शुकादिमौनिवन्दितं गकारवाच्यमक्षरंप्रकाममिष्टदायिनं सकामनम्रपङ्क्तये ।
चकासनं चतुर्भुजैर्विकासिपद्मपूजितं |
प्रकाशितात्मतत्वकं नमाम्यहं गणाधिपम् ॥
शुकादिमौनिवन्दित – शुकाचार्य इत्यादी ऋषिमुनींनी मौन पूर्वक वंदन केलेले. ही शब्दरचनाच मोठी गोड आहे.शुक शब्दाचा अर्थ पोपट असाही आहे. पोपट जसे ऐकतो तसे बोलतो. शुकाचार्य तसेच आहेत. भगवान वेदव्यासांनी जसे सांगितले तसे त्यांनी जगासमोर मांडले. अर्थात शास्त्रवचन, गुरुवचन मांडतात ते शुकाचार्य. वास्तविक शुक बोलण्यासाठीच प्रसिद्ध. त्यात शुकाचार्य. विवेचन, निरूपण करणे हेच त्यांचे काम. पण येथे ते मौन आहेत. कारण आता शब्दच असमर्थ ठरत आहेत. सगळी शास्त्रे हतबल होत आहेत. मन आणि वाणीच्या पार असणाऱ्या मोरया समोर त्यांची क्षमता संपली आहे. त्यामुळे ते मौन राहून केवळ वंदन करीत आहेत. असे सुंदर विवेचन आचार्यश्री करतात.
गकारवाच्य- ॐ कार जर उभा लिहिला तर त्याची वेलांटी ग् सारखीच दिसते. त्या ओंकाराच्या रूपातच ज्यांचे वर्णन केले जाते ते गकारवाच्य.
अक्षर- जे कधीच नाश पावत नाही असे.
या रूपात सुद्धा पुन्हा ओंकाराची समानता वर्णन केली आहे कारण ओंकारालाच एकाक्षर ब्रह्म असे म्हणतात.
प्रकाममिष्टदायिनं सकामनम्रपङ्क्तये – जे सकाम भावनेने भगवंतांना शरण येतात त्या सगळ्यांच्या समुदायाला भगवान त्यांच्या मनातील संपूर्ण इच्छित गोष्टी प्रदान करतात.
‘चकासनं चतुर्भुजै:- जे चार हातानी शोभून दिसतात असे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ जावयाच्या हातात आहे ते सांगण्यासाठी त्यांना चार हात असतात.
विकासिपद्मपूजितं- फुललेल्या कमळांच्या द्वारे ज्यांचे पूजन केले जाते असे.
प्रकाशितात्मतत्वक- साधकांच्या आत्मतत्वाला प्रकाशित करणारे. त्यावर पडलेला मायेचा मळ दूर करणारे.
अशा भगवान गणाधिपांना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply