नराधिपत्वदायकं स्वरादिलोकदायकं!जरादिरोगवारकं निराकृतासुरव्रजम् !
कराम्बुजैर्धरसृणीन् विकारशून्यमानसै-
र्हृदा सदा विभावितं मुदा नमामि विघ्नपम् !!४!!
नराधिपत्वदायक- भगवान श्री गणेश उपासकांना राजपद प्रदान करतात, हा झाला सामान्य अर्थ. खरेतर सर्वांचे अधिपती, सर्वांना परम वंदनीय, राजा देखील चरण वंदना करतो असे स्थान प्रदान करतात.
स्वरादिलोकदायक- ज्यांच्या आधी स्वर् असा शब्द आहे ते लोक म्हणजे स्वरादी लोक. सोप्या शब्दात स्वर्ग. अशा समस्त स्वर्गांना आणि देह असेपर्यंत या जगात स्वर्गीय सुख प्रदान करणारे.
जरादिरोगवारक- जरा म्हणजे म्हातारपण. त्याला सर्व रोगांच्या यादीत आरंभी स्थान दिले. म्हातारपण हाच सगळ्यात मोठा रोग. ते आले की बाकी रोग आपोआप येतात. अन्य रोग आले की जातात. पण म्हातारपण आले की जातच नाही. त्यामुळे तो सगळ्यात मोठा रोग.
निराकृतासुरव्रज- असुर म्हणजे राक्षस. त्यांचा व्रज म्हणजे समुदाय. त्यांचे निराकरण करणारे. त्यांचा संपूर्ण पराभव, विनाश करणारे.
कराम्बुजैर्धरसृणी- कर म्हणजे हात. अम्बुज अर्थात कमळ. एकत्रितरीत्या हस्तकमल. सृणी अर्थात टोकदार वस्तू. भगवान गणेशांच्या हातात असणारा अंकुश अत्यंत टोकदार असतो. करकमला मध्ये असा अंकुश धारण करणारे ते कराम्बुजैर्धरसृणी.
विकारशून्यमानसैर्हृदा सदा विभावित- विकार शून्य झालेल्या मनाचा द्वारे आनंदाने योगी लोक सदैव ज्यांचे घ्यान करीत असतात असे.
मुदा नमामि विघ्नपम् ! अशाच या विघ्नविनायकांना मी अत्यंत आनंदाने वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply