श्री गणेश अवतारलीला ७ – श्री चतुर्भुज अवतार
सामान्यत: श्रीगणेशांचे अवतार देवतांच्या संरक्षणासाठी होतात. पण राक्षसांच्या संरक्षणासाठी झालेला अवतार आहे चतुर्भुज अवतार.
सामान्यतः राक्षस उन्मत्त होतात आणि स्वर्गावर आक्रमण करतात. मात्र एकदा देवांच्या डोक्यात कल्पना आली की ही समस्या कायमची संपवायची. त्यांनीच राक्षसांवर आक्रमण करण्याची योजना आखली.
दुसरीकडे महर्षी कश्यपांची पत्नी दिती हिने आत्मोन्नतीचा मार्ग विचारल्यामुळे महर्षी कश्यपांनी तिला, पूर्वी भगवान दत्तात्रेयांनी देवतांना दिलेला ” दत्तगीता” नामक उपदेश ऐकवला. श्री गणेशांचा दशाक्षरी मंत्र दिला. तिच्या तपाने प्रसन्न झालेले भगवान चतुर्भुज अवतारात प्रकट झाले.
ज्यावेळी देवतांनी दैत्यांवर आक्रमण केले त्यावेळी देवी दितीच्या प्रार्थने वरुन भगवान चतुर्भुज यांनी ते आक्रमण परतवून लावले.
सगळ्या देवता आश्चर्यचकित झाल्या. त्यावेळी भगवान गणेश त्यांना म्हणाले, इतर वेळा राक्षस स्वर्गावर आक्रमण करतात त्यावेळी त्यांच्या त्या अयोग्य कार्याच्या विरोधात मी देवतांच्या बाजूने असतो. असाच प्रकार अनेकदा घडल्याने तुम्हाला मी तुमचा पक्षधर वाटतो.
मी ना देवांच्या गटाचा आहे ना राक्षसांच्या. मला दोन्ही समान आहेत. प्रत्येकाने आपापले दिलेले कार्य व्यवस्थित करीत राहायला हवे.
देवांनी स्वर्गात, माणसांनी पृथ्वीवर तर दैत्य आणि नागांनी पाताळात आपापल्या जागी स्थिर राहायला हवे. ते आपली कक्षा ओलांडतात तेव्हाच मला अवतार घ्यावा लागतो.
हे चारही माझेच आहेत. चारही माझेच हात आहेत. त्यामुळेच मी चतुर्भुज आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply