श्रमापनोदनक्षमं समाहितान्तरात्मना !
समाधिभि: सदार्चितं क्षमानिधिं गणाधिपम् !
रमाधवादिपूजितं यमान्तकात्मसम्भवं !
शमादिषड्गुणप्रदं
नमामि तं विभूतये !!५!!
श्रमापनोदनक्षम – या जीवनात जीवाला त्रस्त करणार्या अनेकानेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्रारब्धवशात या सगळ्यांशी संघर्ष करताना माणसाला येणाऱ्या श्रमाला ज्यांच्या उपासनेने शांती प्राप्त होते असे.
समाहितान्तरात्मना
समाधिभि: सदार्चित- योगसाधनेच्या माध्यमातून जितेन्द्रियत्व प्राप्त केलेल्या, बाह्य विश्वातून पराङ्मुख होऊन अंतरंगीच्या आनंदात स्थिरावलेल्या साधकांना ‘समाहित आंतर आत्मा’ असे म्हणतात. असे साधक समाधीमध्ये ज्यांचे अखंड अर्चन करतात ते ‘समाहितान्तरात्मना
समाधिभि: सदार्चित.’
क्षमानिधि- भक्तांच्या द्वारे नकळत झालेल्या विविध अपराधांना क्षमा करण्याच्या बाबतीत भगवान अत्यंत सढळ आहेत.
गणाधिप- गणांचे अधिपती हा सामान्य अर्थ. पण गण कोणते? व्यष्टी पातळीवर शरीरातील समस्त अवयवांच्या देवता तर समष्टी पातळीवर ईश्वर महेश्वरादिकांना गण असे म्हणतात. त्या सगळ्यांचे जे संचालक ते गणाधिप.
ही केवळ गाणपत्य संप्रदायाची भूमिका नाही. आचार्यश्रीं ना देखील हे मान्य आहे, हे सांगणारी पुढील रचना आहे,
रमाधवादिपूजित- रमा म्हणजे देवी लक्ष्मी. तिचे धव म्हणजे पती, अर्थात भगवान विष्णू. श्री विष्णू इ. म्हणताना अन्य सर्व देवता अपेक्षित आहेत. त्यांनी पूजन केले असे ते रमाधवादिपूजित.
भगवान श्रीविष्णूंनी मधु आणि कैटभ नावाच्या दैत्यांच्या विनाशासाठी क्षमता प्राप्त व्हावी म्हणून श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भगवान श्री सिद्धिविनायकांच्या केलेल्या पूजनाचा येथे विशेष संदर्भ आहे.
यमान्तकात्मसम्भव- संपूर्ण विश्वातील जीवांचा अंत करणारे ते यमराज. त्यांचा अंत करतात ते भगवान शंकर. त्या श्री शंकरांचे आत्मतत्व पुत्र रुपात प्रगट होते त्यावेळी त्यांना म्हणतात,यमान्तकात्मसम्भव.
शमादिषड्गुणप्रद- शास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना संपत्ती असे म्हणतात. या सहाही गोष्टी भगवान गणेशांच्या कृपेने साधकांना प्राप्त होतात.
आचार्यश्री शेवटी म्हणतात अशा श्रीगणेशांना मी विभूती अर्थात सकल संपदेकरिता वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply