श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.
दत्तसंप्रदायाचा प्रभाव मुख्यत: महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी असे अत्यंत उच्चकोटीचे साधक याच परिवाराचा भाग आहेत. आणि त्यांचे वास्तव्य आणि कार्य याच परिसरात होऊन गेल्यामुळे कदाचित असे झाले असावे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रचितींमुळे हा संप्रदाय खूप मोठय़ा प्रमाणावर जनमानसात रुजला. मात्र देशाच्या इतरही अनेक भागांमध्ये श्री दत्तगुरुंची आराधना केली जाते आणि मंदिरेही आहेत.
दत्तसंप्रदाय हा अत्यंत लोकप्रिय असा संप्रदाय असून या संप्रदायामध्ये दत्तात्रेयाइतकेच महत्त्व त्या संप्रदायातील अधिकारी व्यक्तींना, आणि गुरू-शिष्य परंपरेलापण आहे.
दत्तसंप्रदायात दत्ताच्या मूर्तीएवढेच पादुकांनाही फार महत्त्व आहे. अनेक मंदिरांमध्ये फक्त दत्त-पादुकांची पूजा केली जाते.
हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही धर्मामध्ये अनेक भक्त असलेला कदाचित एकमेव संप्रदाय असेल. विजापूरला आदिलशाहीत बांधलेले दत्तमंदिर आहे. श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे असे मानले जाते. याचा संदर्भ गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायातही सापडतो.
सर्वसाधारणपणे सर्वच मंदिरांशी एखादी कथा निगडित असते. काही ठिकाणे सत्पुरुषांच्या वास्तव्याने पवित्र झालेली असतात आणि ती जागृतही असतात. दत्तमंदिरेही याला अपवाद नाहीत.
गिरनार पर्वत, श्रीक्षेत्र माहूर, पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, औदुंबर ही स्थाने तर दत्तसंप्रदायासाठी तीर्थक्षेत्रेच आहेत. या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी नेहेमीच गर्दी असते. मात्र महाराष्ट्रात आणि इतरत्रही काही वैशिष्टय़पूर्ण दत्तस्थानेसुद्धा आहेत. आपण या ठिकाणांच्या जवळ गेलेलो असतो, या ठिकाणांहून आपण अनेकदा पुढेही जात असतो. मात्र माहितीअभावी आपण याठिकाणी थांबत नाही आणि एका वेगळ्या आनंदाला मुकतो.
महाराष्ट्रातील आणि इतरत्रही असलेल्या अनेक दत्तस्थानांचा परिचय या सदरात आपण करुन घेणार आहोत. यामध्ये माणिकनगर, गरुडेश्वर, कडगंची, मुरगोड, कारंजा, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद अशा ठिकाणांचाही समावेश आहे. यापैकी अनेक ठिकाणी निवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इत्यादि विधीही येथे करता येतात.
आपल्याही माहितीत, आपल्या गावात किंवा शहरात अशी जी काही दत्तस्थाने किंवा दत्तमंदिरेही असतील त्यांची माहिती आपणही एखाद्या किंवा अनेक छायाचित्रांसहित आमच्याकडे पाठवा. ही माहिती आपण support@marathisrushti.com या इ-मेलवर पाठवू शकाल.
Leave a Reply