गिरींद्रजामुखाम्बुजप्रमोददानभास्करं !करीन्द्रवक्त्रमानताघसङ्घवारणोद्यतम् !!
सरिसृपेशबद्धकुक्षिमाश्रयामि संततं !
शरीरकांतिनिर्जिताब्जबन्धुबालसंततिम् !!२!!
गिरींद्रजामुखाम्बुजप्रमोददानभास्कर- गिरी शब्दाचा अर्थ आहे पर्वत. त्या सर्व पर्वतांचा राजा तो गिरींद्र. अर्थात हिमालय. सगळ्यात मोठा पर्वत. सगळ्यात विशाल पर्वत. म्हणून पर्वतांचा राजा. त्या पर्वतराज हिमालयापासून जन्माला आली देवी पार्वती. त्यामुळे तिला म्हणतात गिरींद्रजा.
त्या देवी पार्वतीच्या मुखरूपी कमळाला, मुखांबुजाला आनंदित करणारे, त्या कमळाला फुलविणारे जणूकाही जे सूर्य त्यांना म्हणतात, गिरींद्रजामुखाम्बुजप्रमोददानभास्कर.
करीन्द्रवक्त्र- करी म्हणजे हत्ती. गजराजांचे मुख असणारे ते करीन्द्रवक्त्र.
आनताघसङ्घवारणोद्यत- आनत अर्थात पूर्णपणे शरण आलेल्यांचे. अघ शब्दाचा अर्थ आहे पाप, दोष. त्या सगळ्यांचा संघ म्हणजे समूह. या सगळ्यांच्या, वारणासाठी, विनाशासाठी जे सदैव तत्पर आहेत ते, आनताघसङ्घवारणोद्यत.
सरिसृपेशबद्धकुक्षी- सरिसृप अर्थात सरपटणारे जीव. त्यांचा ईश अर्थात सर्वोच्च. सगळ्या सरपटणाऱ्या जीवांमध्ये श्रेष्ठ आहे सर्प. त्या सगळ्या सर्पांचे राजे आहेत भगवान श्री शेष.त्यांना जे आपल्या कुक्षी म्हणजे कमरेला, करदोड्याच्या स्वरूपात बांधून ठेवतात ते सरिसृपेशबद्धकुक्षी.
शरीरकांतिनिर्जिताब्जबन्धुबालसंतती- येथे भगवान गणेशांचा शरीर कांतीचे सौंदर्य वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की तिच्यासमोर अब्ज,बंधु आणि बालसंतती पराजित होतात.
अब्ज अर्थात कमळ. ते आप म्हणजे पाण्यात जन्माला येत असल्याने त्याला अब्ज असे म्हणतात. बंधु म्हणजे बंधुजीव. या नावाचे एक अत्यंत आकर्षक लाल रंगाचे फुल असते.तर बालसंतती अर्थात नवजात अर्भक. त्या लहान मुलाच्या त्वचेच्या सौंदर्यपूर्ण लालिमेला, कोमलतेला मोरयाची शरीर कांती जणू पराजित करते म्हणून यांना म्हणतात शरीरकांतिनिर्जिताब्जबन्धुबालसंतती .
आचार्यश्री म्हणतात, मी सदैव अशा भगवान गणेशांना शरण जातो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply