
श्री गणेश अवतारलीला ३ – श्री गजानन अवतार
भगवान ब्रह्मदेवांपासून सिंदूर नावाचा अत्यंत भयानक दैत्य जन्माला आला. ब्रह्मदेवांनी त्याला अन्य वरदानां सोबत अजब वरदान दिले की तू ज्याला कोणाला मिठी मारशील तो गतप्राण होईल.
फुकटात मिळालेल्या वरदानाने उन्मत्त झालेला तो ब्रह्मदेवां वरच चालून आला. शेवटी त्यांनी शाप दिला की श्री गणेश तुझा अंत करतील.
सिंदुरा च्या त्रासाने संपूर्ण ब्रह्मांड त्रस्त झाले. सर्व ऋषी-मुनी देवी देवतांनी श्री गणेशांची आराधना केली.
सिंदुरा च्या वधासाठी भगवान गणेशांनी भगवान शंकर आणि देवी पार्वती च्या घरी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला द्वापारयुगात श्री गजानन अवतार धारण केला.
श्री गणेशांनी अवतार घेतल्यावर शिवपार्वती यांना सांगितले की आम्हाला माहिष्मती चा राजा वरेण्य याच्या घरी नेऊन ठेवा.
राजाची पत्नी देवी पुष्पिकेच्या जवळ त्यांना नेऊन ठेवण्यात आले. पण यावेळी भगवंतांनी घेतलेल्या चार हात, लाल रंगआणि सोंडे सह अवताराला पाहून राणी घाबरली. तिने दासींच्या हातून हे बालक जंगलात नेऊन सोडले.
प्रात:स्नानाला जाणाऱ्या महर्षी पराशरांनी त्यांना आपल्या आश्रमात नेले. पुढे त्यांची पत्नी देवी दीपवत्सला हिने बाललीलांचा आनंद घेतला.
नर्मदेच्या पात्रातील नर्मदा गणेशकुंड निर्मिती,पराशर आश्रमातील अनेक बाललीला, मूषकाचा वाहन रुपात स्वीकार, या विविध लीलांसह गजानना अवतारातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे , राजा वरेण्याला दिलेला दिव्य उपदेश. याला गणेशगीता असे म्हणतात.
११ अध्याय ४१८ श्लोक इतका लहानसा हा ग्रंथ असला तरी, श्री गणेश योगींद्राचार्य महाराजांनी त्यावर तब्बल १००३१ ओव्यांची टीका लिहिली. यावरून त्याच्या विषय व्यापकतेचा अंदाज येईल
गाणपत्य संप्रदायाचे तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या ग्रंथांमध्ये श्री गणेश गीतेला फार वरचे स्थान आहे.
चार हात, लाल रंग, सोंडे सह असलेला अवतार हे या द्वापार युगातील आपल्या सगळ्यात जवळच्या अवताराचे वैशिष्ट्य असल्याने सामान्यतः गणेशमूर्ती याच स्वरूपात केल्या जातात.
या अवताराचा प्रगटोत्सव देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच आहे.
जय गजानन
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
छायाचित्र – इंटरनेटवरुन
Leave a Reply