सरागिलोकदुर्लभं विरागिलोकपूजितं!सुरासुरैर्नमस्कृतं
जरादिमृत्युनाशकम् !!
गिरा गुरुं श्रिया हरिं
जयन्ति यत्पदार्चका !
नमामि तं गणाधिपं
कृपापय: पयोनिधिम् !!१!!
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. या चवथ्या स्तोत्रात आचार्य श्री, भगवान श्रीगणेशांचे वर्णन करताना म्हणतात,
सरागिलोकदुर्लभ- राग शब्दाचा अर्थ आहे ज्ञानेंद्रियांच्या द्वारे कळणाऱ्या बाह्य गोष्टींबाबतची आसक्ती. अशा आसक्तीने युक्त ते सरागी. अशा सरागी लोकांना श्री गणराज प्रभू दुर्लभ असतात. कारण राग बाह्य गोष्टींचा असतो तर मोरया अंतरंगी आहे हा भाव. त्यामुळे त्यांना सरागिलोकदुर्लभ असे म्हणतात.
विरागिलोकपूजित- उलटपक्षी ज्यांच्या ठिकाणी वैराग्य आलेले असते ते साधक ज्यांची उपासना करतात त्यांना विरागिलोकपूजित असे म्हणतात.
सुरासुरैर्नमस्कृत – सुर म्हणजे देवता तर असुर म्हणजे दैत्य. या दोघांच्याही कडून ज्यांना वंदन केले जाते ते सुरासुरैर्नमस्कृत.
जरादिमृत्युनाशक- जरा म्हणजे म्हातारपण. सामान्य जीवनातील विविध दु:खांमधील हे सगळ्यात मोठे दुःख. तर जगातील सगळ्यात मोठे दुःख मृत्यू. या दोन्ही गोष्टींमधील दुःख नष्ट करणारे ते जरादिमृत्युनाशक. या घटना तर घडणारच आहेत. पण त्याचे दुःख वाटत नाही अशी मोरयाची कृपा.
गिरा गुरुं श्रिया हरिं
जयन्ति यत्पदार्चक- ही ओळ खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. जे आपल्या उपासकांना गिरा म्हणजे वाणीच्या बाबतीत गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती तर श्री म्हणजे लक्ष्मी च्या बाबतीत श्री विष्णूंपेक्षा अधिक संपन्न करतात . अशा शब्दांत आचार्यश्रींनी मोरयाच्या कृपेचे महत्त्व वर्णिले आहे.
अशा कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply