अनुप्रास साधला आहे.
गायत्रीं – ज्याचे गायन केल्याने साधक तरुन जातो, त्या मंत्राला गायत्री म्हणतात. सर्वच मंत्रांचे गायन अर्थात आनंद पूर्ण उच्चारण करावे.
गरुडध्वजा- गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांची सहधर्मचारिणी.
गगनगा- गगन म्हणजे आकाश. त्यातून ग म्हणजे गमन करणारा अर्थात भगवान सूर्य. तशी तेजस्वी. त्याच्या प्रकाशाच्या मागे असणारी चैतन्यशक्ती. ज्ञानशक्ती.
गान्धर्वगानप्रिया- देवतांचे जे विविध प्रकार आहेत, त्यापैकी गायन प्रवीण असणाऱ्या देवतांना गंधर्व असे म्हणतात. हाहा, हूहू, तुंबरू अशा अनेक गंधर्वांचे वर्णन शास्त्रात आहे. त्या गंधर्वांच्या द्वारे केल्या जाणारे गायन अत्यंत प्रिय असणारी.
गम्भीरा- अत्यंत गहन. सहजा सहजी पार न लागणारी. अपार. अथांग. अनाकलनीय.
गजगामिनी- हत्तीप्रमाणे शांत, गंभीर तथा आकर्षक गतीने चालत जाणारी.
गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. त्यांचा राजा तो हिमालय. त्याची कन्या. पार्वती. गन्धाक्षतालंकृताम् – मस्तकावर गंध आणि त्यावर अक्षता धारण केलेली.
गङ्गा- गंगा म्हणजेच गमनशीला . गमन अर्थात गती हा चैतन्याचा विषय. त्यामुळे गंगा म्हणजे चैतन्यमयी.
गौतमगर्गसंनुतपदां – गौतम, गर्ग इ. ऋषिमुनींनी चरण वंदना केलेली.
गां- गोमाता स्वरूप असलेली.
गौतमीं – महर्षी गौतमांवर आलेले गोहत्येचे बालंट दूर करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे प्रगटलेली गोदावरी स्वरूप असलेली.
गोमतीं- दक्षिण भारतात गोमती नदी स्वरूप असलेली.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये – श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमराम्बेचे मी भजन करतो.
जय भ्रमराम्बा !
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply