गणाधिपस्य पञ्चकं नृणामभीष्टदायकं !प्रणामपूर्वकं जना: पठन्ति ये मुदायुता: !!
भवन्ति ते विदाम्पुर: प्रगीतवैभवा: जना:-
श्चिरायुषोऽधिकश्रिय: सुसूनवो न संशय: !! ६!!
या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज या स्तोत्राचा पठणाचे फळ सांगतांना म्हणतात, हे भगवान गणाधिपांचे स्तोत्र नरांना त्यांचे ईप्सित प्रदान करणारे आहे. अर्थात ज्याला ज्याला ,जे जे हवे ते ते सर्व या स्तोत्राने प्राप्त होते.
येथे लक्षात घ्यायला हवे ती सर्वच देवतांच्या सर्वच स्तोत्रांमध्ये असेच वर्णन असते. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही एका देवतेचे, एकच स्तोत्र सर्वकाही प्रदान करण्यासाठी समर्थ असते. वेगवेगळ्या देवतांची खूप सारी स्तोत्रे म्हणत बसण्याऐवजी एकाच देवतेचे एकच स्तोत्र वारंवार पठण केल्याने अधिक लाभ होतो.
‘प्रणामपूर्वकं जना: पठन्ति ये मुदायुता:’ – हा उल्लेख देखील फार महत्वाचा आहे. स्तोत्राचे पठण प्रणाम पूर्वक व्हायला हवे. अर्थात ह्याच विनम्रता हवी. शरणागती हवी.
त्याच प्रमाणे हे पठण मुदायुता अर्थात आनंदी अंतकरणाने व्हायला हवे. भगवंताची उपासना भीतीने नव्हे तर प्रीतीने व्हायला हवी.
या पुढच्या ओळीत आचार्यश्रीनीं एक वेगळेच वैभव वर्णिले आहे. ते म्हणतात या स्तोत्राचे पठण करणारा विदाम्पुर: अर्थात विद्वानांच्या पुढ्यात, प्रगीत वैभव: अर्थात ज्याचे वैभव गायन केले जातो, असा होतो. व्यक्तीला वैभव प्राप्त होते. त्याच्या कीर्तीचे गायन होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते विद्वानांच्या समोर होते. ही आचार्य कथनी मोठी रमणीय आहे. सामान्य माणसाने केलेले कौतुकही आनंददायीच असते त्यातही ते साधुसंतांनी, पंडितांनी, विद्वानांनी केले तर त्याचा आनंद अपरंपार असतो. श्री गणेश उपासनेने साधकांना असा दिव्य आनंद प्राप्त होतो. असे आचार्य श्री सांगत आहेत.
याने दीर्घायुष्य प्राप्त होते. केवळ लांबलचक आयुष्य एवढाच अर्थ नव्हे तर श्रेष्ठ आयुष्य प्राप्त होते.
अत्यधिक वैभव, सुंदर पुत्र इ. व्यवहारातील सर्व आनंद प्राप्त होतात यात संशय नाही. असे म्हणत आचार्य श्री गणेश चरणी लीन होतात.
जय गजानन.
Leave a Reply